कल्पतरू : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

 



छायाचित्र सौजन्य






    ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर येते नामस्मरण! आजच्या युगात नामस्मरणात किती प्रचंड सामर्थ्य आहे हे अतिशय साध्या, सोप्या शब्दात रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन गोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही वेळी, स्थळी, सोवळे ओवळे न पाळता अतिशय सहजपणे पण तळमळीने घेतलेले नाम आपल्याला खूप समाधान देते आणि रामापर्यंत पोचण्याचे सहज, सोपे साधन आहे असे महाराज आपल्याला कळकळीने सांगतात.

महाराजांनी सांगितलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान! पोटभर जेवल्यावर जि तृप्तता मिळते ती इतर कोणत्याही वस्तू कितीही प्रमाणात मिळाल्या तरी नसते. आजही गोंदवल्यात हे अन्नदान अव्याहतपणे चालू आहे.

नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या पाठीशी महाराज कायमच असतात याचे कितीतरी अनुभव अनेक लोकांना येत असतात. म्हणूनच जो एकदा गोंदवल्याला येतो तो कायमचा इथलाच होऊन जातो. मी सुद्धा महाराजांवर श्रद्धा असणारी अतिशय लहान व्यक्ती आहे.

खरं तर महाराजांवर काही लिहिण्याइतकी मी काही मोठी नाही किंवा माझी एवढी साधनाही नाही. 

पण माझी श्रद्धा आहे महाराजांवर आणि प्रत्येक प्रसंगात ते माझ्या पाठीशी उभे असतात असे मला जाणवते.

आपल्यासाठी महाराज कसे धावून येतात किंवा आपल्या मनातील अगदी छोट्या इच्छासुद्धा योग्य वेळ आल्यावर कशा पूर्ण करतात हे कोठेतरी लिहावे असे खूप वाटत होते. पण नक्की कुठे सांगावेत हे अनुभव हे समजत नव्हते.

काही दिवसांपूर्वी अचानक प्रदीप दादांचा फोन आला, "गौरी ताई, महाराजांची 13 फेब्रुवारीला जयंती आहे आणि त्यासाठी तुला महाराजांवर तुला लेख लिहायचा आहे." हे ऐकूनच मला इतका आनंद झाला आणि पुन्हा एकदा महाराजांवर विश्वास टाकला की ते अगदी छोटया छोट्या इच्छासुद्धा कसे पूर्ण करतात याचा प्रत्यय आला.

तसाच अजून एक अनुभव! खरं तर अनुभव तसे खूप आहेत पण वानगीदाखल दोनच अनुभव सांगणार आहे.

जानेवारी 2021 मध्ये महाराजांनी वापरलेल्या बंगलोर मठातील पादुका पुण्यात येणार होत्या आणि 4 ते 5 दिवस त्या पुण्यात असणार होत्या.

त्या दरम्यान ज्या भक्तांना त्यांच्या घरी पूजेसाठी पादुका न्यायच्या असतील ते वेळ ठरवून नेऊ शकतात. असा तो मेसेज होता. कामाच्या गडबडीत मी दुसऱ्या दिवशी, ग्रुप वरचा हा मेसेज बघितला.

मेसेज पाहिल्या पाहिल्या  आमच्या आरती मंडळातील 3/4 जणांना लगेच फोन केला महाराजांच्या पादुका आपल्या घरीपण आणाव्यात अशी तीव्र इच्छा होती पण मेसेज उशिरा पाहिल्यामुळे हे शक्य होईल असे वाटत नव्हते. तरी मी प्रयत्न करणे काही थांबवले नाही.

पादुकांबरोबर बेंगलोरचे जे गुरुजी आले होते त्यांच्याबरोबर जे काका त्यांना सगळ्यांकडे जायला मदत करत होते त्यांचा नंबर मला मिळाला. मग त्यांना फोन केला. तेंव्हा त्यांनी गुरुजींशी बोलून मला सांगितले,"यावेळेला नाही जमणार. 2/3 महिन्यांनी जेंव्हा परत पुण्यात पादुका येतील तेंव्हा नक्की येऊ."  शेवटची आशा पण संपली होती. खूप  खूप वाईट वाटले !

ही सगळी फोनाफोनी होईपर्यंत रविवारी रात्रीचे दहा वाजले होते. मी एकदम नाराज मनस्थितीत प्रदीप दादांना फोन केला. त्यांनी मला एकच सांगितले,

"गौरी ताई, महाराज तुमच्या घरी यावेत अशी तुझी इच्छा आहे न, मग झोपताना महाराजांना तसे सांग आणि झोप." 

मी खरंच मनापासून महाराजांना तशी विनंती केली आणि झोपले. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे कॉलेजला जायचे होते. स्वयंपाक, माझे सगळे आवरून मी माझा डबा भरत होते तेवढ्यात मला फोन आला,

"आज संध्याकाळी महाराजांच्या पादुका तुमच्या घरी आल्या तर चालतील का?" हे ऐकल्यावर मला काही सुचतच नव्हते. भावना व्यक्त व्यक्त करण्यासाठी माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते कारण शब्दांची जागा घेतली होती डोळ्यातल्या आनंदाश्रूनी !!!

" चालतील! पादुका केंव्हाही आल्या तरी चालतील! " असे सांगितले आणि सुरू केली महाराजांच्या स्वागताची तयारी....

भक्तांच्या मनातल्या छोट्या छोट्या इच्छासुद्धा या-ना  मार्गाने पूर्ण करणारे ब्रह्मभचैतन्य गोंदवलेकर महाराज हे माझ्यासाठी कल्पतरूच नाही का ?


शब्दांकन : गौरी देशपांडे (धायरी) 

       संपर्क: 9850826616


श्रीराम जय राम जय जय राम !

Comments

Hemant Sambare said…
हो महाराज हे सर्व इच्छा पूर्ण करणारे कल्पतरू च आहेत
Unknown said…
होय. गौरी ताई..
आईच आपल्या मुलांचे सर्व हट्ट पुरवते.
साक्षात् गुरू माऊलींनी तुमचा हट्ट पुरवला आहे.
अर्थात त्याला तळमळही तशीच हवी.

जय गुरू माऊली🙏
श्रीराम जय राम जय जय राम🙏