सावरकर एक दीपस्तंभ : भाग ४ था.

 



                फाळणी, गांधी हत्या आणि सावरकर

 

१६ जुलै १९४४ रोजी काँग्रेस नेते रामजींनी गांधीजींच्या अनुमतीने काढलेल्या पत्रकात, मुस्लिम लीगच्या

सर्व मागण्या मान्य करून पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यता दिली. या पत्रकामध्ये हि मान्यता दोन वर्षांपूर्वीच दिली गेली आहे  असेही नमूद करण्यात आले होते.

सावरकर आणि हिंदुमहासभेने या फाळणीला तीव्र विरोध केला; एवढेच नव्हे तर काही राष्ट्रवादी काँग्रेसजनांनी देखील फाळणीला विरोध केला होता.

फाळणीला विरोध करण्यासाठी पाच हजार सभा झाल्या, पन्नास हजार स्वाक्षऱ्या गोळा केल्या गेल्या परंतु चर्चा मात्र थांबलीच नाही. फाळणीला झालेला विरोध पाहता, जनतेला हि फाळणी मान्यच नव्हती असेच वाटते, परंतु जिना जिंकले आणि सामान्य जनता मात्र हरली.

१६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने भीषण दंगली घडवल्या, निरपराध हिंदूंचे डोळे फोडले, हिंदूंची घरे, मालमत्ता यांची राजरोस पणे लूट झाली, लक्षावधी हिंदूंची कत्तल झाली आणि धर्मान्तरे झाली.

हा सरळ सरळ अन्याय होता, अनीती होती, मानव्याची क्रूर चेष्टा होती, राष्ट्रवादाचा घोर अवमान होता. परंतु काँग्रेस, समाजवादी आणि कम्युनिस्टांनी याला वेगळाच रंग दिला, गरीब मुसलमान श्रीमंत हिंदू सावकाराना लुटत आहेत असे चित्र बाकी जनतेपुढे उभे केले. हिंदूंचे रक्षण करण्यामध्ये काँग्रेस १०० टक्के अपयशी ठरली. प्रतिकार करणाऱ्या हिंदूंनाच दंगलखोर ठरवून, गोळ्या घालण्याची धमकी नेहरूंनी दिली.

एकीकडे काँग्रेस हिंदूंचे रक्षण स्वतः तर करीत नव्हतीच पण हिंदूंना आत्मरक्षा सुद्धा करू देत नव्हती.

आई खाऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना अशीच हिंदूंची गत झाली.

आता मात्र हातावर हात ठेवून गप्प बसणे हिंदू महासभेला शक्य नव्हते, गावोगावी पेटलेल्या दंगलीत हिंदूंचे रक्षण करण्यासाठी, हिंदूंना शक्य ती मदत करण्यासाठी सावरकर आणि हिंदुमहासभा अहोरात्र झटत होती. परंतु केवळ सहानभूती दाखवून शांतता मिळणार नव्हती, हिंदूंचे नुकसान थांबणार नव्हते, म्हणूनच सावरकरांनी तातडीने " हिंदुराष्ट्र दलाची " स्थापना केली.

या दलाच्या तरुण, जहाल कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात मुस्लिम दंगेखोरांना चांगलेच वठणीवर आणले. दंगलीच्या वणव्यापासून वाचण्यासाठी जे हिंदू, मुसलमान झाले होते त्यांना शुद्ध करून परत हिंदू करण्यात आले.

या साऱ्या परीस्थिती बद्दल बोलताना सावरकर म्हणाले " काँग्रेसला किंवा कोणत्याही सदस्याला देशाचे तुकडे करण्याचे अधिकार नाहीत, फाळणी करावी की नाही यांवर सार्वमत घेऊनच निर्णय घ्यावा, पाकिस्तानचा प्रश्न मूलभूत हिंदू समाजाला पिढ्यान-पिढ्या उपद्रवकारक ठरणार आहे "

सावरकरांची ही वाणी देखील खरी ठरली, फाळणीनंतरची साधारणपणे आताची हि चौथी पिढी देखील पाकिस्तानी दहशतवाद पहाताच आहे, भोगतच आहे.

फाळणीच्या निषेधार्थ ३ जुलै १९४७ हा ' सुतक दिन ' म्हणून हिंदुमहासभेच्यावतीने  पाळण्यात आला,

या मध्ये कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेसने सहयोग दिला नाही. सावरकर तेंव्हा गरजले,

" आम्ही हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहोत, परंतु जर देशाची धुरा जर राजकारण्याकडेच राहणार असेल तर राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा. "

पण अखेर १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री, ऋषीमुनींच्या मंत्रोच्चाराने, पराक्रमी हिंदू राजांच्या शौर्याने, पंडित महापंडितांच्या पांडित्याने, नानाविध कलेच्या अधिपतींच्या कौशल्याने मंडित असणारी हि भरतभूमी, हिंदभूमी, देवभूमी खंडित झाली, लक्षावधी हिंदूंच्या रक्ताने माखलेल्या मातीतून पाकिस्तानचा जन्म झाला.

आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी खंडित-रक्तरंजित भारत स्वतंत्र झाला.

सावरकरांनी, स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज ' तिरंगा ' आणि हिंदुमहासभेचा कुंडलिनी कृपाणांकित ' भगवा ध्वज ' असे दोनही ध्वज ' सावरकर सदनावर ' फडकवून स्वातंत्र्यलक्ष्मीचे स्वागत केले.

देशाची फाळणीची जखम रुतत असली तरी; इंग्रजांच्या दास्यातून आपली प्रियतम मातृभूमी मुक्त झाली याचाच आनंद मानणे हेच सावरकरांतील राष्ट्रप्रेमींचे लक्षण आहे.

देशाची अनिच्छेने झालेली फाळणी, हिंदूंची झालेली कत्तल, मोठ्याप्रमाणात  झालेली नाहक हिंसा, या मुळे काँग्रेसजनच नव्हे तर सर्व सामान्य जनतेचा काँग्रेस आणि गांधीजींवरचा विश्वास उडाला. श्रद्धेची जागा क्रोधाने घेतली. तरीही गांधीजी मात्र अजूनही मुस्लिम अनुनय सोडतच नव्हते.

एकीकडे पाकिस्तानमधील हिंदूंची घरे, संपत्ती विस्थापित मुस्लिमांनी राजरोस पणे बळकावली पण गांधीजींनी मात्र पाकिस्तानवरून येणाऱ्या निर्वासित हिंदूंना मुस्लिमांची घरे घेण्यास, मशिदीमध्ये राहण्यास मज्जाव केला. या असल्या गांधाळ धोरणांमुळे निर्वासितांचा प्रश्न चिघळतच राहिला.

पंजाब कडील भागात निर्वासितांच्या तळावर, अमानुष हल्ले होऊ लागले. पाकिस्तानवरून येणारी आगगाडी हिंदूंच्या मूडद्यानी खचाखच भरलेली असे. काही मूडद्यांच्या कपाळावर, ' आझादीका तोहफा ' असे गोंदवून पाठवण्यात आले. कित्येक हिंदूंना अग्निसंस्कार देखील मिळाले नाहीत.

तसे पाहता पाकिस्तानची प्रत्येक मागणी गांधीजींनी हट्टाने पूर्ण केली पण तरीही हिंसाचार का झाला ? याचे उत्तर ना गांधीजी देऊ शकले ना काँग्रेस पण खरोखरंच जर कोणाला याचे उत्तर हवे असेल तर, त्यांनी महंमद गझनी पासून ते महमंदअली जिनापर्यंतच्या इस्लामीक महत्वाकांक्षी राज्यकर्त्यांचा इतिहास जरूर अभ्यासावा, त्यातच १९४७ सालच्याच नव्हे तर आजपर्यंत झालेल्या प्रत्येक दहशदवादी हल्ल्याची कारणमीमांसा, मानसिकता आणि उगम स्थान नक्की  सापडेल असा आम्हांस विश्वास आहे.

फाळणीनंतरच्या कालावधीत गांधीजींची विधाने, कृत्ये यामुळे गांधीजींवरच्या रागाने, अखेर गांधीजींचा बळी घेतला. ३० जानेवारी १९४८ रोजी, ' नथुराम विनायक गोडसे ' या तरुणाने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली, त्यानंतर त्याच ठिकाणी गोडसे स्वतः हुन पोलिसांच्या स्वाधीन झाले.

आजन्म केवळ आणि केवळ अहिंसेचेच व्रताचरण करणाऱ्या गांधीजींना, मरण मात्र हिंसक मार्गाने यावे हा दैवदुर्विलासच आहे.

काहीही असले तरी गांधीजींसारखा ' मास लीडर ' भारतात पुन्हा कधीही झाला नाही हे सत्य नाकारता येणार नाही. या घटनेनंतर देशभरात दंगली उसळल्या, गोडसे हे ब्राम्हण ज्ञातीचे असल्याने अनेक ब्राह्मणांची घरे लुटून जाळण्यात आली. नथुराम गोडसे-गांधीजी आणि गांधीहत्या यांच्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या ब्राम्हण समाजाला मात्र हे भोगावे लागले हेही सत्य नाकारता येणार नाही.

वास्तवात ' नथुराम विनायक गोडसे ' हे नाव त्या क्षणापर्यंत विशेष कोणास ठाऊक नव्हते परंतु ३० जानेवारी १९४८ नंतर गेली ७० वर्षे या नावाची चर्चा होतच राहिली आणि आजही होते आहे.

गोडसे हिंदुत्ववादी असल्याने गांधीहत्येच्या बादरायण संबंध सावरकरांशी जोडण्यात आला, सावरकर हिंदुत्ववादिंचे नेते आणि गोडसे हे हिंदुत्ववादी केवळ याच कारणावरून सावरकरांना गांधीहत्येसाठी जबाबदार मानण्यात आले.

३० जानेवारी १९४८ संध्याकाळी ५:३० वा. गांधीहत्या घडली, यानंतर अवघ्या काही तासांतच सावरकरांचे अंगरक्षक ' अप्पा कासार ' यांना अटक झाली.

३१ जानेवारीच्या सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास शेकडोंच्या प्रक्षुब्ध जमावाने ' सावरकर सदनावर ' हल्ला केला, सावरकर त्यावेळी आपल्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत होते. सावरकर-सदनाच्या तळमजल्यावर सावरकरांचे माजी कार्यवाहक भिडे राहत होते; हल्लेखोरांनी त्यांच्या जागेत हैदोस मांडला. तोडफोड आणि नासधूस केली. जमावाला आता प्रत्यक्ष सावरकरच हवे होते. परंतु सावरकरांचे सचीव बाळ सावरकर आणि अनुयायी भास्कर शिंदे यांनी जमावाला रोखून धरले. तशाही परिस्थितीत सावरकर जमावाला सामोरे जाण्यासाठी ठामपणे तयार झाले, लंडन मध्ये असताना अनेकदा अश्या जमावाला सावरकरांनी तोंड दिले होते. याप्रसंगी सावरकरांसोबत त्यांचा मुलगा विश्वास आणि सौभाग्यवती हे देखील तयार होते.

परंतु येनकेन प्रकारेन शिंदे आणि बाळ सावरकर यांनी जमावासोबत केलेला वेळ काढूपणा यशस्वी झाला, काही अनुचीत घडण्याआधीच पोलीस तेथे पोहोचले आणि नाईलाजाने हल्लेखोर मागे फिरले. सावरकर वाचले परंतु रक्तपिपासू जमाव मात्र अजूनही धुमसतच होता, त्यांनी आपली रक्ततृष्णा भागवण्यासाठी नारायण सावरकरांच्या घरावर हल्ला चढवला.

नारायणरावांना,  सावरकर सदनामध्ये घडलेल्या उत्पाताचा वृत्तांत समजण्याआधीच जमावाने हल्ला चढवला, पेशाने डॉक्टर असणाऱ्या नारायणरावांना खेचून रस्त्यावर आणले गेले, त्यांना अमानुष मारझोड करण्यात आली, त्यांच्या डोक्यात दगड घालून ठेचून-ठेचून रक्तबंबाळ करण्यात आले, रक्ताच्या थारोळ्यात नारायणराव बेशुद्ध होऊन पडले.

नारायणरावांना बेशुद्ध झालेले पाहून, हल्लेखोर पळून गेले. उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी नारायणरावांना इस्पितळात हलवण्यात आले त्यांच्या डोक्याला प्राणघातक जखमा झाल्या होत्या अगदी थोडक्यात नारायणराव वाचले.

१ फेब्रु ते ५ फेब्रु या चार दिवसांत हिंदुमहासभा, रा. स्व. संघ तसेच हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते, वकील, कार्यकर्ते अश्या सुमारे २५०० जणांना अटक करण्यात आली. रा. स्व. संघाला बेकायदेशीर ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली खरंतर सावरकरांवर हल्ला होण्यापूर्वीच सावरकरांनी गांधीहत्येचा निषेध केला होता; तसेच या प्रसंगी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश देणारे पत्रक काढले होते पण तरीही हल्ला हा झालाच.

४ फेब्रुवारीच्या भल्या पहाटे (३-३:३० बहुदा ) सावरकरांना सुरक्षेच्या निर्बंधाखाली अटक करण्यात आली.

इतिहासाच्या रंगमंचावर आता एका राजकीय नाट्याची संहिता घडत, या नाटकाचा सूत्रधार सरकार होते तर अनेक पोलीस अधिकारी, राजकीय नेते, काँग्रेसी वृत्तपत्रे हि आपापली ठरवून दिलेली भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज होत होते.

गोडसेंनी, गांधीजींना अगदी उघडपणे मारले होते आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी देखील स्वतःवरच घेतली होती परंतु गोडसे हे सहखलनायक असून खरे खलनायक सावरकरच आहेत अश्या कपोल-कल्पित कथानकाची उभारणी करण्यात आली.

नाटकाचा मुहूर्त ठरला, २७ मे १९४८, नेमक्या याच दिवशी सावरकरांची पासष्टी पूर्ण होत होती, अर्थात हा शुद्ध कुयोग होता.

फेब्रु १९४८ पासून उभाळलेला हिंसाचार एप्रिल १९४८ पर्यंत बराच शमला होता. त्याच प्रमाणे या खटल्यामध्ये नेमके कोणाकोणाला अडकवायचे हे देखील निश्चित होत आले होते.

फेब्रु ते एप्रिल दरम्यान सर्व साक्षींची नोंद करण्यात आली दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार झाला. नथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्तय्या, गोपाळ गोडसे, डॉ. परचुरे आणि विनायक सावरकर अशा आठजणांना प्रमुख आरोपी ठरवण्यात आले.

माफीचा साक्षीदार दिगंबर बडगेने या कटात सावरकरांचा सहभाग होता अशी साक्ष दिली परंतु हि साक्ष मदनलाल आणि शंकर यांच्या साक्षीने खोटी ठरली.

बाकी इतरांनी देखील सावरकरांचा काटातील सहभाग स्पष्टपणे नाकारला. वास्तवात सावरकरांना दोषी ठरवेल असा कोणताही पुरावा सरकारकडे नव्हता परंतु केवळ सावरकरांप्रती असणारा द्वेष आणि सूडबुद्धी यांच्या आधारावर उभारलेला खटल्याचा इमला न्यायालयामध्ये कोसळून-कोलमडून पडला.

पुढील सात महिन्यात, १४९ साक्षीदारांच्या साक्ष तपासण्यात आलया, उलट तपासण्या करण्यात आल्या, एकंदरीत ८४ दिवस न्यायालयाचे कामकाज चालले.

अखेर १० फेब्रुवारी १९४९ रोजी न्यायालयाने आपला अंतिम निर्णय दिला. खास न्यायाधीश श्री. आत्माचरण यांनी ठीक सकाळी अकरा वाजता निकालपत्र वाचण्यास आरंभ केला.  निकालपत्राचे वाचन करत असताना सावरकर, बडगे आणि गोडसेंच्या साक्षींचा संदर्भ देत अंततः निर्णय घोषित केला,

 " आरोपी क्र. आठ, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर सरकारवातीने ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध झालेले नसून ते दोषी नाहीत असे आढळून आले आहे आणि म्हणूनच त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. ते सध्या कैदेत आहेत, इतर काही कारण नसल्यास त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावे. "

नथुराम गोडसे, नारायण आपटेंना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. पुढे जाऊन पंजाब न्यायालयाने शंकर किस्तय्या आणि डॉ. परचुरे यांना मुक्त केले.

सावरकरांच्या मुक्ततेचा निर्णय घोषित करताक्षणीच, दिल्ली दंडाधिकाऱ्याच्या आदेशानुसार सावरकरांना लाल किल्ला सोडून जाण्यावर बंदी घातली गेली.

पुढे काही तासांनी, पंजाब सार्वजनीक सुरक्षा निर्बंधाखाली सावरकरांवर तीन महिने दिल्ली प्रवेश बंदीचा हुकूम बजावून कडक पहाऱ्यात, मुंबईकडे रवाना करण्यात आले.  १२ फेब्रु. १९४९ रोजी सकाळी साडेदहा वाजता सावरकर, दादर स्थानकावर आले. पुढे मोटारीने त्यांना सावरकर-सदनापर्यंत पोहोचवण्यात आले.

गांधी हत्येच्या गलिच्छ आरोपातून निर्दोष सुटका होऊनही, काही सावरकरद्वेषी माणसे, अजूनही त्यांना बदनाम करतच आहेत.  सावरकरांना हत्येचे दोषी ठरवताना, विरोधक मंडळी ज्या नियमबाह्य कपूर आयोगाचा हवाला देतात त्याचा निकाल नीट वाचून पाहावा म्हणजे, त्याही असत्याचा डोलारे निमिषार्धात कोसळून पडतील. 

४ फेब्रु. १९४८ ते १० फेब्रु. १९४९ या वर्षभराच्या तुरुंगवासाने, खोटारड्या खटल्याने सावरकरांना झालेले मानसीक क्लेश हे अंदमानातील शारीरिक क्लेशांपेक्षा अनंत पटीने वेदनादायक होते, परंतु खवळलेल्या समुद्राच्या उन्मत्त लाटांचे प्रलयंकारी प्रहार झेलत, ज्याप्रमाणे एखादा दिपस्तंभ अविचल, निश्चलपणे उभा राहून, प्रवाश्यांना प्रकाशवाटा दाखवतच राहतो त्याच प्रमाणे सावरकर एक दीपस्तंभ बनून  व्यथित परंतु तरीही अविचलपणे उभे राहून या हिंदुस्थानला आपला अनुभव, दूरदृष्टी, द्रष्टेपणा यांच्या माध्यमातून ज्ञान प्रकाश देतच राहिला.

पुढील भागातून, सावरकरांच्या अंतिम पर्वाची मीमांसा करून या लेखमालेची सांगता करत आहोत. 

Comments

उत्तम मांडणी. धगधगत्या अग्निकुंडाची धगधती कहाणी ....