स्वा.सावरकरांकडून काय शिकावे ?



 सावरकरांकडून काय शिकावे ?

© श्रीपाद श्रीकांत रामदासी


आज २६ फेब्रुवारी अर्थात स्वा. सावरकरांचा आत्मार्पण दिन,
सर्वप्रथम स्वा. सावरकरांना विनम्र अभिवादन !!!


स्वा.सावरकरांच्या विचारातून, चरित्रातून आजच्या पिढीने नेमके काय घ्यावे ?
" जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " या उक्तीस आदर्श मानून प्रत्यक्षात स्वर्ग जरी मिळत असेल तरी त्याचे मूल्य, आपल्या मातृभूमीपेक्षा, राष्ट्रभूमीपेक्षा कमीच समजावे. आपले राष्ट्र आपली मायभूमी हेच आपले सर्वस्व मानून तिच्यासाठी प्रसंगी, प्राणत्याग करण्याची तयारी देखील असावी.

" राखावी बहुतांची अंतरे " या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त जन संपर्क करावा. अनेक मित्र, सखे, सोबती यांना जोडले जावे, आणि त्यातून निर्माण होणारे संघटन हे नैतिक कार्यासाठी क्रियावान करावे.
आपले राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृती यांच्या सन्मानार्थ प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी, न डगमगता संघर्ष करावा. असा संघर्ष करीत असताना, केवळ भावना प्रधान न राहता. स्थिर बुद्धीने आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने निर्णय घ्यावेत.

आपले कार्य किती मोलाचे आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यास वेळोवेळी पटवून द्यावे, कार्यप्रणाली अवलंबताना कालानुरूप त्यामध्ये, योग्य ते बदल करावेत. आपली मते बदलावी लागली आणि स्थल-कालानुरूप जर ती समाजांस उपयुक्त ठरणारी असतील तर निश्चितपणे बदलावीत. कारण कोणतेही समाजकार्य हे वाहत्या जलप्रवाहाप्रमाणे असले तरच ते दूरवर पसरते अन्यथा त्यांचे डबके होऊन जाते.

कोणत्याही व्यक्तीच्या चरणी आपले स्वातंत्र्य वाहू नये, एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली किंवा अमुक एक ग्रंथामध्ये असे लिहिले आहे म्हणून त्या बाबीचा स्वीकार किंवा धिक्कार न करता त्यातील तथ्ये तपासून, त्यांची सद्यस्थितीमधली असणारी उपयुक्तता, नैतिकता यांचा सारासार विचार करून मगच तिचा स्वीकार किंवा धिक्कार करावा.

कोणत्याही व्यक्तीचे थोरपण किंवा खुजेपण हे जन्मजातीवर ठरवू नये, जर एखादी व्यक्ती एखाद्या सन्माना करता खरोखरंच योग्य असेल तर, निश्चितपणे त्या व्यक्तीचा सन्मान करावा. अश्या सन्मानांना किंवा तिरस्कारांना जातीची किनार असू नये.

कोणताही धर्म, परंपरा, धर्मग्रंथ यांतील तत्वज्ञान जर कालबाह्य किंवा राष्ट्रहितास अपायकारक ठरणारे असेल तर अश्या तत्वज्ञानांस बाजूला सारून आधुनिकतेचा स्वीकार करावा.
सतत वाचन, मनन तथा शक्य तितके, शक्य तसे परंतु समाजाला साकारात्मकतेकडे नेणारे लेखन अवश्य करावे, आपल्या जवळील ज्ञान नेहमीच समाजोपयोगी कार्यासाठी वापरावे. समाजाला एखादी गोष्ट पटत नसेल परंतु ती खरोखरच समाजहिताची असेल तर लोकनिंदेला न घाबरता ठाम राहून परखडपणे सांगावी. कारण प्रसंगी औषध कडू असले तरी शरीर स्वास्थाकरिता उपयुक्त असल्याने तिचे बळजबरीने सेवन करावेच लागते, यातच शरीराचे हित असते.

हिंदुजनांमधील कोणत्याही समाजघटकाचा प्रश्न हा त्या एका घटकापुरता मर्यादित न मानता, तो समस्त हिंदू समाजाचा प्रश्न आहे असे मानून त्यावर उपाय योजना करण्याकरता कार्यरत असावे; कारण जर शरीरातील एखाद्या अवयवांस इजा झाली तरी तिच्या वेदना या पूर्ण शरीरालाच भोगाव्या लागतात.

आपले राष्ट्र, आपली संस्कृती याबद्दलच्या इतिहासाचे अध्ययन स्वतः करून, त्यातील दैदिप्यता, अलौकिकता स्वतः तपासून पाहावी केवळ बाजारगप्पांवर विश्वास ठेवून आपल्याच इतिहासाचे विकृतीकरण होऊ देऊ नये. थोडक्यात सांगायचे झाले तर आजच्या पिढीने सावरकरांकडून राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, समाजशीलता, समरसता, निर्भीडपणा, बाणेदारपणा, कल्पकता आदी गोष्टी जरूर शिकाव्यात परंतु मुख्य म्हणजे आपल्या धडावर स्वतःचेच मस्तक असू द्यावे आणि त्या मस्तकावर स्वतःचे नियंत्रण असावे.

आजची देशाची स्थिती पाहता, राष्ट्राला सावरू शकतील अश्या विचारधारेमधील एक महत्वाची विचारधारा म्हणजे सावरकरवाद होय. राष्ट्रामध्ये वाढत असलेला जातीवाद, प्रांतवाद, घटत असणारा राष्ट्रवाद थांबवायचा असेल तर सावरकरवाद अवलंबणे आवश्यकच आहे. परंतु सद्यस्थितीला सावरकरवादाला बदनाम करून, तरुणाईची माथी भडकविण्याचा डाव खेळला जात आहे. राष्ट्रावर प्रेम करायचा संदेश न देता, आपली जात, भाषा, प्रांत यांपुरतेच मर्यादित राहण्याचा संदेश सर्वदूर पसरवला जातोय, ही खेदाची बाब आहे. 
तरुणाईमधली सकारात्मक कार्यऊर्जा संपवण्यासाठी जातिद्वेषाचा आधार घेतला जातोय हे दुर्दैवी आहे. आज आपले राष्ट्र स्वतंत्र जरी असले तरी स्वार्थी, घोटाळेबाज, मतांसाठी प्रसंगी लाचारी पत्करणाऱ्या राजकारण्यांमुळे, स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरी अजूनही विकसनशील राष्ट्रांच्याच यादीमध्ये आहे. 

देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देशही असतो हे सांगणारे सावरकर आज या देशात निर्माण होणे गरजेचे आहे. नुसते तात्याराव परत या असा गळा काढत बसण्यापेक्षा, सावरकर चरित्र अभ्यासून, त्यातून योग्य ती प्रेरणा घेऊन, स्वतःमध्येच सावरकर जागृत करणे हीच काळाची गरज आहे, आणि असे सावरकर जागृत करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. 

नाम विनायकाचे घ्यावे, राष्ट्रकार्य प्रवर्तावें ।
हिंदू रक्षक; नाही भक्षक, वचन हेची नित्य स्मरावे ।।

हिंदुहृदयसम्राट, हिंदूसमाज सुधारक, हिंदूसमाज संरक्षक,
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अमर रहे ! अमर रहे !! अमर रहे !!!

|| वंदे मातरम ||


© श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments