सावरकर एक दीपस्तंभ : भाग १ ला

 

संरक्षणाय हिंदूंनां, दंडनाय दुष्कृतां ।

 हिन्दुत्वोत्थापनार्थाय, अजायत विनायक: ।।



दुष्कृतांना दंड करून, हिंदूंचे संरक्षण करून, हिंदुत्वाचे उत्थापन करण्याकरता क्रान्तीविनायकाचे रत्नागिरीमध्ये ८ जानेवारी १९२४ रोजी आगमन झाले. त्यापूर्वी दोन दिवस म्हणजे ६ जानेवारीला सावरकरांची कारागृहातून सुटका करून, राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. १९१० साली अंदमानात बद्ध झालेला क्रांतिकारकांचा राजपुत्र; १९२४ साली येरवाड्यातून हिंदुहृदयसम्राट होण्याकरता रत्नागिरीस आला.

ब्रह्मदेशाचा थिबा राजा जेथे नष्ट झाला ते ठिकाण म्हणजे रत्नागिरी.  दि ६ जाने १९२४ रोजी, सावरकरांना याच रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आले.

मोपला मुसलमानांनी केलेली हिंदूंची हत्या, देशावर अलीबंधूंनी आणलेली खिलापतची आफत, मुस्लिम समाजाला प्रमाणाबाहेर देण्यात येणारी सूट आणि या सर्वाला असणारा गांधीजींचा पाठिंबा, यामुळे हिंदुसमाजाचे राजकीय तसेच सामाजीक अस्तित्वच धोक्यात आले होते. त्यातच भरीस भर म्हणजे हिंदू समाजातील अंतर्गत उच्च-निचते मुळे, हिंदू समाज बहुसंख्य असूनही दुर्बल झाला होता. अश्या अटी-तटीच्यावेळी आपल्या परखड विचारांनी तसेच कणखर करांनी राष्ट्राला सावरण्याची आत्यंतिक आवश्यकता होती, म्हणूनच समाजक्रांतीद्वारे राज्यक्रांतीचा अवलंब सावरकरांनी केला.

सावरकरांचा स्वभाव, पिंड शैली हि केवळ क्रांतिकाराचीच होती आणि म्हणूनच कारागृहामध्ये सडत राहण्यापेक्षा सशर्त का असेना पण सुटका होणे गरजेचे होते. सावरकरांनी आधी स्वतःची मुक्तता करून घेत, लोकनायकाची भूमिका स्वीकारली.

सावरकरांचा " हिंदुत्व " हा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता, कित्येक समाजनेते, क्रांतिकारी आणि कार्यकर्त्यांवर

या ग्रंथाची मोहिनी पडली होती. सावरकर रत्नागिरीला आल्यावर अवघ्या पंधरा दिवसात रत्नागिरी हिंदुमहासभेची स्थापना झाली.

सावरकर पुन्हा सक्रिय झाले आहेत ही बातमी जेंव्हा देशभर पसरली तेंव्हा सावरकरांची भेट घेण्याकरता अनेक पंडित, देशभक्त, नेते यांची पावले रत्नागिरीकडे वळली. अशाच दिग्गजांपैकी एक म्हणजे रा. स्व. संघाचे संस्थापक, आदरणीय डॉ हेडगेवार. डॉक्टरांनी सावरकरांचा " हिंदुत्व " हा ग्रंथ वाचला होता, तसेच संघ स्थापनेपूर्वी सावरकरांशी चर्चा देखील केली होती.

जुलै १९२४ दरम्यान रत्नागिरीस प्लेग सुरु झाल्याने सावरकरांना नासिक येथे हलवण्यात आले,

तब्बल १९ वर्षांनंतर सावरकर आपल्या जन्मभूमीला आणि बालपणीच्या कर्मभूमीला भेट देत होते.

नासिकवासीयांनी सावरकरांचे प्रचंड उत्साहात आणि दिमाखात स्वागत केले, दि २४ ऑगस्ट १९२४ रोजी, नासिक नागरवासियांच्या वतीने सावरकरांना थैली अर्पण करण्यात आली.

सावरकरांनी आपले हिंदू उद्धाराचे कार्य नासिकमध्येही सुरूच ठेवले, सावरकरांच्या या वास्तव्यात दोन

महत्वपूर्ण घटना घडल्या, पहिली म्हणजे सावरकरांनी एका अस्पृश्याच्या घरी चहा घेतला, या घटनेने तात्कालिक सनातन्यांच्या अंगावर सरसरून काटा आला पण या धक्क्यातून सावरण्या आधीच सावरकरांनी दुसरा धक्का दिला, सावरकरांनी घोषणा केली " माझ्या मृत्यू नंतर, माझ्या प्रेतास, एक महार, एक मांग, एक मराठा आणि एक ब्राम्हण अश्यानी खांदा द्यावा " या घटनेनंतर सावरकरांनी स्फूर्तिदायी आणि परखड भाषणांचा वर्षाव केला. सावरकरांची भाषणे, त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि भाषण प्रसंगी होणारी गर्दी पाहून इंग्रज सरकार गडबडले.

सावरकरांना तात्काळ रत्नागिरीस परत जाण्याचे आदेश दिले, साधारणपणे ३-४ महिन्याच्या नासिक वास्तव्यानंतर सावरकर परतीच्या प्रवासाला निघाले, याच प्रवासात सावरकरांनी मुंबईला भेट दिली, येथेच सावरकरांना अलीबंधू पैकी शौकतअली भेटण्यास आले.

शौकत अलीनी सावरकरांना हिंदू संघटन थांबवण्याचे सांगितले पण सावरकरांनी त्यांना " आधी मुस्लिम संघटन बरखास्त करा मग आपण पाहू " असे सांगितले, शौकत अलींनी, मुसलमान चिडले असून ते आपल्यावर हल्ला करू शकतात अशी धमकी देखील दिली तेंव्हा सावरकर म्हणाले, " तोफा बंदुका उरी बाळगणारे इंग्रज माझे काही बिघडवू शकले नाहीत तिथे सुऱ्या घेऊन फिरणाऱ्या मुसलमानांना कोण घाबरतो.  "

शौकत अलींनी मुसलमान हा देश सोडून जातील असेही सांगितले तेंव्हा सावरकर म्हणाले की,

" खुशाल जा वाट कुणाची बघताय, चालते व्हा ".

एवढे होऊन देखील शौकतअली जेंव्हा वैयक्तिक शारीरिकसामर्थ्याचा धाक दाखवू लागले तेंव्हा मात्र सावरकर संतापले आणि म्हणाले, " शौकतअली तुम्ही माझ्या साधारण उंची आणि तब्ब्येतीवर जाऊ नका, तुमच्या सारख्याच देहयष्टीच्या अफझलखानाचे, माझ्या सारख्या देहयष्टी असणाऱ्या शिवरायांनी काय केलं होतं हे ध्यानात घ्या आणि मग पाऊल पुढे टाका."

यानंतर मात्र शौकतअली खजील होऊन निघून गेले, या प्रसंगानंतर " आरे ला कारे " केल्याशिवाय मुस्लिम नेते वठणीवर येत नाहीत अशी प्रत्येकाची खात्री झाली. याचा परिणाम असा झाला की मुसलमान गुंडां-पुंडांना हिंदू तरुण बिधास्त नडू लागले, शस्त्राचा धाक दाखवला की हिंदू घाबरतात या नित्य अनुभवला तडा गेला.

पाहता पाहता सावरकरांनी स्वतःला सार्वजनिक कार्यात झोकून दिले; हिंदूंची संघटना आणि एकजूट घडवून आणून त्यातून एकसंध समाज बनविणे आणि त्यातून अन्यायी आक्रमणाला प्रभावी प्रतिकार करण्याचे सामर्थ्य हिंदुमंध्ये निर्माण करणे; या प्रमुख उद्देशावर उभारलेल्या हिंदूसभेला सर्वच जाती-पंथातून भरघोस प्रतिसाद मिळाला.

या पर्वामध्ये सावरकरांचे उजवे हात होते, कै. डॉ. म. ग. शिंदे, सावरकारांभोवती विविध प्रवृत्तीच्या विभूती गोळा होऊ लागल्या,डॉ शिंदे तर सावरकरांवर अतोनात प्रेम करत, पलूकाका जोशी सावरकरांचे लेख लिहून काढत, त्याच सोबत भा. रा. नानल, रावबहाद्दूर परुळेकर, वि एन सावंत, वामनराव चव्हाण, राणे वकील, नारायणराव खातू, गोपाळजी चांभार, केरुजी महार हे व असे अनेक सहकारी सावरकरांसोबत अहोरात्र कार्य करत, कोणी त्यांचे रक्षण करत तर कोणी त्यांची काळजी घेत.

वरील यादी पाहता सावरकरांवर सर्वच जाती-वर्णातील व्यक्तींनी उदंड प्रेम केले, परंतु तरीही आजकाल सावरकरांना " ब्राह्मणी नेता " म्हटले जाते हे खरोखरच या हिंदुस्थानचे दुर्दैव म्हणावे लागेल.

सावरकरांची हिंदू महासभेच्या माध्यमातून चालू असलेलया निस्वार्थी, निर्भेळ चळवळीमुळे हिंदूंच्या अंतर्गत असणाऱ्या, जातीय कलहांना तडे जाऊ लागले, बुद्धिजीवी जनमानसांमध्ये सावरकरांचे विचार एक आदर्शवाद घेऊन आले.

सावरकरांना इथेही वलय प्राप्त झाले, पण या वालयामामुळे मुस्लिम-धार्जिण गांधीवाद्यांच्या मस्तकात प्रलय निर्माण झाले, कित्येक तरुणांच्या हातचे चरखे जाऊन, त्यांची जागा लाठयांनी घेतली, अर्थातच कालपर्यन्त गरीब गाय असणाऱ्या हिंदू समाजाचे वाघामध्ये रुपांतरण होताना पाहून बऱ्याच मुसलमानांचे डोके ठणकू लागले.

अन्यायी आक्रमणाचा प्रखर विरोध करण्याची बुद्धी आणि शक्ती हिंदूंमध्ये जागृत होत असल्याने काही मुस्लिम वर्गाने हिंदुत्ववाद्यांचा द्वेष करण्यास सुरुवात केली. मुसलमानी परंपरेनुसार त्यांनी दंडेलशाही सुरु केली,  मशिदी समोर वाद्ये वाजवण्यावर बंदी घालण्याची दडपशाही करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण सावरकरांनी ही दडपशाहीच दडपून टाकली.

कोंग्रेसी नेते आणि गांधीवाद्यांना स्वाभिमानी करार आणि लाचार मनधरणी यांतील भेदच समजला नाही; यांवर एकीकडे डॉ. आंबेडकरांनीहि हिंदूंचाच पक्ष उचलून धरत, गांधीजींच्या मुस्लिम धार्जिण धोरणावर सडकून टीका केली. तर दुसरीकडे सावरकरांनी, देशभर माजलेल्या ' गांधी-गोंधळावर ' कडक अन तिखट टीका केली.

असहकार आंदोलन आणि खिलाफत चळवळ पूर्णपणे फसल्यामुळे गांधीजींचे स्थान डळमळू लागले होते, परंतु त्यांचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे लाचार वेड मात्र ओसरले नाही.

गांधीजी एकीकडे हिंदूंना अहिंसेचा पाठ पढवीत तर दुसरीकडे मुसलमानांच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करीत.

अश्याच मनस्थितीत गांधीजी सावरकरांना भेटण्यासाठी रत्नागिरीमध्ये आले, या भेटीतही गांधीजींनी शुद्धी आणि हिंसा यांचा विरोधच केला. सावरकर आणि गांधी यांची ही अखेरची भेट ठरली, हे दोनही महापुरुष या नंतर पुन्हा कधीच एकमेकांना भेटले नाहीत.

सावरकरांचे हिंदू संघटन जसे मुसलमानांना डाचत होते तसेच मिशनऱ्यांनाही बोचत होते, मिशनऱ्यांच्या धर्मान्तरणाचे चाळे सावरकरांनी बंद पाडले, त्याकाळी स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या वेगळ्या वेगळ्या शाळा भरत, सवर्ण मुलांच्या शाळेत दलितांना प्रवेश नसे, परंतु तोच विद्यार्थी जर धर्मान्तरीत होऊन ख्रिश्चन होऊन आला तर मात्र त्याला प्रवेश असे, मिशनरी लोक याचाच फायदा घेऊन वस्तीच्या वस्ती धर्मांतरित करत, सावरकरांनी हा डाव पक्का ओळखून सनदशीर मार्गाने, दलितांना सवर्ण शाळांमधून प्रवेश मिळवून देण्यासाठी चळवळ उभी केली, या करता त्यांनी प्रसंगी इंग्रज सरकारची-अधिकाऱ्यांची मदतही घेतली.

दलित शाळा प्रवेशाबाबत सावरकरांचे आक्रमक रूप पाहून आणि त्याच प्रमाणे हे असे घडणे मानव्याच्या दृष्टीने योग्य असल्याने, सरकारने सावरकरांना यथायोग्य सहकार्य केले आणि दलितांच्या शाळा प्रवेशाचे आंदोलन यशस्वी झाले.

अश्या प्रकारे शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या रत्नागिरीतील या उपेक्षित समाजाला सावरकरांनी शिक्षणाची कवाडे उघडून दिली.

रत्नागिरी पर्वातील अन्य कार्याचा आढावा पुढील भागातून घेऊयात.

संकलन-लेखन : श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments

Tanushree Rane said…
माहितीपूर्ण लेखन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 🙏🙏
Suhas Ingle said…
खूप सुंदर लिखाण आहे, धन्यवाद माहिती बद्दल😑😎🙏🏼
माहितीपुर्ण लिखाण सर...
Hemant Sambare said…
उत्तम लेखन
Unknown said…
माहितीपूर्ण लेख, उत्तम माहिती. धन्यवाद
Unknown said…
खूप वेळा असं होतं की स्वा. सावरकरांचे चरित्राचे पूर्ण वाचन होत नाही. तुमचं लिखाण म्हणजे थोडक्यात समजाऊन देण्याचा प्रयत्न. खूप छान