सागर-भेटीची १११ वर्षे : मार्सेलिस १९१०




 

८ जुलै १९१०, ब्रिटिशांची एक नौका फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ येत होती. या नौकेमध्ये ब्रिटिशांचा एक कैदी  याच क्षणाची वाट पाहत होता. कैद्याला हवी असलेली वेळ आली आणि कैद्याने, स्वच्छता गृहात जाण्यासाठी आरक्षींची (पोलीस) परवानगी मागितली. आरक्षी त्याला स्वच्छता गृहात सोडून बाहेर पहारा देत उभे राहिले.

हा कैदी  काही साधा-सुधा नव्हता, या कैद्यावर आरोप होते, राजद्रोहाचे, ब्रिटिशांविरुद्ध कारस्थान करण्याचे. हा कैदी भारतातून लंडनमध्ये बॅरिस्टर होण्याचे निमित्त करून शिकायला आला.

तो इंग्लंड मध्ये येण्यापूर्वीच त्याच्या भारतातील कारवायांचा रिपोर्ट तिथे पोहोचला होता. त्या कैद्याचा पूर्वेतिहास पाहून लंडन मध्ये पाय ठेवल्यापासून त्याच्या मागे ब्रिटिश गुप्तहेरांचा ससेमिरा लागला होता. पण तरीही हा कैदी बॉम्ब बनवण्याचा विधी भारतात पाठवण्यात यशस्वी झाला, या कैद्याने गुप्तपणे पिस्तुले देखील भारतात पाठवली होती.

त्याने ब्रिटिशांचा याहुन एक भयंकर गुन्हा केला होता, तो म्हणजे लंडन मधील इंग्रजाळलेल्या सुखलोलुप भारतीय तरुणांच्या मनात स्वराष्ट्रभक्ती जागृत करून बंडखोरांची एक टोळीच त्याने लंडनमध्ये उभी केली होती.

ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीत गुलामांच्या देशातून एक तरुण येतो आणि त्याच साम्राज्याच्या विरोधात बंडाळी करतो हा ब्रिटिशांच्या भयंकर पेक्षाही भयंकर गुन्हाच म्हणावा लागेल.

एवढे करूनही या कैद्याची लोकप्रियता आणि युक्तिवाद इतके बिनतोड होते की; त्याच्यावर इंग्लंड मध्ये खटला भरला तर ब्रिटिश जनताच त्याच्या बाजूने उभी राहील की काय अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती. म्हणूनच त्या कैद्याला भारतात आणायचा घाट घातला होता.

खुद्द लंडनमध्ये राहून ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणारा हा कैदी म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर.

मार्सेलिस बंदरावर ब्रिटिशांच्या कैदेतून मुक्त होण्यासाठी सागर-भेट घेणाऱ्या घटनेला यंदाच्या वर्षी १११ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने त्या घटनेचा आढावा या लेखांतून आम्ही घेत आहोत. 

निसर्गविधी करण्याच्या निमित्ताने सावरकर स्वच्छतागृहात गेले, आपल्या अंगावरील कोट त्यांनी स्वच्छतागृहाच्या दारावर अडकवला, स्वच्छता गृहाच्या पोर्टहोलची काच फोडली, चष्मा काढून ठेवला आणि कसे बसे स्वतःला त्या पोर्ट होल मध्ये कोंबून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरु केला.

आपले शरीर आणि ते पोर्टहोल याचे परिमाण सावरकरांनी आधीच तपासून घेतले होते. पोर्टहोलच्या फुटलेल्या काचांमुळे अंग खरचटून निघाले. अंगावरच्या जखमांची जर काळजी करत बसलो तर कदाचित आपल्या मायभूमीच्या अंगावर अनंत जखमा करणाऱ्या इंग्रजांना शह बसणार नाही हाच विचार मनात ठेऊन सावरकरांनी हे वेडे साहस केले असणार.... पाहता पाहता त्या पोर्टहोल मधून अर्धे-मुर्धे सावरकर बाहेर पडले तोच इकडे आरक्षींना शंका आली त्यांनी दार वाजवायला सुरुवात केली. आता मात्र हातघाईची वेळ आली होती.. पण सावरकरांनी स्वतःच्या मनाचा हिय्या करून स्वतःला पोर्टहोल मधून झोकून दिले आणि काही क्षणातच सावरकर सागराला भिडले. क्रांती सागराची महासागराशी भेट झाली.

एकीकडे समुद्राच्या खाऱ्या पाण्यांमुळे अगांवरच्या जखमा ठणकत होत्या तर नौकेवरून आरक्षींनी गोळीबार सुरु केला अवघ्या १५-२० मिनिटात सावरकरांनी बंदराचा तट गाठला ...... फ्रांस खरं तर ब्रिटिशांच्या साम्राज्यापासून स्वतंत्र असे राष्ट्र होते त्यामुळे सावरकरांना वाटले की इथे आपल्याला पकडले तरी आधी फ्रांसच्या सरकारच्या स्वाधीन करावे लागेल आणि मग तिथे खटला चालून पुढची कार्यवाही होईल. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही; ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लाच लुचपत देऊन फ्रांस अधिकाऱ्यांकडून सावरकरांना अनीतीने ताब्यात घेतले. पुन्हा एकदा सावरकर जेरबंद झाले.

खरे तर एका कैद्याचा सुटकेचा निष्फळ प्रयत्न म्हणून या घटनेकडे पहिले तर यात विशेष असे काहीच नाही; कैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न करणारे अनेक कैदी असतात मग त्यातलाच हा एक अशी जर कोणी समजूत करून घेणार असेल तर ती त्या व्यक्तीची अपरिपक्वता ठरेल असेच मला वाटते.

या घटनेचे विश्लेषण करताना काही प्रमुख बाबींचा विचार केला पाहिजे.

१) सावरकरांची या धाडसा मागील भूमिका :

क्रांतिकार्यातील धाडस किंवा मोहीम करताना गुप्तता आणि सुरक्षा हा  एक महत्वाचा भाग असतो.

हे पूर्णपणे ठाऊक असणाऱ्या सावरकरांनी इतक्या उघडपणे आणि जवळ जवळ अशक्यप्राय असणारे धाडस करण्याचे जेंव्हा ठरवले असेल तेंव्हा त्यापाठीमागे नक्कीच काहीतरी विचार असणार हे स्पष्टच आहे.

सावरकरांना जेंव्हा; इंग्लंड मधून भारतात हलवण्याचा निर्णय पक्का होत असल्याची चाहूल लागली त्यावेळी त्यांनी आपले सहकारी अय्यर यांच्या मार्फत, मादाम कामा आणि फ्रांस मधील अन्य सहकारी याना मार्सेलिस बंदरावर येण्याचे आधीच कळवले होते.

याचाच अर्थ हि घटना काही उत्स्फूर्तपणे किंवा आततायीपणे  घेतलेला ऐनवेळॆसचा निर्णय नव्हे.

राहता राहिला प्रश्न स्व-सुरक्षेचा तर; कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला म्हणतात त्यातलाच हा प्रकार. कारण सावरकरांच्या कृत्याचे दोंनच परिणाम होणार होते, मुक्त होणे किंवा पुन्हा जेरबंद होणे. आधीच कैदेत असल्याने पुन्हा कैद झाली तर फारसा फरक पडणार नव्हता, थोडीशी शिक्षा वाढली असती एवढेच. सावरकरांना शिक्षेची भीती नव्हतीच. अर्थात हा केवळ आमचा कयास नसून, मार्सेलिस बंदरावर जेरबंद झाल्यानंतर स्वतः सावरकरांनीच याबाबत आरक्षींना ठणकावले होते की;

 " मी माझ्या घरादाराला आग लावून आलो आहे, त्यामुळे माझे काहीही नुकसान अजून होणार नाही; तुम्ही (अधिकारी ) मात्र उगाच लोकांच्या रोषास पात्र ठराल ..... "

 इंग्लंड वरून भारतात जाताना, हे जहाज कधी कुठे असेल याचा बरोबर अंदाज सावरकरांना होता त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तिथे बोलावले होते. अर्थात केवळ दुर्दैवाने त्यांचे साथीदार हे नाट्य झाल्यानंतर पोहोचले अन्यथा सावरकर आपल्या योजनेत यशस्वी ठरले असते.

२) सावरकरांचे आंतरराष्ट्रीय कायदे आणि राजकारणाचे आकलन;

सावरकरांनी हि योजना यशस्वी करण्याकरता फ्रान्सचीच भूमी का निवडली असेल ?  कारण फ्रांस हे राष्ट्र त्यावेळी ब्रिटिशांच्या अमलाखाली नव्हते. त्यामुळे त्या राष्ट्राच्या सीमेत जर सावरकर पकडले गेले तर त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार फ्रांसच्या ताब्यात राहावे लागणार होते. याचा सावरकरांना होणारा फायदा म्हणजे, ब्रिटिशांच्या कैदेतून मुक्तता आणि फ्रान्सच्या सहकार्याने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर मांडणे.

सावरकरांचे अंतिम ध्येय हे स्वातंत्र्यच होते त्यातून ते स्वतः बॅरिस्टर होते त्यामुळे जागतिक स्तरावरून कायद्याच्या आधारे आपले म्हणणे प्रमुख राष्ट्रांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्याद्वारे ब्रिटिशांच्या हुकूमशाहीला उघडे पाडणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून इंग्लंडवर दबाव आणणे ही दीर्घसूचना मनात ठेऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतो.

या घटनेमधून, सावरकरांच्या आंतरराष्ट्रीय कायदे आणि राजकारण यांचे असणारे आकलन स्प्ष्ट होते.

३) या घटनेचे झालेले परिणाम.

कोणत्याही घटनेचे महत्व, महनीयता हि त्या घटनेच्या परिणामावरच अवलंबून असते. त्यामुळे या घटनेचे झालेले परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे.

या घटनेने  केवळ फ्रांसच नव्हे तर जगातील बहुतेक पत्रकारांचे लक्ष वेधून घेतले. सावरकरांची तुलना मॅझिनी-गोरीबाल्डी यांच्याशी करण्यात येऊ लागली.

भारतातील राजकीय स्थिती आणि सावरकरांचे कार्य याची शक्य तितकी माहिती मिळवून, ते छापण्यात सर्वच सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार करण्याऱ्या  वृत्तपत्रांनी पुढाकार घेतला.

मार्सेलिसमध्ये तर कित्येक दिवस या घटनेची चर्चा होत राहिली. या साऱ्याचा परिणाम असा झाला की; ब्रिटिश जनतेने इंग्लंडच्या सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मांडण्याची सावरकरांची मनीषा पूर्णत्वाला गेली.


या प्रकरणानंतर कडेकोट बंदोबस्तामध्ये सावरकराना मुंबई येथे आणण्यात आले, पुढे जवळ जवळ तीन-चार महिने सावरकरांवर खटला चालवण्यात आला.

या खटल्याचे वैशिष्ठ्य म्हणजे, आरोप लावणारे, अटक करणारे, खटला भरणारे आणि शिक्षा ठोठावणारे सगळेच ब्रिटिश ..... त्यामुळे निकाल काय लागला हे आपणास ठाऊकच आहे. परंतु अशाही परिस्थितीत सावरकरांना जागतिक पातळीवरून मिळणारी सहानभूती आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारवर वाढलेला दबाव यामुळे हे प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले. हेगच्या न्यायालयाने सावरकरांना फ्रान्सच्या  ताब्यात न देता थेट भारतात आणणे हा प्रकार अनिर्बंधिक (बेकायदेशीर) हे मान्य केले पण सावरकरांची झालेली शिक्षा मात्र ते रद्द करू शकले नाहीत.

ब्रिटिश सरकारने सावरकरांची एवढी धास्ती घेतली की त्यांना भारताच्या कोणत्याही कारागृहात ठेवणे धोक्याचे वाटू लागले. अखेर जानेवारी १९११ मध्ये सावरकरांना २५-२५ अश्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. या शिक्षा ८ दिवसांच्या फरकाने सुनावण्यात आल्या .

प्रथम शिक्षा सुनावताना ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिले हा गुन्हा होता तर दुसरी शिक्षा मात्र, सावरकरांच्या वंदे मातरम या निबंधातील इंग्रजांच्या दृष्टीने आक्षेपार्ह असणाऱ्या काही ओळींमुळे झाली होती.

सावरकर २५ वर्षांनी सुटून आले तरी आपणास त्यांच्यापासून धोकाच आहे असे वाटल्याने त्यांना दुसरी शिक्षा करण्यात आली.

सावरकरांना झालेली दुसरी शिक्षा हीच; ब्रिटिश सरकारने त्यांच्या घेतलेल्या दहशतीची पावतीच आहे.

ज्या घटनेने सावरकर आणि एकंदरीतच भारतीय क्रन्तिकारकांना जागतिक स्तरावर देशभक्तांचा सन्मान मिळवून दिला, त्या घटनेस आज १११ वर्षे पूर्ण होत असूनही त्या घटनेचा विसर न पडणे हेच त्या घटनेचे कालातीत यश आहे असेच मला वाटते.

सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या या सागर-भेटीचे, उडीचे केवळ उदात्तीकरण न करता, त्यामागची सावरकरांची भूमिका, आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी पत्करलेला धोका आणि मुख्य म्हणजे अपयशी प्रयत्नातून मिळवलेले यश; याचे मंथन होऊन त्यातून राष्ट्रकार्यासाठी समर्पित होण्याची प्रेरणा आपणांस मिळावी या याकरताच हा लेखन प्रपंच.

© श्रीपाद श्रीकांत रामदासी 

Comments

Unknown said…
खूपच प्रेरणादायी व सावरकरांचा मुख्य हेतू स्पष्टकरणारा लेख. 💐💐