एक वाग्यज्ञ शांत झाला ! (श्रद्धांजलीपर लेख)
।। जय श्रीराम ।।
( शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. )
आयुष्यामध्ये तटस्थ राहण्यापेक्षा, व्रतस्थ राहणे हे अतिशय अवघड असते. त्यातून ते व्रत जर शिवचरित्र कथनाचे असेल तर ते व्रत शिवधनुष्य पेलण्यासारखे असते.
शिवचरित्राचे हे शिवधनुष्य जवळ जवळ ७५ वर्षे केवळ अपरिमित शक्तीनेच नव्हे तर श्रद्धेने
आणि निष्ठेने पेलणारे एक नांव म्हणजे महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर,श्रीमंत बळवंत
मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती; त्यांच्यावर
उपचार चालू होते परंतु अखेर, ७५ वर्षे आपल्या लेखणीतून, वाणीतून त्यांनी चालवलेला वाग्यज्ञ
आज शांत झाला. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत; त्यांच्या १०० वर्षांच्या जीवनपटाचा
धावता आढावा घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
शिवशाहीर बाबासाहेबांनी जनमानसामध्ये केवळ इतिहास पोहोचवला नाही तर; त्या मागची प्रेरणा देखील पोहोचवली आहे असेच वाटते.
इतिहासाची केवळ आखीव-रेखीव रुक्ष चौकटीत बद्ध करून मांडण्यापेक्षा,
तो इतिहास जिवंत करून जनमानसामध्ये त्याची गोडी निर्माण करणे हे आवश्यकच असते देखील
त्यांनी जाणले होते यासाठी त्यांनी, शिवचरित्र मांडताना लालित्यपूर्ण पद्धतीनेच मांडले.
एकच शिवचरित्र त्यांनी, ग्रंथ, नाट्य, कथाकथन, या माध्यमांतून मांडत असताना, शिल्पकला, चित्रकला
याद्वारे सुद्धा शिवचरित्र मांडले गेले पाहिजे हे जाणून शिवसृष्टीची निर्मिती केली.
मूळचे वाघ आडनांव लावणारी ही मंडळी, किल्ले पुरंदरवर आले आणि पुढे पुरंदरे या नावानेच प्रसिद्ध झाले. त्या काळाच्या नामांकित घराण्यांपैकी एक असलेले हे पुरंदरे घराणे हे खऱ्या अर्थाने श्रीमंत होते.
आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना बाबासाहेब स्वतः सांगत की; त्यांच्या घरी जर कोणी सत्पुरुष, छत्रपती घराण्यातील खासे मंडळी जेंव्हा कधी येत तेंव्हा पैठण्या, शालू यांच्या पायघड्या अंथरून त्यांचे स्वागत केले जात असे. कुलशील, सण उत्सव, कीर्तनाचे कार्यक्रम, दान धर्म आदी घरंदाज परंपरा सांभाळणाऱ्या घराण्यात बाबासाहेबांचा जन्म झाला.
बाबासाहेब पुरंदरे हे, अभिनय आणि विशेष म्हणजे नकला करणे यामध्ये शालेय वयापासून तरबेज होते.
स्वा. सावरकरांची नक्कल प्रत्यक्ष त्यांच्या समोर सादरही करून दाखवली होती.
इतिहासाचे संस्कार, आपल्या वडिलांकडूनच बाबासाहेबावर झाले होते.
पुण्याजवळचे गड-कोट त्यांची माहिती, बखरी,
पोवाडे यांची गोडी बाबासाहेबांना त्यांच्या वडलांमुळेच लागली. थोडक्यात घरंदाजपणा,
इतिहासाची ओळख आदी गोष्टींचे बाळकडूच बाबासाहेबांना मिळाले होते.
आपल्या वडलांनी आणलेली, हरी नारायण आपटे यांच्यासारख्या श्रेष्ठ
कादंबरीकारांची पुस्तके, राजवाडे यांचे संशोधनपर असणारे लेख हे वाचत वाचतच बाबासाहेबांचे
लहानपण व्यतीत होत होते.
पुढं इतिहास संशोधन मंडळात गेल्यानंतर, प्रा. ग. ह. खरे यांची व्याख्याने ग्रंथ यांतून संशोधित इतिहासाची ओळख बाबासाहेबांना झाली. इतिहास ग्रंथांचा अभ्यास करत असताना, काही घटनांना कथांमध्ये गुंफून ९६ पृष्ठांचे
" ठिणग्या
" हे पहिले पुस्तक बाबासाहेबांनी
प्रसिद्ध केले होते. याच पुस्तकाच्या लेखनातून, एका सृजनशील शिवचरित्रकाराचा जन्म झाला
होता.
संतसाहित्य, पोवाडे म्हणजे
कीर्तनकार, कथाकथनकार यांच्या शैलीचा जनमानसावरील असणारा प्रभाव, बाबासाहेबांनी प्रत्यक्षात
अनुभवला होता. एखादा विषय जर लोकांना आवडणाऱ्या शैलीत मांडला गेला तर तो विषय अधिक
प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतो याची प्रचिती बाबासाहेबांना आली होती.
त्यामुळे जेंव्हा शिवचरित्राचे लेखन करण्याचे ठरले तेंव्हा याच साध्या, सोप्या पण थेट काळजाला भिडणाऱ्या शैलीचा अवलंब करावा असे वाटले. शिवचरित्र लेखन करत असताना ज्या महनीय संशोधकांचे मार्गदर्शन लाभले त्यातील प्रमुख नावे म्हणजे, ग.ह. खरे आणि अप्पासाहेब पवार असे बाबासाहेब नेहमी सांगत असत.
उपलब्ध कागद पत्रांचा दीर्घकाळाचा अभ्यास, शिवचरित्रासंबंधी आवश्यक गड-कोट, जागा, ठिकाणे, घराणी यांच्या गाठी भेटी घेत, जिथे शिवचरित्रातील घटना प्रत्यक्षात घडल्या त्या घटनास्थळांच्या भेटी, तिथला इतिहास, भूगोल आदी सर्वांचे बारीक निरीक्षण करून त्यांची शिवचरित्रात गुंफण करत सज्ज झालेला महाग्रंथ म्हणजेच
" राजा शिवछत्रपती
". या महाग्रंथाच्या १७ हुन अधिक आवृत्त्या
निघाल्या असून ५ लाखांहून अधिक वाचकांपर्यंत शिवचरित्र पोहोचवण्याचे कार्य या महाग्रंथाने
केले आहे. या महाग्रंथाची इंग्रजी आवृत्ती देखील २०१४ साली प्रसिद्ध झाली आहे.
या महाग्रंथाव्यतिरिक्त, आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा
(महानाट्य ), पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, पुरंदऱ्यांची
नौबत, प्रतापगड, फुलवंती (नाटक), महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, लालमहाल, शिलंगणाचं
सोनं, शेलारखिंड. ( या कादंबरीवर अजिंक्य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला
"सर्जा‘ हा मराठी चित्रपटही निघाला होता.) सावित्री, सिंहगड अश्या अनेक लहान मोठ्या
ग्रंथांचे लेखन देखील त्यांनी केले आहे.
या महाग्रंथाप्रमाणेच " जाणता राजा " या आशिया खंडातील
महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन देखील बाबासाहेबांनी केले होते. या महानाट्याचे गेल्या
३५ वर्षांत १५०० हुन अधिक प्रयोग झाले झाले आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब यांचेकडे जसा प्रभावी लेखनाचा सिद्धहस्त होता तशीच, शब्दचित्रांच्या माध्यमातून प्रसंग जिवंत करण्यारी अमोघ वाणी सुद्धा होती. गेल्या ७५ वर्षांत, १२००० हुन अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. बाबासाहेबांच्या शिवकथनाने; तीन पिढयांना अक्षरश: वेड लावले होते.
आजही
शिवरायांच्या संदर्भातील अनेक कार्यक्रमांतून त्यांच्या कथाकथनातील शब्दप्रयोग, शैलीचा
वापर अनेकजण करताना दिसतात.
राजमाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील,
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख
बाळ ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज,
सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ.
रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला
आहे.
डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने; त्यांच्या इतिहास
संशोधनातील योगदानाबद्दल मा. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय
पदवी देऊन १४ एप्रिल २०१३ रोजी गौरविले होते.
या व्यतिरिक्त पोर्तुगीजांच्या ताब्यातील दादरा नगर हवेली या
भागाच्या मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने
सहभागी होते.
सरस्वती आणि लक्ष्मी यांची नितांत, विलक्षण कृपा असूनही बाबासाहेब
हे अखेर पर्यंत विनम्रतेनेच वागत होते. मागे एकदा त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार
करण्यासाठी मी आणि माझे काही सहकारी गेलो असता,
" शिवचरित्र मांडणे हे माझे कर्तव्य आहे; आणि कर्तव्यासाठी
सत्कार करणे योग्य नव्हे. पण तुम्ही एवढ्या प्रेमाने आला आहात तर, तुमचे प्रेम मी नाकारू
शकत नाही " असे उद्गार काढले होते.
किल्ले सिंहगडावर आयोजित श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन सोहळ्याला
त्यांचे आशिर्वाद त्यांनी पाठवले होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना अभिवादन सोहळ्यात
उपस्थित राहण्याचा योग येऊ शकला नाही याचीच चुटपुट मनाला लागून राहत आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनावर आक्षेप घेऊन त्यांचे, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांनी चालवला होता, पण बाबासाहेबांनी कधीही कोणाबद्दल अनुद्गार काढले नाहीत किंवा प्रत्युत्तर दिले नाही.
बाबासाहेब नेहमी सांगत असत की;
" इतिहासामध्ये चंदनही आहे आणि कोळसाही आहे, आपण काय उगाळायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. "
माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण,
शिवशाहीर, श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र श्राद्धांजली.
!
श्रीपाद श्रीकांत रामदासी
धायरी पुणे
Comments