रोकडी प्रचिती देणारा ग्रंथराज : श्री दासबोध
।। श्रीराम समर्थ ।।
आज माघ शु. नवमी
अर्थात दासबोध जयंती. त्यानिमित्ताने दासबोध बाबत लेखन सुरु
करत आहे.
" ग्रंथराज
दासबोध " म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचे ज्ञान, तत्वज्ञान, साहित्य मूल्य यांचा परमोच्च बिंदू आहे असेच मला
वाटते.
वास्तवात
दासबोध या ग्रंथावर लिहिण्यासाठी
मी कोणी अभ्यासक, चिंतक
किंवा अधिकारी व्यक्ती नाही परंतु दासबोधाचे
सहज वाचन करत असताना
सुचलेले मनोगत मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
मेथवडेकर-रामदासी या दासबोधी कुळात
जन्म झाल्याने, अगदी नकळत दासबोधातील
किंवा अन्य समर्थ साहित्यातील
वचने कानावर पडतच होती.
घरातील थोर-मोठी मंडळी विशेषतः माझ्या
आईची-आई (आज्जी) नेहमी
सांगत असे की; आयुष्यात
एकदा तरी दासबोध वाचलाच
पाहिजे, समजून घेतलाच पाहिजे. तिचे म्हणणे असे
की; “ दासबोध हा प्रचिती करता
वाचला पाहिजे, दासबोध वाचन हे केवळ
पुण्यप्राप्ती करता नसून स्वतःमध्ये
सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी
असते.”
तेंव्हा
यातलं फारसं कळलं नाही पण
जेंव्हा दासबोध वाचन सुरु केले
तेंव्हा ( तिच्याच शब्दात सांगायचे तर) प्रचिती आली.
पुढे
जाऊन असे वाचनात आले
की; " दासबोध हा ग्रंथ वाचणारास
"रोकडी प्रचिती" येणारच असा समर्थांचा खणखणीत
विश्वास व आशीर्वाद आहे."
आता
मग प्रचिती म्हणजे नेमके काय ? आणि त्यातूनही रोकडी
प्रचिती म्हणजे काय ? तर प्रचिती म्हणजे
कोणत्याही बाबतीतील सत्यतेचा अनुभव किंवा अनुभूती. रोकडी प्रचिती म्हणजे प्रत्ययदर्शी (प्रॅक्टिकल) अनुभूती. असो !
सध्याच्या
रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ या ठिकाणी; समर्थ
रामदास स्वामींनी हा ग्रंथ सांगितला
आणि योगीराज कल्याणस्वामींनी लिहून घेतला.
समर्थ या ग्रंथाचे रचनाकार आहेत तर कल्याण स्वामी याचे लेखक आहेत. पण असे असले तरी या दोघांनीही आपली नावे कोणत्याही ओवीत थेटपणे गोवली नाहीत. आता आपण दासबोधाची रचना थोडक्यात बघुयात.
दासबोध
हा जरी एखाद्या पोथी
प्रमाणे वाटत असला तरी
त्यात कोणतीही कथा किंवा कोणाचे
लीळाचरित्र वर्णन नाही.
या मध्ये एकूण २० दशक
असून एका दशकामध्ये १०
समास आहेत. (ओवीसंख्या विषयानुसार कमी अधिक).
प्रत्येक
दशक आणि समास हा
त्याच्या नावाप्रमाणे वेगवेगळे विषयाचे निरूपण करणारा आहे.
त्यामुळे
कोणताही समास कधीही वाचला
तरी त्यातून योग्य तेच मार्गदर्शन मिळते.
क्रमवार वाचनाचे बंधन या ग्रंथास
नाही.
दासबोधाच्या
पहिल्या दशकाचे नाव ' स्तवन ' असून अखेरच्या (२०
व्या) दशकाचे नांव ' पूर्ण ' असे
आहे.
समर्थानी
ग्रंथाच्या प्रारंभीच ग्रंथाचे नांव, स्वरूप आणि फलश्रुती या
बाबी सांगितल्या आहेत.
पहिल्या दशकातील, ग्रंथारंभ या पहिल्याच समासामध्ये समर्थ सांगतात;
श्रोते
पुसती कोण ग्रंथ | काय
बोलिलें जी येथ | श्रवण
केलियानें प्राप्त | काय आहे ||१||
(१. १. १)
ग्रन्था
नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद | येथ बोलिला विशद
| भक्तिमार्ग ||२|| ( १.
१. २)
वरील
ओवीनुसार येथे भक्तीमार्ग विशद
केला आहे असे जरी
सांगितले असले तरी पुढील
ओव्यांमध्ये अन्य कोणत्याप्रकाराचे ज्ञान
सांगितले आहे त्याचाही तपशील
दिलेला आहे.
याच समासामध्ये पुढे या ग्रंथाचे आधार (किंवा संदर्भ) नेमके काय आहेत हे देखील सांगितले आहे,
समर्थ सांगतात;
(१.१.१५ ते
(१.१.२१)
नाना
ग्रन्थांच्या संमती | उपनिषदें वेदांत श्रुती | आणि मुख्य आत्मप्रचीती
| शास्त्रेंसहित ||१५||
नाना
संमतीअन्वये | म्हणौनि मिथ्या म्हणतां नये | तथापि हें अनुभवासि ये
| प्रत्यक्ष आतां ||१६||
मत्सरें
यासी मिथ्या म्हणती | तरी अवघेचि ग्रन्थ
उछेदती | नाना ग्रन्थांच्या संमती
| भगवद्वाक्यें ||१७||
शिवगीता
रामगीता | गुरुगीता गर्भगीता | उत्तरगीता अवधूतगीता | वेद आणी वेदांत
||१८||
भगवद्गीता ब्रह्मगीता | हंसगीता
पांडवगीता | गणेशगीता येमगीता | उपनिषदें भागवत
||१९||
इत्यादिक
नाना ग्रन्थ | संमतीस बोलिले येथ | भगवद्वाक्ये येथार्थ | निश्चयेंसीं ||२०||
भगवद्वचनीं
अविश्वासे | ऐसा कोण पतित
असे | भगवद्वाक्याविरहित नसे | बोलणें येथीचें ||२१||
याचा अर्थ असा की; समर्थानी उपरोक्त विविध ग्रंथांचा आधार घेऊनच या ग्रंथाची रचना केली आहि आणि त्यामुळे इथे सांगितलेले ज्ञान हे भगवद्वाक्यें च आहेत.
त्यामुळे या ग्रंथावर अविश्वास दाखवणे म्हणजे उपरोक्त ग्रंथांवर आणि मुख्य म्हणजे भगवद्वाक्येंवर अविश्वास दाखवणे आहे.
अंततः
या ग्रंथाची फलश्रुती काय ? याबद्दल सांगताना समर्थ सांगतात;
आतां
श्रवण केलियाचें फळ | क्रिया पालटे
तत्काळ | तुटे संशयाचें मूळ
| येकसरां ||२८|| (१.१.२८)
ऐसी
याची फलश्रुती | श्रवणें चुके अधोगती | मनास
होय विश्रांती | समाधान ||३७|| (१.१.३७)
समर्थांना
अभिप्रेत असणारी फलश्रुती त्यांनी या समासात ओवी
क्र. २८ ते ३७
यांमधून स्पष्ट केली आहे, पण
तरीही ते असत्य वाटल्यास
समर्थ सांगतात,
जयाचा
भावार्थ जैसा | तयास लाभ तैसा
| मत्सर धरी जो पुंसा
| तयास तेंचि प्राप्त ||३८|| (१.१.३८)
त्यामुळे
आपण काय भाव ठेवून
हा ग्रंथ वाचतो त्यावरून आपल्याला फलप्राप्ती होते.
वर सांगितल्याप्रमाणे, दासबोध या ग्रंथामध्ये विविध
बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
दास्यभाव
कसा असावा ?, राजकारण कसे असावे ?, मूर्खांची
लक्षणे काय ?, कवित्व कसे असावे ?, विवेक
म्हणजे काय ?, प्रपंच कसा करावा ?, प्रपंचातून
परमार्थ कसा साधावा ? या
आणि अश्या अन्य विषयांवर समर्थानी
दासबोधातून मार्गदर्शन केले आहे. अर्थात
या साऱ्याचा पाया हा अध्यात्म,
भक्तिभाव आणि सावधानता हाच
आहे असे मला वाटते.
२०० सामासांमधून अनेक विषयांना हात घालणाऱ्या ग्रंथाबद्दल बरेच काही सांगता येईल परंतु, लेखनभयास्तव अधिक मांडत नाही.
परंतु
एक मात्र सांगावेसे वाटते की; कोणतेही महाकाव्य,
साहित्य यांच्यातील रचनांचा एकत्रित अभ्यास आणि मांडणी केल्यानंतरच
त्यातील खरा अर्थ कळत
असतो; दासबोधाच्या बाबतीत तसेच आहे.
असे
असूनही, दासबोधातील काही ओव्यांना तोडून
फोडून किंवा स्वतंत्रपणे मांडून, त्याचे विकृत अर्थ काढण्याचा विचकट
प्रकार आज घडताना दिसतो
आहे.
त्याचप्रमाणे
" खरा दासबोध " किंवा " खरी
शिवथरघळ " असे काहीही प्रकार
नसून, अनेक समर्थव्रती रामदासी
मंडळींनी परंपरेने नकलून घेतलेल्या शुद्धप्रति हजारोंच्या संख्येने भारतभर उपलब्ध आहेत. दासबोध ग्रंथाची मूळ प्रत सुदैवाने
अत्यंत सुस्थितीत व सुरक्षित आहे.
दासबोधातून
येणारी रोकडी प्रचिती ही ज्याने त्याने,
दासबोधाच्या अभ्यासातूनच घ्यायची असते, वैयक्तिक स्वरूपात सांगायचे झाले तर, कौटुंबिक
जीवन जगत असताना, लेखन
किंवा काव्य निर्मिती करत असताना, संघटन
क्षेत्रांत काम करत असताना,
नोकरीमध्ये प्रसंगी धोरणे ठरवत असताना बऱ्याच
वेळा नकळत दासबोधाची प्रचिती
जशी मला आली आहे
तशीच आपणा सर्वांना येईल
अशी अपेक्षा व्यक्त करतो.
केवळ दासबोधच नव्हे तर समर्थांचे प्रत्येक साहित्य हे आत्यंतिक मौलिक आहे. आजही त्यांच्या सहस्त्रावधी ओव्या, रचना यांच्यापासून आपण अनभिज्ञ आहोत. काही समर्थव्रती रामदासी मंडळी आता त्यांचा अभ्यास करून, आपणा सर्वांपुढे आणत आहेत तथापि समग्र समर्थ साहित्याचे वाचन, मनन आणि चिंतन हे प्रत्येकाने करावे असे मला वाटते.
जाता
जाता समर्थ शिष्य उध्दवसुत यांच्या दासबोधाबाबतच्या खालील पंक्ती आठवतात,
जया
पाहिजे शांती विरक्ती भक्ती । कळावे कसे
ज्ञान सायुज्यमुक्ती ।
मनी
वाटते की कवित्व करावे
। तये दासबोधासि
वाचीत जावे
।।
टिप
: येथे कंसात देण्यात आलेल्या अंकांचा अर्थ; १.१.१
म्हणजे दासबोधातील दशक पहिला, समास
पहिला, ओव्या पहिली. असा घ्यावा.
Comments
||जय जय रघुवीर समर्थ||
खुप छान.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
जय जय रघुवीर समर्थ