शुभ सकाळ (उत्तरार्ध )

 

 ........

डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि निसरड्या वाटेवरून झपाझप पावले टाकीत, काहीसे धापा टाकतच रंगरावांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे.

अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की;

" मोठ्या गाडीची करावी लागेल, यांना तालुक्याला न्यावे लागेल .... "

खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला प्रतापरावांची  गाडी तेव्हढी वाचली होती....

प्रतापराव आणि रंगराव यांचं वैर तर जगजाहीर होते, त्यातून नुकतीच त्यांच्यातली झालेली चढाओढ याने तर दोघांतील दुहीचा कळसच गाठला होता.

अश्या परिस्थितीत प्रतापरावांकडे रंगरावांसाठी मदत मागायची म्हणजे, मदत मागणाऱ्याचीच कत्तल होती.

निळकंठ म्हणाला " डॉक्टर...  प्रतापरावांशिवाय कुणाचीच गाडी न्हाय आता .... कसं करावं म्हंता ? "

डॉ. राकेश म्हणाले " प्रतापरावांकडे या कामासाठी जायचे म्हणजे ये रे ये रे बैला अन हाण माझ्या मागल्या.... असंच आहे.... "

निळकंठ म्हणाला " पर जावं तर लागणारच... आलूच जाऊन ! " असे म्हणतच निळकंठ पुन्हा बाहेर पडला, धावत पळतच त्याने प्रतापरावांचा वाडा गाठला.

मनाचा हिय्या करूनच त्याने दार वाजवले.... थोडावेळ जाताच प्रतापरावांचा गडी भिवाने दार उघडले... समोर निळकंठ आलेला पाहून तो देखील चक्रावला,

" काय रं काय झालं ? " भिवा विचारले....

" मालक हाईत का ? जरा जल्दीचं काम हुतं " निळकंठ म्हणाला.

" कसलं काम ? मालक झोपल्याती..... मागाहून ये " भिवा म्हणाला ..

खरं तर वैर यांच्या मालकांचे होते पण वितुष्ट मात्र गड्यातही आले होते, चहा पेक्षा किटलीच जास्त गरम असते असे म्हणतात ते हेच....

" भिवा ऐक जरा, लै मोठी नड हाये म्हणून धावत आलुय लेका... मालकास्नी आवाज दे की " निळकंठ अजीजीने म्हणाला...

" निळ्या ! तुला ठावं हाय ना .... " भिवा असे म्हणत असताना त्याला तोडून निळकंठ म्हणाला,

" आरं सम्द ठावं हाये पर मालकास्नी उठिव बाबा ! गावदेवीची आन हाय तुला.... हवं तर पाया पडतु तुझ्या .... "

निळकंठची ही अवस्था बघून भिवा जरा गडबडलाच, पण शेवटी गावदेवीची शपथ घातली म्हटल्यावर, मामला खूपच हातघाईचा आहे हे त्याने ओळखले.

निळकंठला दारा जवळच उभा ठेवून तो आत धावला..... काही क्षणात दारा जवळ येऊन म्हणाला.... " हं ! चल आत; मालक येतायत ओसरीवर, पण निळ्या काम जर महत्वाचं नसलं आणि मालक माझ्यावर वराडलं; तर मग तू हाय अन म्या हाय "

एव्हाना प्रतापराव ओसरीवर आले होते. त्यांना बघून निळकंठ अक्षरश: त्यांच्या पायावर डोकं ठेऊन म्हणाला....

" मालक आमच्या सायबास्नी वाचावा..... "

थोडेसे गडबडून प्रतापराव म्हणाले " का रं काय झालंय तुझ्या सायबाला ? "

" हार्ट अटॅक आलाय, अन डॉक्टर म्हंतायत की तालुक्याला न्यावं लागल; सायबाची गाडी आदीच तालुक्याला नेली आहे पार्टीच्या लोकांनी आणि गावात कुणाची बी गाडी न्हाई... फकस्त तुमची गाडी हाये.... एवढं पुण्य पदरी घ्या मालक ..... गाडी लावून द्या ! मालक गाडी लावून द्या !! "

प्रतापरावांना परिस्थितीचा अंदाज आला, आपली दुश्मनी ठाऊक असूनही हा निळकंठ आपल्या कडे आला म्हणजे खरंच परिस्थिती गंभीर आहे हे त्याने ओळखले. दुसरे असे की; एक सामान्य नोकर माणूस आपल्या मालकाच्या जीवासाठी वैऱ्याच्या पाया पडतोय, ढसाढसा रडतोय याचेही त्यांना कौतुक वाटले.

" निळ्या ! लेका धन्यासाठी वैऱ्याच्या दारी आलास ! कमाल आहे तुझी.... हे बघ तू कायबी काळजी करू नकोस तुझ्या धन्याला काय बी होणार न्हाई... "

मग प्रतापरावाने आपली गाडी आणि ड्रायव्हर महादू यांना निळकंठ सोबत पाठवले. प्रतापरावांची गाडी आलेली पाहून डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले

निळकंठ गाडीतून उताराला तसे डॉक्टर म्हणाले " निळोबा मोठीच कृपा केलीस तू धन्यावर ! "

" माजी कसली किरपा, ही तर गावदेवीची किरपा " निळकंठ असं सहजच म्हणाला, पण मुळात नास्तिक असणाऱ्या डॉक्टरांना मात्र ते तशाही परिस्थितीत आवडले नाही. पण प्रसंग लक्षात घेऊन ते गप्प बसले आणि रंगरावांना गाडीत बसवून तालुक्याकडे निघाले.

डॉ. राकेश गाडीत बसल्यानंतर विचार करत होते की; रंगराव आणि प्रतापराव दोघेही गावासाठी गेले कित्येक दिवस राबत होते... दोघांच्यात वैर असून एकमेकांच्या आड न येता, पुरातून गाव वाचवत होते... हेच खरे राजकारण आणि समाजकारण, नाहीतर काही काही लोकं आपल्या गावाचे हित कश्यात आहे ? याचा विचार न करता केवळ आपल्या स्वार्थासाठी भांडत बसतात,  विरोधासाठी विरोध करायचा म्हणून, चांगल्या कामांच्या देखील आड येतात. या दोघांचे पक्ष श्रेष्ठी जरी यांना चुचकारत होते तरीही, पुराच्या प्रसंगी या दोघांनीही

पक्षीय राजकारण बाजूला ठेवले. नाही म्हणायला वर दाखवण्यासाठी वेगवेगळे दौरे घडवून आणले पण त्यातही केवळ गावाला जास्तीत जास्त मदत व्हावी हाच हेतू मनात ठेवलेला दिसत होता. आत्ताही गाडीच्या निमित्ताने प्रतापरावाने दाखवलेला पोक्तपणा हे देखील त्यांच्यातल्या सुसंस्कृतपणाचं दर्शनच घडवत होता.

दोघांमध्ये स्पर्धा नक्कीच होती पण त्याच्यामुळे गावात तंटा होईल असे ते कधीच वागले नाहीत. दोघांच्या आजूबाजूचे नोकर, गडी हे देखील आपापल्या मालकाशी इमान राखून वैर साधायच्या ठिकाणी वैर साधायचे पण त्याचा परिणाम कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर कधी येऊ दिला नाही. खरं तर राजकारणामध्ये एक गोष्ट नेहमीच दिसते की; विरोधी नेते वेळप्रसंगी एकमेकांचे मित्र बनतात  पण कार्यकर्ते मात्र कायमचे वैरी बनतात. राजकीय मत-मतांतरे, चढाओढ ही केवळ राजकारणाच्या फाडापुरती मर्यादित राहिली तर समाजात आजकाल दिसणारी दुफळी, वैमनस्य आणि सदोष स्पर्धा कायमची निघून जाईल.

 एवढ्यात अचानक गाडी थांबली आणि डॉक्टरांची विचार शृंखला थांबली...

" काय झाले महादू ? " डॉक्टरांनी विचारले ...

" काय कळेना बगा पण गाडी एकदम बंदच पडली.... चालू बी होईना ... "

डॉक्टर राकेशची काळजी वाढली, रंगरावांना वेळीच उपचार नाही मिळाले तर त्यांच्या जीवावर बेतू शकत होते....

" थांबा,  हितच बजरंग ग्यारेज हाये, त्याला बोलिवतो... " महादू म्हणाला ....

धावतच तो बजरंग ग्यारेजकडे धावला ..... पुरात खराब झालेल्या गाड्या रात्रभर दुरुस्त करून हणमंता म्हणजेच त्या बजरंग ग्यारेज चा मालक दमून भागून पहुडला होता. महादुने त्याला उठवले आणि म्हणाला " गाडी बंद पडलीये "

हणमंता त्या महादुला बघून जरा चिडूनच म्हणाला " काय रं म्हाद्या आर काय येळ काळ हाय का नाही ? .... सकाळी ये गाडीचे काम करू ... अंग लै दुखतंय माज "

महादू म्हणाला;

" आर गाडीत रंगराव हायेत त्यांना तालुक्याला नेतुया दवाखान्यात...  डॉक्टर सायेब बी हायेत गाडीत .... जरा बग की "

खुद्द डॉक्टर रंगरावांना; प्रतापरावांच्या गाडीतून नेतायत म्हणजे मामला गंभीर आहे त्याने ओळखले, आपली हत्यारांची पिशवी घेऊन तो निघाला...

थोड्यावेळ झटापट करून हणमंत म्हणाला " म्हाद्या मार स्टार्टर .... " आणि गाडी सुरु झाली...

डॉक्टरांनी खिशाकडे हात नेला तसा हणमंत म्हणाला " सायेब आधी तालुका गाठा पैश्याचं बघू नंतर " जाऊ द्या गाडी ....

डॉ. राकेशने अभिवादन करण्यासाठी त्याचे हात हातात घेतले तेंव्हा त्यांना कळले हणमंता स्वतः तापाने फणफणतोय...

" हणमंता ! अरे तापानं फणफणतोयस की, थांब तुला औषध देतो " डॉक्टर म्हणाले आणि

गाडीतून आपल्या बॅग मधून त्यांनी गोळ्या काढल्या आणि म्हणाले " तीन डोस घे बरे वाटेल ".

मग लगबग करून गाडी पुढे निघाली....

काही दिवसांनी सगळे ठीकठाक झाल्यावर रंगरावांनी, डॉक्टर, प्रतापराव, महादू आणि हणमंत यांना वाड्यावर बोलावलं.... हणमंत जरा उशिराने आला त्याच्या हातात कसला तरी पुडा होता....

डॉक्टर म्हणाले " काय हणमंता बारायस ना ? "

" व्हय जी ! हे  घ्या येशीच्या मारुतीचा परसाद ... शनवार हाय ना आज "  हणमंता म्हणाला.

डॉक्टर म्हणाले " अरे मी देव, प्रसाद वगैरे काही मानत नाही माहितीये ना ! संकटात धावून येणारा तुझ्या सारखा माणूस हाच माझ्यासाठी देव "

खरं तर, डॉक्टर राकेश हे देव धर्म न मानणारे पक्के नास्तिक आहेत हे हणमंताला माहित होते, त्याचे आणि डॉक्टरांचे या बाबत अनेकदा वाद-विवाद देखील झाले होते. डॉक्टर राकेश तसा पंचविशीतला तरुण तर हणमंता चाळीशी उलटून गेलेला थोराड गडी होता. हणमंताच्या कष्टाळू स्वभावामुळे डॉक्टर त्याचा आदर करायचे आणि डॉक्टर राकेशच्या मनमिळावू स्वभावाचे हणमंताला देखील अप्रूप वाटायचे. राकेश आपल्यापेक्षा १५-१६ वर्षाने लहान आहे हे माहित असून देखील केवळ त्याचे शिक्षण आणि रुग्णसेवेची तळमळ यामुळे, हणमंता डॉक्टरांना साहेब म्हणायचा, अहो जाहो घालायचा, शिक्षणाचा मान ठेवायचा म्हणूनच त्यांच्या समोर पडती बाजू घ्यायचा तर कधी त्यांच्या पोरसवदा वयाचा विचार करून वाद सोडून द्यायचा.

पण आज एकंदरीतच मोकळे झालेले वातावरण पाहून हणमंताच्या मनातले सगळे किंतु परंतु संपले आणि तो म्हणाला,

" त्ये तुमच्या सारख्या शिकलेल्या लोकांसारखं आपल्याला काय कळत नाही बगा, पण एवढं मात्र ठावं हाय की त्या दिवशी तुमची नेहमीची गाडी चुकनं आणि तुम्ही हितच गावात थांबणं, माझ्या ग्यारेज जवळ गाडी बंद पडणं आणि माझं तिथं असणे, माझ्या ग्यारेजच्या पुढं त्या शकीलचं बी ग्यारेज हायेच की; पण पूर आला अन त्यो गेला पळून त्याच्या गावी बिहारला. अडचणीच्या काळात गावात थांबायची बुद्धी देणारा देवच हाये बघा,  तुमची गाडी झटक्यात सुरु करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती मला आमच्या मारुतीरायांनीच म्हणजेच देवाने  दिली,  भांडण इसरून आपली गाडी द्यायची  प्रताप मालकास्नी बुद्धी  त्या मारुतीनंच,  म्हणजेच देवाने दिली, ही सारी  योजना त्या मारुतीरायचीच,  म्हणजेच देवाचीच.....

आन असं बगा...  आमचं, ज्ञानोबा, तुकोबा, रामदास, निळोबा, चोखोबा, रविदास, नामदेव, नवनाथ, मुक्ताई, जनाई, वेणुबाई ही सगळी मंडळी त्या भगवंताच्या भक्तीत रमली ती काय उगाचच होय. आपल्या समद्यांचं दैवत असणारं शिवाजी महाराज यांनीबी तेंच्या गडावर मंदिरं बांधलीच की; ते बी भवानी आई आणि शंभू शंकराचं भक्त होतेच की; या साऱ्या पेक्षा आपण काय लय श्याने हौत होय. माणसात देव नक्की बघावा हे खरंय; पण त्या माणसाला देव बनायची बुद्धी देणाऱ्या भगवंताला नाकारता येणार न्हाई. त्यो हाये…….  समदीकडे हाये, फकस्त त्यो आपल्याला येळीकाळी माणसाच्या रूपानं भेटतो. “

हणमंता कडून मिळालेले हे उत्तर, डॉक्टरांना अनपेक्षित होते आणि थोडे बहुत पटलेही होते; पण तरीही आपला मुद्दा सोडायचा नाही म्हणून ते म्हणाले,

“ तू काहीही म्हण हणमंता, पण माझ्यासाठी विज्ञान हाच देव आणि माणुसकी हाच धर्म; अरे विज्ञानानेच जग एकमेकांशी जोडले गेले आहे आणि जर तुझा देव सगळीकडे असता तर गावाला वाहून कसे जाऊ दिले असते ?"

यांवर गालातल्या गालात हसून, हणमंता म्हणाला,

" डॉक्टर सायेब, तसं तर तुमचं इन्यान बी गावाला वाचवू शकलं न्हाई, धर्माचं म्हणाल तर माणुसकी शिकवणारा धर्म हा आमच्याच देवाचा धर्म आहे.   ‘भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे’ हा संदेश ज्ञानेश्वर माउलींनी याच धर्माद्वारे दिला आहे. म्हणून म्हणतो डॉक्टर साहेब, तुमच्या विज्ञानामध्ये जग जोडायची ताकद असली तरी माणूस जोडायची शक्ती ही फक्त भगवंतातच आहे आणि त्याच शक्ती नाव म्हणजेच धर्म  .... काय चुकलं असलं तर जोड्यानी हाना ... "

हणमंताचे हे बोलणे ऐकून डॉक्टर निशब्द झाले आणि काही क्षण थांबून म्हणाले....

" आण दे तो प्रसाद ! .... आज तू मला नवी जाग आणलीस .... "

एकंदरीतच काय तर, चंद्रमुखीच्या पुरात नुसते गावच नाही तर, वैरभाव आणि नास्तिकता सुद्धा वाहून गेली एका अर्थाने गाव निर्मळ झाला.

संकटाच्या त्या काळरात्रीनंतर उगवलेली ही सकाळ, प्रतापराव आणि रंगराव यांची दिलजमाई करणारी, डॉक्टरांच्या मनातील नास्तिकता घालवणारी खऱ्या अर्थाने " शुभ सकाळ " ठरली.

पुरामुळे उध्वस्त झालेली आजची ही चंदनवाडी, मैत्री, परस्पर सहकार्य, सात्विकता, बंधुभाव, स्वामीनिष्ठा या सगळ्या बाबींमुळे उद्याचे नंदनवन होण्याच्या वाटेवर चालू लागली……

 

।। समाप्त ।।


Comments