मुक्त चिंतन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 


सर्वप्रथम आमच्या समस्त वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनेक शुभेच्छा !

परिस्थितीची अनुकूलता आणि प्रतिकूलता या मानवी आयुष्याच्या महत्वाचा घटक आहेत. बरेचजण अश्या प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबुद्ध होतात आणि परिस्थितीला शरण जातात. महाकाय प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय रोवून जे स्वतःचे तेज प्रकट करू शकतात ते आणि तेच या समाजाचा उद्धार करू शकतात.  पण असे करण्याकरता विलक्षण मनःसामर्थ्य आणि झुंझार मनोवृत्ती असावी लागते त्याशिवाय संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होत नाही. 

अश्याच झुंझार व्यक्तिमत्वातील एक अग्रणी नाव म्हणजे, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे होय. 

शूद्रातिशूद्र समजल्या गेलेल्या आणि हजारो वर्षांच्या अन्यायाने भरडून निघालेल्या, सदैव आर्थिक सामाजिक आणि धार्मिक मागासलेपणाचा मानवनिर्मित शाप लाभलेल्या ज्ञातीमध्ये जन्म घेतलेले डॉ.आंबेडकर जेंव्हा विश्ववंदनीय ठरतात तेंव्हा त्याला चमत्कार म्हणावे असे वाटते. पण हा काही कपोलकल्पित जादूची कांडी फिरवून घडलेला चमत्कार नव्हता तर त्यामागे कठोर, खडतर अशी तपश्चर्या होती. समाजाचा उद्धार करण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा केलेला तो होम होता. 

डॉ.आंबेडकरांच्या चरित्रामध्ये पदोपदी त्यांनी केलेला संघर्ष स्पष्ट दिसतो, संघर्षमय जीवनातही त्यांनी काही गोष्टी जपल्या होत्या. सात्विक, सत्शील आणि धार्मिक वृत्तीच्या माता पित्यांच्या सहवासामुळे, डॉक्टरांची वृत्ती देखील सत्शील आणि समतोल होती. वयाच्या सहाव्या वर्षी जरी मातृछत्र हरपले असले तरी आपल्या पुण्यशील मातेकडून मिळालेला सत्शीलतेचा वारसा त्यांनी अखेर पर्यंत जपला. त्याचप्रमाणे आपल्या पित्याकडून मिळालेली निर्व्यसनीपणाची शिकवण त्यांनी अखेरपर्यंत लक्षात ठेवली. यावरून हे स्पष्ट होते की, दैन्य आणि दारिद्रय हे कधीच व्यसनाधीन होण्यास कारणीभूत ठरत नाहीत, व्यसनाधीनता हे केवळ मनाच्या कमकुवतपणाचे देणे असते.  

" विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी " या वचनावर डॉक्टरांच्या वडिलांची अढळ श्रद्धा होती, तीच श्रद्धा त्यांनी आपल्या मुलांमध्ये रुजवली होती. त्यामुळे विद्याप्राप्तीचा ध्यास डॉ.आंबेडकरांना माध्यमिक विद्यायालात असतानाच लागला होता. परळ मधील डबक चाळीतील धुरकट, घरगुती वस्तुंनी ठासून भरलेली, एका कोपऱ्यात जळावू लाकडांचा साठा तर दुसऱ्या कोपऱ्यात चूल, कधी पायाशी एखादी बकरी धापा टाकत बसलेली असूनही डॉक्टरांनी आपला अभ्यास चिमणीच्या मिणमिणत्या प्रकाशावर निरंतर चालू ठेऊन मॅट्रिक परीक्षेत यश संपादन केले होते हे विशेषच आहे. केवळ परिस्थिती आणि संसाधने याची कारणे देणाऱ्या आळशी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांचा विद्यार्थी दशेतील संघर्ष आदर्श मानावा असेच मला वाटते.

डॉ. आंबेडकरांच्या चरित्रातून मला भावलेली पुढील बाब म्हणजे, मिळालेल्या संधीचे सोने करणे. 

बडोदा नरेश श्रीमंत सयाजी गायकवाड यांनी शिष्यवृत्ती देऊन डॉ.आंबेडकरांना अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. अमेरिकेसारख्या सुखलोलुप प्रदेशामध्ये गेल्यानंतर, विश्वविद्यालयीन विद्यार्थी सुखविलासात रमत असत परंतु आपल्याला मिळालेली संधी, ही सुखोपभोगासाठी नसून ती विद्याप्राप्तीसाठी आहे याचे पूर्ण भान आंबेडकरांना होते. शिष्यवृत्तीच्या पैश्यातून ते केवळ जीवनावश्यक आहार घेण्याकरता खर्च करीत आणि त्यातूनच काही रक्कम आपल्या पत्नीला पाठवत असत. यादरम्यान त्यांना १८-१८ तास अभ्यास करताना, हात आखडता ठेवून खर्च करताना पाहून नंतर त्यांचे सहकारी सांगत " आयुष्यात मिळालेल्या या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी प्रत्येक क्षण सोन्याचा मानून, अभ्यासासाठीच व्यतीत केला.धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला " शिक्षणाकरता बाहेर राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थानी आंबेडकरांचे अमेरिकेतील हे कष्ट मनावर कोरून ठेवावेत आणि उपलब्ध झालेल्या धनाचा सुयोग्य विनियोग करावा असाच संदेश यातून मिळतो. 

डॉ.आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वातील पुढील पैलू म्हणजे, पत्रकारिता. विश्वद्यालयातून विद्या संपादन करताना त्यांना जाणवलेली एक महत्वाची बाब म्हणजे, भारतातील उपेक्षित, सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत ठरलेल्या समाजाचा जर उद्धार करायचा असेल तर, त्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हे होय. त्याचप्रमाणे समाजामध्ये जागृती आणणे होय. याकरता त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही नियतकालिके सुरु केली होती. विशेष म्हणजे या नियतकालिकांचे सर्व अर्थकारण केवळ बाबासाहेबांची वैयक्तिक कमाई आणि थोडीबहुत लोकवर्गणी यावरच चालू होते. 

बऱ्याचदा त्यांची पत्रे ही आर्थिक अडचणीत सापडत परंतु अश्या परिस्थिती देखील त्यांनी पत्रकारितेवरची निष्ठा ढळू न देता, आपले विचार निर्भीडपणे समाजापुढे मांडले. केवळ दांडगी वर्गणी मिळावी किंवा काही धनलाभ व्हावा या करता कधीही कसलीही तडजोड त्यांनी केली नाही. यावरून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेचे त्यांनी ठेवलेले पावित्र्य समजते. 

पत्रकाराचा निर्भीडपणा, भाषेवरील प्रभुत्व, कोणत्याही घटनेचे निष्पक्ष विश्लेषण याच प्रमाणे आपण ज्या व्यवसायात (प्रोफेशन) आहोत त्याच्या प्रति आवश्यक प्रामाणिकपणा जपणे आदी गुण बाबासाहेबांच्या पत्रकारितेमधून शिकण्यासारखा आहे. 

अस्पृश्योद्धारक डॉ. आंबेडकर, हा त्यांचा पैलू जेंव्हा विचारात घेतला जातो तेंव्हा त्यातून त्यांच्या अनेक इतर पैलूंचेही दर्शन घडते, जसे की, उत्तम वक्ता, आंदोलक, धर्मचिकित्सक, समाजसुधारक ई. 

सहस्त्रावधी श्रोत्यांपुढे जेंव्हा डॉ. आंबेडकर भाषण करत असत तेंव्हा ती भाषणे, अत्यंत सध्या सरळ आणि सोप्या शैलीमध्ये असत. समोरील श्रोत्यांवर छाप पाडावी म्हणून विनाकारण अलंकारीक किंवा शब्दांचे खेळ त्यांनी आपल्या भाषणातून केले नाहीत. स्पष्ट उच्चार, खणखणीत आवाज आणि मुख्य म्हणजे समाजाच्या नेमक्या प्रश्नांना हात घालण्याची सचोटी आणि समाजाबद्दलची तळमळ हीच त्यांच्या वक्तृत्वाची प्रमुख वैशिष्ठये असत. 

त्यांनी केलेली आंदोलने ही सर्वश्रुतच आहेत पण त्यातील महत्वाची बाब म्हणजे ही सर्व आंदोलने १०० टक्के अहिंसक आणि नियम पाळून केलेली होती. गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप बंड करून उठेल हेच तत्व त्यांनी समाजजागृतीसाठी अवलंबले होते. पण असे बंड करत असताना आपल्या आंदोलनाची झळ संबंध नसणाऱ्या सर्वसामान्य जनतेला बसणार नाही याचे भानही त्यांनी ठेवले होते. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा आंदोलन हे एक उदाहरणा दाखल घेता येईल.  आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात आंदोलनद्वारे वाचा फोडणे हे गैर नाही परंतु असे करत असताना, सार्वजनिक मालमत्तेचे आणि निरपराध जनतेचे नुकसान होणार नाही याचे भान राखण्याची सद्सद्विवेकबुद्धी डॉ.आंबेडकरांकडून घेण्यासारखी आहे. 

समाजसुधारक, धर्मचिकित्सक डॉ आंबेडकर या पैलूंचा विचार करता, डॉ.आंबेडकरांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांवर कडाडून हल्ला केलेला आढळतो. पण हा हल्ला करत असताना धर्मग्रंथातील केवळ समाजहितकारी नसणाऱ्या बाबींवरच त्यांनी आक्षेप घेतलेला दिसतो, डॉ.आंबेडकरांनी केलेले मनुस्मृतीचे दहन हे सर्वश्रुत आहे परंतु पुढे जाऊन हिंदू कोड बिल बनवताना बहुतेक कायदे हे मनुस्मृतीचे संदर्भ घेऊनच बनवले होते हे देखील विसरता येणार नाही. त्यामुळे त्यांचा विरोध हा काही आंधळा किंवा द्वेषभावनेतून निर्माण झालेला नसून समाजरचनेमध्ये, कायद्यांमध्ये कालानुरूप आवश्यक त्या सुधारणा व्हाव्यात याच करिता होता. 

डॉ.आंबेडकरांच्या टीकांचे अर्धवट अर्थ काढून त्यातून जातीयवाद पसरवायचा प्रयत्न आजकाल चालू आहे. तथापी आंबेडकरांनीच शिकवलेल्या चिकित्सेचा अवलंब करून त्यांचे विचार आणि चरित्र यांचा साकल्याने विचार करावा. 

यानंतर त्यांच्या स्थिरबुद्धी या पैलूचा विचार करूयात. आंबेडकर ज्या समाजामध्ये निपजले, वाढले त्या समाजावर हजारो वर्षांपासून त्यांच्याच धर्मबांधवानी अन्याय केला होता, माणूस असूनही माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकारच हिरावून घेतला होता. खुद्द आंबेडकरांनी उच्चविद्या संपादित केल्यानंतरही या पाशवी वृत्तीचा अनुभव घेतला होता. 

असे असूनही जेंव्हा ' बहिष्कृत हितकारिणी सभा ' या संस्थेची उभारणी करण्यात आली तेंव्हा त्यामध्ये सवर्ण समाजातील सदस्य घेण्यात आले. ज्यांना सामाजिक समरसतेचे भान होते अश्या प्रत्येक मनुष्यासाठी आंबेडकरांनी आपल्या मनाची आणि संघटनेची द्वारे नेहमीच खुली ठेवली होती ही बाब महत्वाची आहे.

जेंव्हा त्यांच्याकडे घटना समितीमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली तेंव्हा त्यांनी सूडबुद्धीने, कोणत्याही समाजावर अन्यायकारक होईल असे संविधान मांडले नाही. त्यामुळे डॉ.आंबेडकर हे खुल्या मनाचे तसेच स्थिरबुद्धीचे व्यक्तिमत्व होते हे स्पष्ट होते.

डॉ.आंबेडकरांच्या एकंदरीतच चरित्राचा विचार करता ते एक महामानवच होते हे पदोपदी सिद्ध होते. थोर महापुरुष जसे राजवाड्यात जन्माला येतात तसे ते झोपडीतही जन्माला येतात. जसे तथाकथित उच्च कुलात जन्माला येतात तसेच सर्वसामान्य कुलात जन्माला येतात, आपल्या देशाला अनेक थोर महापुरुषांची अलौकिक परंपरा आहे, त्यामध्ये डॉ आंबेडकरांचे महत्व हे विलक्षण आहे कारण त्यांचा जीवनपट हा धुळीतून शिखराकडे जाणार आहे. त्यांचे संघर्षमय जीवन आणि अखेर मिळालेली जगन्मान्यता त्यांना विश्वरत्न डॉ.आंबेडकर असे संबोधायला भाग पाडते. 

या अश्या महामानवाच्या तेजाचे कण सर्व भारतीय समाजाने बुद्धिप्रामाण्याच्या तत्वावर वेचून आपले राष्ट्र विश्वगुरू होण्याकरता हातभार लावावा एवढीच अपेक्षा करतो.


: श्रीपाद श्रीकांत रामदासी, पुणे. 

Comments