सावरकर एक दीपस्तंभ : भाग ३ रा.


 ज्वल-जहाल राजकारणी सावरकर.

                 हिमाद्री तुंग शृंग से, प्रबुद्ध शुद्ध भारती
               स्वयंप्रभा समुज्ज्वला, स्वतंत्रता पुकारती

भारतीय राजकारणामध्ये हिंदूंचा पक्ष मांडणे म्हणजे स्वतः चे राजकीय अस्तित्व पणाला लावणे,

असा प्रघात असणाऱ्या काळामध्ये सावरकरांची मुक्तता होणे ही हिंदु समाजाला एक पर्वणीच ठरली.

सावरकरांची निर्वेध मुक्तता ही केवळ एका राजकीय नेत्याची किंवा व्यक्तीची मुक्तता नव्हती तर

ती एका प्रभावी शक्तीची, राष्ट्रीय ध्येयवादाची मुक्तता होती, वाटेत  येईल त्याला भुईसपाट करण्याची रौद्रता

असणाऱ्या झंझावाती वादळाचीच ही मुक्तता होती.

सावरकरांचा काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच नव्हता.  स्वीकृत लोकशाही आणि राष्ट्रीय भूमिका यांपासून दूर गेलेल्या, मुसलमानांच्या राष्ट्रविघातक तसेच आक्रस्ताळी मागण्यांपुढे गुढगे टेकणाऱ्या, अहिंसेच्या नावाखाली विशिष्ठ व्यक्तींची हुकूमशाही असणाऱ्या,  ओजहीन, निस्तेज, काँग्रेसमध्ये, सावरकरांसारख्या अविचल, स्फोटक, कृतिशील, हिंदुरक्षक, क्रांतिकारकाने सामील होणे म्हणजे भारवाहू गाढवांच्या कळपात उत्तम लक्षणांच्या अश्वाने सामील होण्यासारखे होते.

सावरकरांना हिंदुहिताचा भार वाहायचा होता, नेत्यांची मर्जी सांभाळण्याची लाचारी सावरकरांना कदापिही मान्य नव्हती आणि म्हणूनच त्यांच्या तत्वांना, स्वभावाला साजेसा असणाऱ्या ' हिंदुमहासभा ' या एकमेव हिंदुत्ववादी पक्षामध्ये प्रवेश केला. सावरकरांना आपली राजकीय कारकीर्द सुरु करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.

सावरकरांना कित्येक सरकारी किताबधारी, सरदार, जमीनदार, वकील येऊन मिळाले. पण धनिक, श्रीमंत व्यापारी, धनपती आणि उद्योगपती यांनी मात्र काँग्रेसच्याच पाठीमागे राहणे पसंत केले, काँग्रेसलाच आर्थिकबळ दिले.

खरंतर त्यावेळी सावरकरांकडे स्वतः साठी राहायला स्वतःचे घरदेखील नव्हते, धाकटे बंधू नारायणराव हे पेशाने डॉक्टर असल्याने त्यांच्या आर्थिक सहाय्यावरच काही दिवस गुजराण होणार होता. कार्यकर्त्यांनी दिलेल्या थैल्यामधून एक राजकीय पक्ष चालवणे, वाढवणे म्हणजे खायच्या गप्पा नव्हत्या.

स्वतः सावरकर आणि हिंदू महासभा आपल्या कार्यकर्त्यांना, केवळ ध्येयवाद आणि राष्ट्रकार्याचे नैतिक समाधान एवढेच देऊ शकत होती, याउलट काँग्रेसकडे मात्र धनिकांची मोठी फौज होती, काँग्रेसकडे धनलक्ष्मी होती तर हिंदुमहासभेकडे क्रान्तीलक्ष्मी होती.

सावरकरांनी मुक्ततेचे सोपस्कार संपल्यानंतर प्रथम कोल्हापूरला जाऊन, छ. शिवरायांच्या गादीचे दर्शन घेतले, आदराने मुजरा केला, त्यावेळेस ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले की  " हिंदू संस्थाने हीच खरी भारतीयांची शक्ती-केंद्रे आहेत "

त्यानंतर सावरकरांनी पंढरपुरात येऊन महाराष्ट्रसंताना आदरांजली वाहिली, या पंढरपूर दौऱ्यामध्ये त्यांचे स्वागत, मोहोळकर वकील, फणसाळकर वकील, डॉ. व्होरा, बाबुराव घळसासी, पां. तु. उत्पात यांनी केले, रा.स्व. संघाच्या स्स्वयंसेवकांनी त्यांना सैनिकी मानवंदना दिली.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये, बडवे-उत्पात यांनी सावरकरांचा सत्कार केला. या सत्कारानंतर सावरकरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीवर काही नतद्रष्ट कर्मठ मर्कटांनी काळ्या लाह्या फेकून निषेध केला; परंतु मिरवणूक एवढी भव्य होती की हा विरोध कश्चित ठरला.

पुढे दोन वर्षांनी याच पंढरपुरामध्ये हिंदू महासभेने भरीव कामगीरी केली, श्री. शंकरराव (अप्पा) यांच्या नेतृत्वाखाली, भागानगर सत्याग्रहात पहिली तुकडी सामील झाली, त्यानंतर १९४१ साली बिहारमधील भागलपूर आंदोलनामध्ये अटक झालेले, शंकरराव मंगळवेढेकर, भाऊसाहेब काणे, वसंत बडवे ई. क्रांतिकारक मंडळी हि पंढरपूरचीच होती, संतांची मांदियाळी असणाऱ्या पंढरपूरला; सावरकरांनी क्रांतिकारकांची पंढरी बनवली.

पंढरपूरनंतर सावरकरांनी मिरजेस भेट दिली, इथं प्रथमच सावरकरांनी डरकाळी फोडली, विधिमंडळातील काँग्रेसजनांवर अक्षरशः तोफ डागली, सावरकरांचे ते भाषण नसून वडवानलच होते, त्यांचा मुखातून शब्द नव्हे तर निखारेच बाहेर पडत होते असा अनुभव त्या सभेच्या प्रत्यक्ष दर्शींनी लिहून ठेवले आहेत. यानंतर सावरकर पुण्यास आले आणि पुढे दादरला कायमस्वरूपी वास्तव्यास राहिले.

सावरकरांकडे जसा राष्ट्रीय ध्येयवाद होता तशीच सामाजिक दूरदृष्टी देखील होती. काँग्रेसी नेत्यांचा वाढता मुस्लिमधार्जिणपणा, देशाची कायमची डोकेदुखी होणार हे सावरकरांनी केंव्हाच ओळखले होते, सावरकरांनी सांगितले होते की काँग्रेस एक दिवस ' वंदे मातरम ' या राष्ट्रगीताची गळचेपी करून हकालपट्टी करेल; झालेही तेच.

आज स्वातंत्र्याची सत्तरी गाठूनही " भारत माता कि जय " ही घोषणा ' काफीरी ठरते याहून दुर्दैव ते काय ? काँग्रेसची त्यावेळेसची लाचारी ही पुढे जाऊन संस्कृती बनली आणि राजदंडा पेक्षा धर्मांध मुस्लिम धर्मदंडच सरस ठरत गेला.

नागपूरच्या अधिवेशनामध्ये, पाकिस्तानची संकल्पित योजना हाणून पाडण्यासाठी सावरकरांनी हिंदूंना सज्ज राहण्याचा इशारा दिला, त्यावेळी गांधीजींनी मात्र काश्मीरच्या राजा विषयी बोलताना " काश्मीरमधील बहुतांश जनता हि मुस्लिम असल्याने, तेथील राजाने आपले राज्य सोडावे " असे उदगार काढले.

सावरकरांनी त्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली, सावरकर म्हणाले,

" बहुसंख्य प्रजा मुस्लिम आहे म्हणून काश्मीरच्या राजाने राज्य सोडावे असे जर गांधीजी म्हणत असतील, तर त्याच न्यायाने ज्या राज्यात शेकडा ९० टक्के प्रजा हिंदू असूनही छळ सोसत आहे अश्या हैद्राबादच्या निजामाला आणि भोपाळच्या नबाबाला, राज्य सोडून मक्केला जाऊन तोबा करण्याचा सल्ला गांधीजी का देत नाहीत ? "

काश्मीरमधील हिंदुविरोधी कारवायांचा प्रतिबंध करण्याची आवश्यकता सावरकरांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी जाणली होती, परंतु हिंदूंनी आणि काँग्रेसने गांभीर्याने याचा कधीच विचार केला नाही, त्याचे झालेले आणि सध्या होत असलेले परिणाम आज आपण प्रत्यक्षच पाहत आहोत.

सावरकरांचा अभ्यास करत असताना एक बाब लक्षात येते की सावरकरांची कालानुरूप तीन प्रमुख रूपे आहेत,

१) सशस्त्र क्रान्तिकारी 

२) समाजसुधारक-संघटक

३) विश्लेषकाची बुद्धिमत्ता असणारे राजकीय नेतृत्व.

परंतु एक लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे, या तीनही रूपांचा आत्मा एकच आहे तो म्हणजे राष्ट्रहित, म्हणूनच राजकारणात सक्रिय होऊनही सावरकरांनी मत-पेढयांचा (वोट बँक) विचार कधीच केला नाही, जे जे हिंदुहितास बाधक असेल त्याचा त्याचा कडवा विरोधच केला.

हिंदू हितासाठी, हिंदुत्वासाठी राजकीय  सत्ता हे सावरकरांना मान्य होते, परंतु केवळ राजसत्तेसाठी हिंदुत्वाचा अवलंब हे सावरकरांना कधीच पटले नाही. आपल्या स्वतःच्या राजकीय धोरणाबद्दल सावरकर म्हणतात,

              राष्ट्र स्वतंत्रता ध्येयं, यथा साध्यं च साधनं |

               अभ्युथानाय हिंदूंनां, अहं पक्ष: प्रवर्तते ||

अर्थ : हिंदुस्थानचे राजकीय स्वातंत्र्य हे ध्येय, या ध्येयासाठी जमेल त्या साधनांचा वापर आणि हिंदूंचे पुनुरुत्थान या साठीच पक्ष आणि राजकारण.

सावरकरांच्या या धोरणाने असंख्य तरुणांना प्रोत्साहन दिले, नवे राजकीय आणि सामाजीक धोरण दिले, नवी कार्यशक्ती दिली. सावरकर जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांचे जंगी स्वागत होत असे.

ही स्वागते-मिरवणुका पाहून काँग्रेसजनांना पोटशूळ उठत असे, काहींना धडकी भरत असे, सावरकरांचा एकदा सोलापूर दौरा ठरला होता तेंव्हा सोलापूरच्या जाजू नामक एका काँग्रेसी सज्जनाने सावरकरांचा विरोध करताना,

" सावरकर जर सोलापुरात आले तर त्यांची गाढवावरून धिंड काढेन " असे सात्विक आणि अहिंसक उदगार काढले होते, त्यांना उत्तर देताना आचार्य अत्रेंनी त्यांच्या खास शैलीत " जाजूचा जर असा बेत असेल तर सावरकरांना जाजूच्याच खांद्यावर बसावे लागेल, कारण अख्या सोलापुरात जाजू सारखे शहाणे गाढव शोधूनही सापडणार नाही. " असा टोला लगावला होता.

३० डिसेंबर १९३७ रोजी कर्णावती ( अहमदाबाद ), येथे सावरकरांची हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष पदी एकमताने निवड झाली, हिंदूंनी सावरकरांचा सर्वोच्च सन्मान केला होता.

तसे पाहता सावरकर जर काँग्रेससोबत गेले असते तर सत्ता-मत्ता-लोकप्रियता आदि मिळवून पिढयानपिढया सुखासीनतेमध्ये लोळले असते.

पण सावरकरांची तत्व प्रणाली स्वाभिमानी होती लाचार नव्हती, सावरकर स्वतः एकदा म्हणाले होते की,

" राणा प्रतापसिंहासारखे स्वाभिमानी हिंदू, लोकप्रियतेचा विचार करत नसतात, तो मान लाचार गद्दार मानसिंगाचा.

सावरकरांनी हिंदुमहासभेला नवचैतन्य प्राप्त करून दिले, नवे व्यासपीठ दिले नवी घोषणा दिली, नवा ध्वज दिला, कीर्ती दिली.

सावरकरांनी हिंदुमहासभेला लौकिक आणि गौरव प्राप्त करून दिला, तात्कालीन राजकारणामध्ये अभूतपूर्व स्थान प्राप्त करून दिले. सलग सातवर्षे सावरकरांनी हिंदुमहासभेचे अध्यक्षपद  भूषवले, या सात वर्षांमध्ये हिंदू महासभा हा एक प्रबळ पक्ष बनला.

१९४० ते १९४७ या सात वर्षात सावरकरांनी देशभरात असंख्य सभा घेतल्या, भाषणे केली आणि हिंदुराष्ट्राच शंखनाद केला.

१९४१च्या जनगणनेवेळी सावरकरांनी हिंदूंना विनंती केली, की आपले पंथ-उपपंथ, संप्रदाय विसरून आपली नोंद ' हिंदू ' म्हणून करा; परंतु हिंदूंनी ऐकले नाही, काँग्रेसनेदेखील यावर विरोध करत ' हिंदू ' म्हणून नोंद न होऊ देता पंथनिहाय नोंदी होऊ दिल्या, त्यामुळे पंजाब, बंगालप्रांतामध्ये हिंदू अल्पसंख्याक तर मुस्लिम बहुसंख्यांक ठरले. परिणामतः हे दोनही भाग हिंदुस्थानपासून तोडले गेले.

सावरकर एकदा म्हणाले होते की, पाकिस्तानची निर्मिती स्वाभिमानशुन्य आणि पंथोपंथांची जोखडे वाहणाऱ्या हिंदूंनीच केली.

आजच्या काळामध्ये देखील, हिंदुसमाज जात-वर्ण-पंथ-संप्रदाय यांच्या अस्मितेसाठी जितका आक्रमक असतो, एकजूट असतो तितका हिंदुत्वासाठी असत नाही, देशाचे दोन तुकडे होऊनही जर हिंदूंना जाग येत नसेल तर या देशाचे आणखीनही तुकडे होऊ शकतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सावरकरांनी, हिंदू तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले,

सावरकरांच्या मते या सैनिकीकरणामुळे हिंदू तरुणांना आयतीच शस्त्रे मिळतील आणि याचाच फायदा घेऊन सैन्यबळाच्या जोरावर इंग्रजांना जेरीस आणता येईल.

शत्रूवरील संकट ही त्याला नामोहरम करण्याची संधी असते हे राजतंत्र आहे, पण गांधीजींनी मात्र याचाही विरोधच केला.  " शत्रू संकटात असताना त्याला त्रास देणे योग्य नाही " असे मत मांडले.

याच दरम्यान अचानक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकरांची भेट घेतली, या भेटीत सावरकरांनी नेताजींना

क्रान्तिकारी रासबिहारी बोस यांचे पत्र दाखवले, त्या पत्रावर नेताजी आणि सावरकर यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर वर्षा-दीड वर्षातच नेताजी भारता बाहेर गेले आणि त्यांनी ' आझाद हिंद फौज ' उभारली.

सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणामुळे नेताजींना भारतीय सैनिक मिळाले होते, स्वतः नेताजींनी दि. २५ जून १९४५ रोजी याबद्दल सिंगापूर नभोवाणीवरून सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.

सावरकरांच्या सैनिकीकरणाचे फलित केवळ नेताजींपर्यंतच मर्यादित नव्हते तर याचा फायदा फाळणीनंतरही झाला. सावरकरांच्या सैनिकीकरण चळवळीपूर्वी सैन्यात तीन चतुर्थांश मुसलमान होते परंतु चळवळीनंतर महायुद्धसंपताना हिंदू सैनिकांची संख्या तीन चतुर्थांश झाली.

पाकिस्तान निर्मितीनंतर मुस्लिम सैन्य पाकिस्तान निघून गेले तेंव्हा याच हिंदू सैन्याच्या आधारावर देशांतर्गत परिस्थिती सांभाळण्यात यश आले. एका सावरकर भक्ताने सैन्यातून मिळवलेल्या आकडेवारीनुसार सैनिकीकरणापूर्वी भारतीय सैन्याची संख्या ही सहा लाख होती तर तीच पुढे जाऊन सहवीस लाख झाली, याच सैन्याचा बळावर हैदराबादचा निजाम वठणीवर आणला गेला हे एक ऐतिहासिक सत्य आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तात्कालीन नेत्यांनी आपापली धोरणे स्पष्ट केली होती, नेहरूंनी ब्रिटनच्या अडचणीचा फायदा घेण्याची आणि सौदेबाजी करण्याची भारताची इच्छा नाही, असे पत्रकांद्वारे घोषित केले.

मुस्लिम लीगने मुसलमानांना समाधानी केल्यास आणि विशेष म्हणजे अरबांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या अटींवर ब्रिटनला पाठिंबा देण्याचा मानस बोलून दाखवला. ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन आगाखानने केले. युद्ध पुकारणे आणि तह करण्याच्या परराष्ट्रीय धोरणात, भारताला काडीचीही किंमत न दिल्याने डॉ. आंबेडकरांनी खेद व्यक्त करत विरोध दर्शवला.

हिंदुमहासभेचे अध्यक्ष या नात्याने सावरकरांनी घोषित केले की, हिंदुस्थानला राजकीय दास्यात खितपत ठेवले आहे तोपर्यंत, ब्रिटनच्या युद्ध सहभागाच्या भूमिकेबद्दल शंकाच राहील " थोडक्यात एवढेच की सावरकरांचे-आंबेडकरांचे म्हणणे होते की, भारताने या युद्धात ब्रिटनच्या पाठीमागे उभा राहताना; केवळ ब्रिटिश साम्राज्यातील एक वसाहत म्हणून उभे न राहता, स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा तसेच अधिकार मिळवूनच उभे रहावे.

एकदा महाराज्यपाल ' लॉर्ड लिलींथगोला ' सावरकरांना भेटण्यास आले होते, त्यांना सावरकरांचे महायुद्धासंदर्भात मत जाणून घ्यायचे होते. सावरकरांनी त्यांना प्रांजळपणे सांगितले कि " स्वातंत्र्यप्राप्ती याच राजकीय धोरणावर सैनिकीकरणाला पाठिंबा देण्याची माझी तयारी आहे. "

यानंतर हिंदुस्थानवर नेमक्या कोणत्या बाजूने हल्ला होऊ शकतो, त्यासाठी कोणत्या पलटणी कुठे तैनात कराव्यात यांवर सावरकर बराच वेळ बोलत होते. सावरकरांचे आंतरराष्ट्रीय युद्धनीतीचे ज्ञान आणि सैन्याच्या हालचालींच्या धोरणनिश्चितीची जाण पाहून महाराज्यपाल विस्मयचकित झाले.

" भारतीयांच्या हिताची, युद्धपरिस्थितीची जाणकारी चर्चा करणारे तसेच आंतरराष्ट्रीय समस्यांचे अचूक विवेचन करणारे सावरकर हे एकमात्र राजकारणी आहेत " असे मत महाराज्यपालांनी आपल्या सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अनेकदा बोलून दाखवले.

स्वातंत्र्यानंतर जर सावरकर हिंदुस्थानला संरक्षण मंत्री म्हणून लाभले असते तर कदाचित जम्मू - काश्मीर चे खोरे आज खऱ्या अर्थाने  " भारताचे नंदनवन " ठरले असते.


Comments

Unknown said…
अतिशय सुरेख लेखन केले आहे दादा.आणि आ.अत्रे यांचे जाजू ना दिलेले उत्तर तर कमाल👌👌👍