श्री शिवराजाभिषेक [ Coronation ceremony of Shivaji Maharaj ]
मध्ययुगीन
भारताच्या इतिहासामध्ये अनेक अपूर्व अश्या
घटना, प्रसंग घडले आहेत. त्यातील
अत्यंत महत्वाची आणि कालातीत घटना
म्हणजे, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी
महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हि होय. वास्तवात
एखाद्या राजाचा राज्याभिषेक होणे हा प्रसंग
जरी तत्कालीन समाज पद्धतीनुसार सामान्य
असला तरी, छत्रपती शिवाजी
महाराजांचा राज्याभिषेक ही घटना किंवा
प्रसंग हा असामान्य होती
असेच आम्हांस वाटते.
एखादी
घटना जेंव्हा असामान्य म्हणून गणली जाते, तेंव्हा
त्या घटनेचे पूर्वरंग आणि परिणाम हे
दूरगामी असतात.
श्री
शिवराज्याभिषेकाचे देखील तसेच आहे.
शिवाजी
महाराजांचे राज्य हे काही वंश
परंपरेने चालत आलेले किंवा वारसा
हक्काने प्राप्त झालेले राज्य नव्हते. शिवाजी महाराजांचे राज्य, स्व-धर्म, स्व-संस्कृती, स्व-भाषा यांचा
स्वाभिमान तथा अवलंब असणारे
स्व-राज्य होते. शिवरायांच्या जन्मापूर्वीची भारतीयांची परिस्थिती अत्यंत दयनीय तसेच परकीय आक्रमक
आणि राज्यकर्ते यांच्या अत्याचाराखाली भरडली जाणारी अशीच होती. शिवरायांनी
रोहिडेश्वरी स्वराज्य स्थापनेची शपथ वाहून सतत
३०-३५ वर्षे अविश्रांत
परिश्रम करून, शिवपूर्व काळातील परिस्थिती पार बदलून टाकली.
इथल्या भूमीपुत्राचा हरवलेला स्वाभिमान त्यांनी जागृत केला, माता भगिनींची होणारी
विटंबना थांबवली, कृषीवल, व्यापारी, उदमी यांच्या उत्पन्नाचे
संरक्षण तथा अभिवृद्धी केली.
साधू, संन्यासी, गोसावी, ईश्वरभक्त, आदी मंडळींना धर्माचरण
करण्यासाठी निर्विघ्न वातावरण निर्माण केले, देव
देश आणि धर्म यांच्या
साठी लढायला, झिजायला आणि त्यांचा सन्मान
करायला शिकवले. अनेका अनेक प्रकारे रयतेचे
कल्याण करून त्यांची अभिवृद्धी
करणारे राज्यधोरण अवलंबले.
एकी
कडे रयतेचा कल्याणकारी असणारा हा राजा, शत्रूसाठी
मात्र कळिकाळचं होता, शिवरायांनी कोणा शत्रूस रणांगणात
हरवले, कोणास सुलाह करून थांबविले, कोणास
धाक दाखवून पळवून लावले, कोणास ठकवून भुलवून सैन्यासह जंगलात बुडवले, कधी मित्रभेद केला,
कधी परस्पर दगा केला, कधी स्वतः शत्रूच्या
शामियाना घुसून मारामारी करोन हुसकावून लावले,
कोणास स्वतः जाऊन भेटले, कोणास
भेटीस बोलावले, कोणास छापा मारून लुटले
तर कोणास एकांगी करून दगे करोन
फाडले. राज्य रक्षणासाठी नानाप्रकारे दुर्ग बांधले, काही शत्रूंचे मिळवले,
काही डागडुजी करून उपयोगास आणले.
अश्याप्रकारे, महाराजांनी जणू काही नूतन
सृष्टीच निर्माण केली. (१)
शिवरायांच्या दरबारातील कवी भूषण यांच्या छंदातील २ ओळीतच शिवरायांच्या पूर्वीचा आणि शिवरायांच्या कार्याचा बोध होतो. त्या ओळी अश्या;
काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती ।
अगर शिवाजी ने होते, तो सुन्नत सबकी होती ।।
देवगिरीचे राज्य लयास गेल्यानंतर अभिषिक्त
असा कोणताही हिंदू राजा झालाच नव्हता,
त्यामुळे हिंदू सिंहासन आणि हिंदू राज्य
पुन्हा स्थापन करून आपली
जनता ही कोण्या जहागीरदाराची
जनता नव्हे, आपण घातलेला घाट,
केलेला खटाटोप हा काही पुंडावा
नाही, आपल्या सवंगड्यानी दिलेले बलिदान हे काही स्वार्थपूर्ती
साठी नाही तर त्याला
एक उदात्त हेतू होता हे
जनमानसात रुजवून या सर्व खटाटोपाला
धार्मिक, सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा
मिळवून देण्यासाठी, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला.
विद्वदचूडामणी,
वेदोनारायण गागाभट्ट यांनी, छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी " शिवराजाभिषेक प्रयोग : " हा खासा ग्रंथच
बनवला, शुभ काळ आणि
मुहूर्त पाहून ज्येष्ठ
शुद्ध त्रयोदशी शके १५९६, ही
तिथी निश्चित केली. हिंदूंचे उभवू पाहणारे सिंहासन
शत्रूकडून नष्ट करण्याचा प्रयत्न
होऊ शकतो, हे जाणून ठराविक
वेळेपर्यंत अभिषेक सोहळ्याची गुप्तता राखण्यात आली होती याचे
संदर्भ ऐतिहासिक दस्त ऐवजातून पाहायला
मिळतात.
वर सांगितलेल्या महाराजांचा राज्याभिषेकामागच्या उद्देशाचा मतितार्थ हा राज्याभिषेक विधी
सुरु होताना, महाराजांनी केलेल्या संकल्पामध्येच आहे.
त्या
संकल्पाचा काही अंश खालील
प्रमाणे
" मम ____प्रजापरिपालनाधिकारसिद्धीद्वारा ____ परमेश्वरप्रित्यर्थ साम्राज्यादिकफलप्राप्त्यर्थ गणेश पूजनं....... "
( २ )
अर्थ
: प्रजापालनाच्या अधिकाराने सिद्ध होण्यासाठी, परमेश्वराचे अधिष्ठान ठेवून साम्राज्य मिळण्यासाठी श्री
गणेश पूजन
राज्याभिषेकाचा
सोहळा एकंदरीत ७ दिवस धार्मिक
विधी, संस्कार आणि ८ व्या
दिवशी मंचकारोहण असा ऐसपैस आणि
दिमाखदार होता. या अभिषेकामध्ये सर्व
वर्णांनी एकत्रित भाग घेतला होता
ही बाब तत्कालीन सामाजिकदृष्ट्या
अलौकिक आहे.
याच प्रसंगी महाराजांनी
स्वतः च्या नावानी नाणी
पाडली, राज्याभिषेक शक सुरु केला
मुख्य म्हणजे व्यवहारामध्ये प्रचलित असणाऱ्या १४०० फार्सी, उर्दू
शब्दांना मराठी, संस्कृत प्रतिशब्द असणारा राजव्यवहार कोष निर्माण करून
घेतला, राजव्यवहारात पत्रांचे असणारे किचकट मायने रद्द करून सोपे,
सुटसुटीत, मुद्देसुत असे नवे मायने
असणारी लेखन प्रशस्ती सुरु
केली. विद्वान ब्राम्हण, पुरोहित, आचार्य, गोर गरीब यांना
भरभरून दान धर्म केला,
प्रतापगडाच्या श्री आदिशक्ती तुळजाभवानीला
सव्वा मण सोन्याचे छत्र
वाहिले. एकंदरीतच काय तर महापराक्रमी
असणाऱ्या महाराजांनी आपला राज्याभिषेक संपूर्णत:
धार्मिक पद्धतीने करून स्वधर्माचा सन्मानच
केला. महाराजांनी सुवर्णरत्नजडित हिंदवी सिंहासन स्थापन करून, ज्या उदात्त हेतूने
राजांच्या सवंगड्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या बलिदानाचे सार्थक
केले. स्वतः सिंहासनारूढ होऊन यावनी राजसत्तांच्या
छाताडावर हिंदूंचे सार्वभौम साम्राज्य स्थापन करून दाखवले.
त्यामुळेच
शिवबखरकार अनंत सभासद म्हणतात
तेच खरे,
" छत्र
जडावाचे मोतीलग झालरींचे करून मस्तकावर धरिलें. छत्रपती असे नाव चालविले. कागदीपत्री स्वस्तिश्री (राज्याभिषेक) शक सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालविला.... येणें प्रमाणें राजे सिंहासनारूढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पादशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही " (३)
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।
नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ।।
यशवंत किर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।।
आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळां ठायी ।।
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।।
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ।।
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।
संकलन-लेखन : श्रीपाद श्रीकांत रामदासी
संदर्भ
:
(१) रामचंद्र अमात्य कृत आज्ञापत्र.
(२)
गागाभट्टकृत श्रीशिवराजाभिषेक प्रयोग :
(३)
सभासद बखर.
Comments