हिंदूंपुढील आव्हाने : भाग १
श्रद्धा-अंधश्रद्धेचा गोंधळ
सद्यस्थिती मध्ये, जरा डोळे उघडे ठेवून पहिले तर, या देशातील बहुसंख्यांक असणाऱ्या हिंदू समाजापुढील काही प्रश्नांचे आकलन होते.
अर्थात बहुतेक हिंदूंना या बाबी; " प्रश्न " किंवा " आव्हाने " या सदरात मोडतात याची जाणीव देखील नाही. हिंदू समाजात; एक हिंदू म्हणून वावरताना जाणवलेल्या बाबी आणि आमच्या अल्प, स्वल्प मतीनुसार त्यावरील तोडगे हे आम्ही या लेखामालेद्वारे मांडत आहोत. अर्थात हेच एक अंतिम सत्य आहे असा आमचा दावा नाही. आम्हांस जाणवलेल्या, उमगलेल्या आव्हानांची शिदोरी आम्ही वाचंकांपुढे उघडत आहोत तथापि त्यात असणाऱ्या चुका, उणिवा दाखवून दिल्यास आम्ही त्या विनम्रपणे स्वीकारून त्यावर नक्कीच विचार करू.
" धर्म म्हणजे अंधश्रद्धांचा बाजार " अश्या मताचे समाजमन निर्माण करण्यात काही मंडळी यशस्वी झाली आहेत. अर्थात याला फशी पडणारी मंडळी केवळ हिंदूच आहेत. हिंदूंचा वैचारिक अति पुढारलेपणा, धर्मचिकित्सेची असणारी समाज मान्यता यांमुळे, कथित सुशिक्षित समाज हा साऱ्याच धार्मिक श्रद्धांना " अंधश्रद्धा " मानण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचला आहे.
अहिंदू समाजात मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. कारण एक हिंदू धर्म सोडल्यास अन्य कोणत्याही धर्मात धर्मचिकित्सा करण्याची मुभा दिसतच नाही. जरी कोणी धर्मसुधारणेचा प्रयत्न केलाच तर तो किंवा ती व्यक्ती किती काळ जिवंत राहील याचा भरवसा नाही. त्यामुळे आपापल्या धर्मात सांगितलेल्या बाबी यांनाच अंतिम सत्य मानून, अहिंदू आपल्या धर्माचे, धर्मतत्वांचे पालन करत असतात. आता एकदा चिकित्सा संपली आणि जे आहे ते असेच स्वीकारायचे ठरले की; श्रद्धा का अंधश्रद्धा असा भेदच मुली शिल्लक राहत नाही.
आता आपण हिंदूंची स्थिती पाहुयात, देव मानावा की नाही इथूनच गोंधळाला सुरुवात होते.
मुळात धर्म हा केवळ देव-दैवते, कर्मकांडे यांच्या पुरता मर्यादित आहे का ? हिंदू म्हणवून घ्यायचे असेल तर देवाचे अस्तित्व मानलेच पाहिजे असे बंधन आहे का ? असे मुळीच नाही, श्रद्धावान आणि श्रद्धाहीन हा फरक हिंदू म्हणवून घेण्याकरता लागू पडत नाही. एखाद्याला मूर्तीचा दगड दिसतो तर दुसऱ्याला दगडातले देवत्व दिसते. अखेर हा ज्याच्या त्याच्या धारणेचा किंवा मान्यतेचा प्रश्न आहे. मूर्तीला अभिषेक करणे न करणे हा देखील ज्याच्या त्याच्या धारणेचाच भाग असला पाहिजे. जर कोणाला मंत्रोच्चार केल्याने किंवा ऐकल्याने काही अनुभूती येत असेल तर ती अनुभूती खोटी कशी ठरवता येईल ? अंधश्रद्धा कशी ठरवता येईल ?
ज्याला अनुभूती नसेल अश्याने या मार्गास न जाणे योग्य परंतु जे त्या मार्गावर जात आहेत त्यांना चुकीचे किंवा अंधश्रद्धाळू म्हणून हेटाळणे हे देखील गैरच आहे.
कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवाची प्रार्थना जर त्या मनुष्याच्या मनास दिलासा देत असेल, प्रेरणा देत असेल तर अशी प्रार्थना गैर का ठरवावी ?
आणखी एक बाब नेहमीच डोके वर काढत असते ती म्हणजे पशुबळी. हिंदू मंदिरांमध्ये पशुबळी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे हे सर्वज्ञातच आहे. वास्तवात बळी दिले जाणारे प्राणी म्हणजे कोंबडी / कोंबडा आणि बकरी होय. पशुबळी ही अंधश्रद्धा आहे असे मानून जर त्यावर बंदी आणली असेल तर ती सर्वच धर्मियांना लागू पडली पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही. त्यामुळे पशुबळी ही अंधश्रद्धा मानवी की नाही हे वादातीतच मानावे लागेल. बरं भूतदया, प्राणिदया वगैरे प्रकार म्हणून जर पशुबळी बंदी असेल तर, हेच पशु कापून विकायची लाखो दुकाने आज आपल्या देशात आहेत मग त्यांच्यावर बंदी का नाही ?
केवळ हिंदूंच्या बाबतीत धार्मिक कारणाने पशुबळी देण्यास बंदी घातल्यामुळे, ही प्रथा केवळ हिंदुतच आहे असा गैरसमज समाजामध्ये होताना दिसतो.
आमचे हिंदूंना आवाहन आहे की; हिंदूंनो ही प्रथा केवळ हिंदूत नसून अन्य धर्मात देखील आहे तथापि आपणांस ही जर अंधश्रद्धा मानायची असेल तर सरसकट सर्वच धर्माच्या बाबतीत मानावी. केवळ हिंदू धर्मावर ताशेरे ओढण्याचे हत्यार म्हणून याचा उपयोग होऊ नये हीच प्रांजळ अपेक्षा.
पुढील प्रकार म्हणजे, नवस-सायास; हे देखील केवळ हिंदूंच्याच बाबतीत घडते असे नाही, मन्नत मागणे, विश मागणे, वगैरे प्रकार बहुतेक धर्मात आहेतच.
नवस हा प्रकार मोठा गंमतशीर आहे, प्रत्येकाचा पूर्ण होतोच असे नाही पण म्हणून कोणाचाच पूर्ण होत नाही असेही नाही. पुन्हा हा प्रकार ज्या त्या व्यक्तीच्या अनुभूतीचा किंवा अनुभवाचा आहे. त्यामुळे त्याला योग्य किंवा अयोग्य ठरवणे हे वैयक्तिक असू शकते त्याला सरसकट अंधश्रद्धा या सदरात ढकलणे योग्य नाही.
असो अश्या अनेक याबाबतीत लिहिता येईल परंतु लेखन मर्यादेचे भान राखणे आवश्यक आहे. एकंदरीतच काय तर, श्रद्धा, रूढी, परंपरा या साऱ्या बाबी बहुतेक सर्वच धर्मात आहेत. वर सांगितल्या प्रमाणे त्या मानायचा किंवा नाही याचे निर्बंध केवळ हिंदू धर्मातच नाही. कदाचित हेच गोंधळाचे कारण आहे.
परंतु एक बाब नक्कीच लक्षात घ्यावी की जी श्रद्धा, राष्ट्र, समाज, मानव कल्याण, निसर्ग, स्वास्थ्य यांच्या विरोधात असेल, यांना धोका उत्पन्न करणारी असेल ती श्रद्धा हीच खरी अंधश्रद्धा. त्यामुळे आपण आचरण करत असलेली कोणतीही प्रथा ही श्रद्धा की अंधश्रद्धा याच्या गोंधळात पडण्यापेक्षा तीस स्थलकाल आणि सुदृढ समाजव्यवस्था यांचा निकष लावा आणि आपल्या मनाची शुद्धता जपून आपापल्या धर्माचे पालन करा.
Comments