हे वागणं बरं नव्ह !!!


____________________________________________________________________

शब्दांकन : श्रीपाद श्रीकांत रामदासी

७ फेब्रुवारी २०१९ रोजी, नवी दिल्ली येथे अल्पसंख्यांक परिषदेला, संबोधित करीत असताना राहुल गांधी यांनी सावरकरांना ' डरपोक ' असे संबोधले. त्यांच्या ३३-३४ मिनिटे चाललेल्या भाषणामध्ये २१-२२ व्या मिनिटाला त्यांनी अत्यंत जोश पूर्णपणे असे उदगार काढले की, " आपके सामने जो लोग खडे है, चाहे वो आर एस एस हो, चाहे वो बी जे पी हो, चाहे वो नरेंद्र मोदी हो, चाहे वो सावरकर हो, ये डरपोक लोग है " [या भाषणाचे चलचित्र संदर्भासाठी राखून ठेवले आहे]

मला हा प्रश्न पडलाय की स्वा.सावरकर हे या निवडणुकीत नेमक्या कोणत्या मतदार संघातून उभे आहेत
आणि तेही मृत्यूपश्चात ५३ वर्षांनी ???

याच भाषणात त्यांनी सावरकरांनी माफीनामा कसा लिहिला याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले.
आपल्याच नव्हे तर आपल्या पित्याच्या जन्मापूर्वी २० वर्षे न घडलेल्या घटनेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याची कला, राहुल गांधींना कशी जमली हे एक कोडे आहे.

दुसरे असे की राहुल गांधी ज्या सावरकरांना ' डरपोक ' म्हणतात, त्याच सावरकरांना त्यांच्याच आज्जीने वीर असे संबोधले आहे, आणि तेही अनेक वेळा. सध्या सोशल मीडिया वर स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी
स्वा. सावरकरांच्या जन्म शताब्दीबद्दलचे पत्र प्रसारित झाले आहे. अर्थात ते सत्य देखील आहे. त्या मध्ये स्व. इंदिराजी लिहितात की;
" वीर सावरकरांच्या ब्रिटिश सरकार विरोधातल्या धैर्याला, आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतंत्र स्थान आहे. भारताच्या या उल्लेखनीय पुत्राच्या जन्म शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी पणे पार पडो हीच इच्छा." हे पत्र १९८० सालातील आहे. 

या पूर्वी १९६६ साली सावरकरांच्या निर्वाणानंतर पाठवलेल्या शोकसंदेशामध्ये
 स्व. इंदिराजींनी सावरकरांना साहस आणि देशभक्ती याचे समीकरण असे, संबोधले आहे. त्यांनी म्हटले होते

 "सावरकरांच्या मृत्यूने विद्यमान भारतातील एक महान व्यक्तीला आपण मुकलो आहोत ,सावरकर म्हणजे साहस नी  देशभक्ती याचे समीकरण होऊन बसले होते. त्यांचा पिंड अभिजात क्रांतिकारकांचा होता आणि असंख्य लोकांना त्यांच्या पासून स्फूर्ती मिळाली होती "

आता बोला, राहुल गांधींची सख्खी आजी सावरकरांना वीर, साहसी आणि देशभक्त म्हणते पण राहुलजी मात्र त्यांना डरपोक म्हणतात, स्व. इंदिराजींनी जेंव्हा सावरकरांचा वरील शब्दात गौरव केला तेंव्हा त्या पंतप्रधान होत्या हे विसरता येणार नाही. राहुलजी आज कोण आहेत, वंशपरंपरेतून मिळालेल्या पक्ष अध्यक्ष पदाव्यतिरिक्त त्यांची कारकीर्द तरी नेमकी काय आहे ? संसदेमध्ये ते किती वैचारिक आणि मौलिक बोलतात याची अनेक चलचित्रे उपलब्ध आहेत.

असो आता ज्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, त्याच पक्षातील ज्येष्ठ आणि जनमान्य नेतृत्वानी, सावरकरांच्या निर्वाणानंतर दिलेले शोकसंदेश पाहुयात,

यशवंतराव चव्हाण (तात्कालीन संरक्षण मंत्री ):-
"ब्रिटिश सत्तेविरुद्ध दंड थोपटून उभा राहिलेलया  एका जुन्या  स्वातंत्र्य-योध्याला देश अंतरला आहे."
राष्ट्रवाद, शौर्य नि सामाजिक एकता यांचे अजोड संमिश्रण सावरकरांच्या व्यक्तिमत्वात एकजीव झाल्याचे आढळते. त्यांच्या प्रखर राष्ट्रवादापुढे आपल्याला विनम्र झाल्याशिवाय गत्यंतरच नाही."

वसंतराव नाईक (तात्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र):-
"भारतीय क्रांतिकारकांच्या आघाडीवर राहून, सावरकरांनी मातृभूमीच्या विमोचनासाठी अविरत निष्ठेने कार्य केले होते."

सत्यनारायण सिन्हा (संसदीय कामकाज मंत्री) :- 
"भावी पिढयांना सावरकरां पासून सतत स्फूर्ती मिळत राहील, त्यांच्यामध्ये अनेक गुणांचा संगम होता.ते थोर समाजसुधारकदेखील होते"

याच प्रमाणे देशभरातील वृत्तपत्रांनी देखील सावरकरांना, देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रभक्त, राष्ट्रवीर अश्याच शब्दांत गौरविले आहे. राहुल गांधीनी खरोखर सावरकर वाचलेले नाहीत हे त्यांच्या वारंवार होणाऱ्या टीकांकडे पाहता स्पष्टच होत आहे.

बाकीचे राहूद्या परंतु आपल्या आजीचा तरी अभ्यास त्यांनी केला पाहिजे असे मला वाटते. बाकी आज एक गोष्ट मात्र पटली, आपल्या वाड-वडिलांसारखे दिसणे, बोलणे, हसणे या पेक्षा त्यांच्यासारखे असणे जास्त महत्वाचे आहे.

राहुलजींची आपल्या पक्षातील पूर्वनेते, आपली आजी यांच्याशी विसंगत विधाने पाहता एवढेच म्हणावे वाटते,

गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्ह !!!

संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकर -- ले.धनंजय कीर 
          पृ क्र.५८३ ते ५८५

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments