..... अजब तुझे सरकार !

 

।। राम कृष्ण हरी ।।


आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर, आळंदी, देहू आणि अन्य संत क्षेत्रांमध्ये येत असणाऱ्या 

वारकरी मंडळींना सरकारी पातळीवर  त्रास देण्यात येत आहे. 

खांद्यावरच्या भगव्या पताका काढून घेतल्या जात आहेत, पारंपरिक वारकरी वेष देखील काढण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे. 

जे परकीय औरंगजेबाला जमले नाही, इंग्रजांना जमले नाही ते आमचे स्वकीय सरकार करून दाखवत आहे. 

या सरकारी संकटाला नेमके आस्मानी म्हणावे की सुलतानी ? म्हणावे तेच कळत नाही. 

 आरोग्यविषय सर्वप्रकारचे निकष आणि नियम पाळून, वारी करण्यासाठी वारकऱ्यांनी केलेली मागणी देखील धुडकावून लावण्यात आली आहे. 

एकादशीला संताच्या मांदियाळीने गजबजलेली पंढरी आज मात्र पाखंड्यांच्या मनमानी अधर्माने वेढली गेलेली पाहून मन हळहळते आहे. त्याच हळहळत्या मनातील भावना आज आपल्यापुढे मांडत आहे. 


नाही यंदा दिंडी अन नाही वारकरी 

सांग विठुराया; कशी घडावी तुझी वारी ।। धृ ।।


चालली एकटी माउली; शल्य हे मनी विखारी 

भक्ती विना जगती ते त्रैलोक्याचे भिखारी  ।। १ ।।


येता चालत ओढत भक्त; दर्शना तुझ्या दारी

खेचून ध्वजा  खांद्यावरची, छळती राजदरबारी ।। २ ।।


नावडे ज्यासी फेटा अन साधा टाळकरी,

अश्या अधर्म्यास देवा काय कळावी वारी ।। ३ ।।


विकली सारी शरम ऐसे हे सत्तेचे  विकारी  

म्हणती संत अश्यास माराव्या पैजारी ।। ४ ।।


पाखंड्यांच्या जुलमाने वेढली रे पंढरी 

देवा तुझी भक्ती करण्या झाली आता चोरी ।। ५ ।।


देव धरोनी मस्तकी; आता हलकल्लोळ करी 

धार्मिकांस घेऊन संगे, हाणू काठी नाठाळावरी ।। ६ ।। 


नाही यंदा दिंडी अन नाही वारकरी 

सांग विठुराया; कशी घडावी तुझी वारी ।। धृ ।।


Comments

Shripad Joshi said…
विठ्ठल विठ्ठल जयहरी।