।। गाथा महाराष्ट्राची ।।




।। गाथा महाराष्ट्राची ।।

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

उठा उठा हो मरहट्ट्यानो, सांगतो गाथा महाराष्ट्राची

गाथा सांगतो जन्मभूमीची, धर्मभूमी अन पुण्यभूमीची ।।धृ ।।

असे जन्मभू ही वीरांची, असे कर्मभू ही संतांची
असे मायभू ही वाघांची, असे जन्मभू ही छाव्यांची ।। १ ।।

असे भूमी ही गुणवंताची, असे भूमी ही कलावंतांची
असे भूमी ही नितीवंतांची, असे भूमी ही कीर्तिवंतांची ।। २ ।।

जन्मभूमीही सत्यशोधकांची, जननी ही सुधारकांची
उत्पत्ती येथेच हिंदुत्वाची, हीच जन्मभू चळवळींची ।। ३ ।।

जन्मभूमीही अभिनेत्यांची, कर्मभूमीही लोकनेत्यांची
जन्मभूमीही खेळाडूंची, कर्मभूमीही साहित्यिकांची ।। ४ ।।

या भूमीनेच रचली मेढ स्वातंत्र्याची
शिव शंभूंनी लाज राखली सदैव धर्माची ।। ५ ।।

या भूमीनेच लाज राखली ती बुदेल्यांची
त्वरे धावले वायुवेगे ते राव बाजी ।। ६ ।।

हिमालयाला साथ झाली केवळ सह्याद्रीची
नका विसरू आठवण ती पानिपताची ।। ७ ।।

सह्याद्रीचे सिंह आम्ही, भीती ना कोणाची
उंच आभाळी सदा फडकवू, ध्वजा धर्माची ।। ८ ।।

संस्कृती येथे वारकऱ्यांची, परी परंपरा ही धारकऱ्यांची
भल्यासी देऊ लंगोट कासेची, परी फितुरांसी शिक्षा चौरंग्याची  ।। ९ ।।

गाथा ऐसी महाराष्ट्राची, शिव शंभूंच्या राज्याची
गाथा असे ही सहकार महर्षी अन शिक्षण महर्षींची ।। १० ।।

आता सांगतो ऐका श्रोते, व्यथा सह्याद्रीची
रेवा, भीमा, कृष्णा अन कोयनेच्या तीरांची ।। ११ ।।

पूर्वज लढले एकदिलाने, राखण्या लाज राष्ट्राची
नका करू हो माती आता, इथल्या ऐक्याची ।। १२ ।।

नका वाढवू विषवल्ली ती, जाती अन वर्णाची
वज्रमूठ ही आता बांधू, अठरा पगड्यांची ।। १३ ।।


                                                        © श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments