शुभ सकाळ (पूर्वार्ध)
छायाचित्र : इंटरनेटवरून साभार.
चंद्रमुखी नदीच्या तीरावर वसलेली दोन गावे, कोळसेवाडी आणि चंदनवाडी.
खरं तर एका आख्यायिकेनुसार ही दोन्ही गावं एकच होती. चंदनवाडी असंच त्याचं नावं. चंदनाच्या
महावृक्षांचे गर्द जंगल असल्यानं त्या गावाचं नाव चंदनवाडी पडलं होतं.
कोण्या एका ऋषींच्या शापाने किंवा कोपानं ते जंगल भस्म झालं.
भस्म झालेला भाग पुढे कोळसेवाडी म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही ती जमीन अगदीच बरड आहे. पण चंदनवाडीची जमीन
मात्र चांगलीच कसदार आहे. सत्पुरुषांचे आशिर्वाद जितके मंगलदायी असतात तितकेच त्यांचे
शाप दुःखदायी असतात. त्या आख्यायिकेवर विश्वास जरी नाही ठेवला तरीही, एकाच नदीच्या
दोन्ही तीरावर जमिनीतला हा फरक हे सुद्धा आश्चर्यच म्हणावे लागेल.
चंदनवाडीच्या दोन्ही अंगाला मोकळी पांढरीची मैदाने, एका मैदानात
गावदेवीचे मंदिर तर दुसऱ्या मैदानात शंभू शंकराचे; त्याच्या पुढे टेकड्याची पठारे.
गावाच्या पुढे असणाऱ्या मोकळ्या जागेत बाजार पटांगण तिथेच जत्रा भरत असे. बाजाराच्या
पलीकडे नदी. मुळात दक्षिण वाहिनी असणारी नदी गाव संपता संपता तिच्या उजव्या अंगाला
वळसा देऊन, नैऋत्य वाहिनी होत होती. तिच्या अश्या चंद्रकृती आकारानेच तिला चंद्रमुखी
नांव पडलं असावं. नदीच्या डाव्या अंगाला म्हणजेच गावाच्या समांतर दोन्ही बाजूला शेती
आणि मळे होते.
गावाच्या चौथ्या अंगाला म्हणजेच पठाराच्या दुसऱ्या अंगाला डांबरी
होती, तालुक्याला जोडणारा हा एकमेव रस्ता. अशी गावची रचना होती. चंदनवाडी गावापासून खूप पुढे उत्तरेला एक धरण होते. त्यातून
सोडलेले बहुतेक पाणी मधल्या कॅनॉल आणि पाईपलाईन मध्येच विरून जायचे. नाही म्हणायला
थोडे बहुत पाणी पात्रात खळखळत असायचे.
दोन्ही पठारांवर गावच्या दोन बाहुबलींचे भरभक्कम वाडे होते; त्यातले
एक रंगराव देशमुख आणि दुसरे प्रतापराव पाटील.
रंगराव आणि प्रतापराव हे तसे जुने मित्र पण वयात आल्यावर दोघांनी
राजकारणाचे वेगवेगळे पक्ष धरले. पक्षीय राजकारणातील मक्तेदारी टिकून राहावी म्हणून
त्या पक्षांच्या नेत्यांनी दोघांमध्ये वितुष्ट आणले. यांची स्पर्धा, ईर्षा ही फार टोकाची
झाली होती. त्यामुळे गावाबाहेर डांबरीवर येणारी एस टी एकाच गावात दोनदा थांबायची. एकदा
रंगरावांच्या पठाराखाली आणि दुसऱ्यांदा प्रतापरावांच्या पठाराखाली. खरं तर दोघांच्याही
घरातलं कोणीही कधीही त्या एस टी ने प्रवास केला नसेल, पण स्पर्धा म्हणजे स्पर्धा; त्यात
तडजोड नाही. एकाने सरकारी आरोग्य केंद्र आणलं तर दुसऱ्याने १० वी पर्यंतची शाळा. एकाने
हॅन्डपंप बसवावे तर दुसऱ्याने टँकर मागवावे. एकाने साखर कारखान्याचे चेअरमन व्हावे
तर दुसऱ्याने सहकारी बँकेचे अध्यक्षपद पटकवावे. हे असा सगळा प्रकार होता. हे जेंव्हा
अति होतंय असं वाटलं; तेंव्हा गावात तंटा नको म्हणून, गावाने एकत्र येऊन दोघांना सरपंच
पद आळीपाळीनं घ्यायला सांगितलं. तसेही यांच्या विरोधात निवडणूक लढवायची निदान गावात
तरी कोणाची हिम्मत नव्हती. यंदाचा सरपंचपदाचा मान प्रतापराव पाटलांकडे होता.
चंदनवाडी गावांतली पहाटेची वेळ म्हणजे अगदीच प्रसन्न असायची,
कुठे कोंबड्याचे आरवणे, कुठे पक्षांची किलबिल, तर कुठे गोठ्यातल्या गायींच्या गळ्यातील
घंटेची किणकिण, कोणी अनोळखी दिसला म्हणून भो भो करत भुंकणारी कुत्री, गावाजवळून वाहणाऱ्या
नदीची खळखळ अगदी ताल धरल्याप्रमाणे भासायची, तर कुठे घराघरातून सुरु झालेली लगबग….
असे अगदी नेहमीचं पण तरीही मनोहारी चित्र असायचे.
गेल्या ५-६ दिवसापासून मात्र हे चित्र पार बदलून गेलं होतं. दिवसभर
काबाडकष्ट करून दमले भागले जीव पावसात भिजणारा आपला संसार सांभाळत जरा कुठं सुख झाले
होते तोवर एकच आवई उठली, पळा ! पळा !! पाणी आलं पाणी .... पाहता पाहता नदीचं पात्र
दुथडी भरलं आणि पाहता पाहता गावात शिरू लागलं, आधी शेतं, केकताडाची पांद पार करत करत
पाणी अगदी घरात शिरलं.
तसं गावातली जुनी जाणती नेणती मंडळी नदीचं पात्र फुगतंय असं म्हणतच
होती, सरकार नेहमीप्रमाणे सतर्क रहा एवढेच सांगत होती. अगदी एवढं पाणी येईल असं त्यांना
पण वाटलं नव्हतं.
निसर्ग, नशीब आणि वेळ यांचा भरवसा धरता येत नाही आणि ते टाळताही
येत नाही हेच खरं; ते जसे खेळवतील तसेच खेळावे लागते.
पाण्याचा ओघ इतका प्रचंड होता की, जुनाट झालेली घरटी कोलमडू लागली,
माणसांची दैनाच झाली. ज्यांच्या गोठ्यात जनावरं होती त्यांनी आधी ती मोकळी केली, दावं
सुटलेलं लक्षात येताच आधीच भेदरलेली ती जनावरं शेपट्या वर करून वाट फुटेल तिकडं पळू
लागली, त्यांच्या धडकेने सैरा वैरा धावणारी गावकरी मंडळी जखमी होऊ लागली. आपलं घर,
शेती, वाहन सारं नजरे समोर उध्वस्त होताना पाहून मनावर होणाऱ्या जखमांपुढे, बाकीच्या
जखमा फिक्या पडल्या. स्वतः ची घरं आणि घरची
मंडळी शक्य तितकी सावरून, गावातल्या वज्रदेही व्यायामशाळेतली पोरं गावच्या मदतीला धावली.
ज्याला जेवढं काही वाचवता आलं त्यानं तेवढं वाचवलं. गुरांचे कासरे एकमेकांना जोडून
दोर तयार केले आणि पाण्यात वाहून चाललेल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला.
घडला प्रकार जितका अनपेक्षित होता तितकाच तो भयंकर होता.
रंगराव आणि प्रतापराव हे सुद्धा स्वतः चा नेहमीचा रुबाब आणि तोरा
बाजूला सारून माणसं वाचवण्यात गर्क झाले होते खरे पण, तश्याही परिस्थितीत त्यांच्यातली
ईर्षा, स्पर्धा स्पष्ट कळत होती.
यांचे वाडे पठारावर असल्याने ते तेवढे सुरक्षित राहिले. प्रतापरावांच्या
वाड्यालगतच एका जुन्या इमारतीत गावाचं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. तिथे नुकताच नोकरीत
रुजू झालेला सरकारी डॉक्टर राकेश येऊन जाऊन असायचा. पुराच्या दिवशी तो परत जाणार होता;
पण का कुणास ठाऊक त्याची नेहमीची एस टी चुकली आणि तो केंद्रातच राहिला.
कोरडं म्हणावं असं गावात काहीच राहिलं नव्हतं, अगदी माणसांचे
डोळे सुद्धा. दोन दिवस गावात पाणी साचून होते. तिसऱ्या दिवशी दुपारी हळू हळू पाणी ओसरू
लागलं. त्या तीन रात्री गावातल्या लोकांनी, पठारावरच्या शाळेत, आरोग्य केंद्रात आणि
रंगराव, प्रतापरावांच्या वाड्यात काढल्या. रंगराव-प्रतापरावांनी आपापल्या पक्षातुन
मदत मागवली, लोकांसाठी कपडे, जेवण, औषध जेवढं जमलं तेवढं सगळं मागवलं.
भावसात भिजल्यानं आणि थंडीत गारठल्यानं गावकरी पटापट आजारी पडू
लागले. डॉ. राकेश त्यांची जिवाभावान काळजी घेऊ लागला.
त्यादिवशी डॉ. राकेशची एस टी चुकली नसती तर? आधीच तालुक्याचे
सरकारी डॉक्टर, गावोगावांमधून रुग्ण बघत होते. खासगी वाले तश्याही परिस्थिती आपली मोठाली
हॉस्पिटल सांभाळून शक्य तितके उपचार मोफत करत होते.
एकीकडे हे असं चालू असताना, गावकरी मंडळी मात्र झाल्या घटनेमुळं
पार कोलमडून गेली होती. गावासाठी झटणारे प्रत्येक हात हेच त्यांना उभारी देत होते. कोणाला रंगरावात विठ्ठल दिसत होता, तर कोणाला प्रतापरावात
राम. कुणी मदत करणाऱ्यांना कृष्ण समजत होतं
तर कोणी डॉ. राकेश मध्ये साक्षात धन्वंतरीचे दर्शन घडत. घरं दारं गेली म्हणून कोणी
देवाला दोष देत होता, तर बाकी गेलं पण जीव वाचला यासाठी कोणी देवाचे आभार मानत होते.
चौथ्या दिवशी जेंव्हा सगळं पाणी ओसरले तेंव्हा, चिखल गाळ काढायचे
काम सुरु झाले. सारा गांव आता एकत्र येऊन चिखल
गाळ उपसत होता, पिचलेली मने, खचलेलया भिंती सावरत होती. रंगराव प्रतापराव आताही जोमाने
काम करत होते, तालुक्यातून स्वयंसेवक, सरकारी कृती दले यांचे काम सुरु झाले.
२-३ दिवस राबून गावातला सगळा राडारोडा स्वच्छ केला गेला. थोडं
बहुत सामान जमवून आसरे बनवले गेले. गावातली वाहने गावापासून जरा पुढे डांबरीवर असणाऱ्या
बजरंग ग्यारेज मध्ये पोहोचवली जाऊ लागली. चिखल गाळ जाऊन जिथं माणसं थिजली तिथं या यंत्रांची
काय पत्रास. गावातला चिखल गाळ काढून थकला भागलेला हणमंत मेकॅनिक आता आपल्या बजरंग ग्यारेज
मध्ये जमलेल्या गाड्यांतील चिखल काढायला सज्ज झाला.
आता पूर ओसरून ८ दिवस होऊन गेले होते, पाऊस सुद्धा धिंगाणा घालून
सुट्टी वर गेला होता. गावगाडा रखडत रखडत का होईना पण सुरु होत होता. उरल्या सुरल्या झाडाझुडपांवर सकाळचं ऊन पुन्हा चमकू
लागलं होतं, एव्हाना गावाबाहेर पळून आसरा घेतलेली जनावरं मिळतील तशी शोधून आणून गोठयाकडं
बांधली जात होती. रंगराव आणि प्रतापराव तालुक्याला सारखे हेलपाटे मारत होते. काय काय
म्हणून कमी आहे ते ते आणायचा प्रयत्न करत होते.
सरकारी दरबारी आपलं वजन वापरून, त्यांचं शारीरिक वजन मात्र खरंच उतरलं होतं.
डॉ. राकेश रात्रंदिवस जागून पेशंट बरे करत होता तर हणमंता मेकॅनिक
असाच रात्रंदिस राबून गाड्या दुरुस्त करत होता. १०व्या दिवशी गावात वीज आली. पहाटेचा
बोचरा वारा अंगाला नुसता झोंबत होता.
गावाकडं येणारी एस टी माणसांपेक्षा सामनानच भरलेली असायची. एस
टी तर एस टी, रंगराव-प्रतापरावांच्या गाड्या देखील सामान वाहू लागल्या होत्या.
पाहता पाहता पंधरा दिवसांचा काळ लोटला. आता गाव बराच सावरला होता.
कष्टाची कामं कमी होत आली होती. आताशा वेळ होती मंत्री महोदय आणि विरोधी पक्षनेत्यांच्या
दौऱ्यांची. तशी या मंडळींनी हेलिकॉप्टर, टेलिव्हिजन यांच्याद्वारे पूरग्रस्त गावांची
पाहणी केलीच होती पण तरीही पुढच्या वर्षीची निवडणूक लक्षात घेऊन आता ते कोरडे झालेले
गाव पाहायला आणि रडून रडून अश्रू संपल्यानं कोरडे पडलेले गावकऱ्यांचे डोळे पुसायला
आले होते. कोरडी आश्वासनं आणि कोरडी चिंता घेऊन, कोरड्या चेहऱ्यानं आलेली मंडळी आली
आणि आपापल्या गाडीत बसून गेली सुद्धा. सत्ताधाऱ्यांनी आपण कसे गावाच्या पाठीशी आहोत
हे सांगितलं तर विरोधकांनी सत्ताधारी कसे गावाच्या पाठीशी नाहीत हे सांगितलं. ज्यांना
सत्ताधारी पटले त्यांनी त्यांना दुवा दिला आणि ज्यांना विरोधक पटले त्यांनी, त्यांना
आशिर्वाद दिला.
वास्तवात मतदानानंतर आपल्या मताचे नेमके आपल्याला काय मिळाले
? याचा विचारही न करणारी जनता श्रद्धेने दोनही बाजूंची भाषणे ऐकून पुन्हा आपल्या संसाराला लागली दमून भागून उभारलेल्या राहुट्यांमधून
सुख झाली.
नाना घरे, गुरे, झाडी, वाहने आणि बरेच काही वाहून नेणारी चंद्रमुखी
आता शांत झाली होती. रात्रीच्या भयाण शांततेत तिचा मंद मंद खळखळाट तेवढा ऐकू येत होता.
पहाटेचा बोचरा वारा अंगाला नुसता झोंबत होता. एरव्ही आल्हाद देणारी
झुळूक आज अंग शहारत होती. पहाटे ४:३० च्या सुमारास, अंगावर सदरा देखील न घालता केवळ
टापरीनिशी अनवाणी पायानं रंगरावांचा गडी नीलकंठ झपाझप पावले टाकीत प्रतापरावांच्या
वाड्याजवळील आरोग्य केंद्राकडं चालत होता. चिखलाने आणि गाड्यांच्या येण्याजाण्यानं
निसरडं झालेलं रागरावांचं पठार घाईघाईनं पार झालं. गावच्या हमरस्त्यावरून जवळ जवळ धावतच
प्रतापरावांचं पठार गाठलं. आरोग्य केंद्राजवळ येताच तो डॉक्टरांना हाका मारू लागला.
डॉक्टर राकेश यांना नुकताच डोळा लागत होता, नीलकंठचा आवाज ऐकून
डॉक्टर बाहेर आले.
नीलकंठ धापा टाकतच म्हणाला " सायबांना छातीत दुखतंय, लै
त्रास होतोय जरा येताव का ? "
डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि निसरड्या वाटेवरून झपाझप
पावले टाकीत, काहीसे धापा टाकतच रंगरावांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले
की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे.
अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन
ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की;
" मोठ्या गाडीची करावी लागेल, यांना तालुक्याला न्यावे लागेल
.... "
खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण
पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला प्रतापरावांची गाडी तेव्हढी वाचली होती....
प्रतापराव आणि रंगराव यांचं वैर तर जगजाहीर होते, त्यातून नुकतीच
त्यांच्यातली झालेली चढाओढ याने तर दोघांतील दुहीचा कळसच गाठला होता.
अश्या परिस्थितीत प्रतापरावांकडे रंगरावांसाठी मदत मागायची म्हणजे,
मदत मागणाऱ्याचीच कत्तल होती.
निळकंठ म्हणाला " डॉक्टर... प्रतापरावांशिवाय कुणाचीच गाडी न्हाय आता .... कसं
करावं म्हंता ? "
डॉ. राकेश म्हणाले " प्रतापरावांकडे या कामासाठी जायचे म्हणजे
ये रे ये रे बैला अन हाण माझ्या मागल्या.... असंच आहे.... "
निळकंठ म्हणाला " पर जावं तर लागणारच... आलूच जाऊन !
" असे म्हणतच निळकंठ पुन्हा बाहेर पडला, धावत पळतच त्याने प्रतापरावांचा वाडा
गाठला.
मनाचा हिय्या करूनच त्याने दार वाजवले.... थोडावेळ जाताच प्रतापरावांचा
गडी भिवाने दार उघडले... समोर निळकंठ आलेला पाहून तो देखील चक्रावला,
" काय रं काय झालं ? " भिवा विचारले....
" मालक हाईत का ? जरा जल्दीचं काम हुतं " निळकंठ म्हणाला.
" कसलं काम ? मालक झोपल्याती..... मागाहून ये " भिवा
म्हणाला ..
खरं तर वैर यांच्या मालकांचे होते पण वितुष्ट मात्र गड्यातही
आले होते, चहा पेक्षा किटलीच जास्त गरम असते असे म्हणतात ते हेच....
" भिवा ऐक जरा, लै मोठी नड हाये म्हणून धावत आलुय लेका...
मालकास्नी आवाज दे की " निळकंठ अजीजीने म्हणाला...
" निळ्या ! तुला ठावं हाय ना .... " भिवा असे म्हणत
असताना त्याला तोडून निळकंठ म्हणाला,
" आरं सम्द ठावं हाये पर मालकास्नी उठिव बाबा ! गावदेवीची
आन हाय तुला.... हवं तर पाया पडतु तुझ्या .... "
निळकंठची ही अवस्था बघून भिवा जरा गडबडलाच, पण शेवटी गावदेवीची
शपथ घातली म्हटल्यावर, मामला खूपच हातघाईचा आहे हे त्याने ओळखले.
निळकंठला दारा जवळच उभा ठेवून तो आत धावला..... काही क्षणात दारा
जवळ येऊन म्हणाला.... " हं ! चल आत; मालक येतायत ओसरीवर, पण निळ्या काम जर महत्वाचं
नसलं आणि मालक माझ्यावर वराडलं; तर मग तू हाय अन म्या हाय "
एव्हाना प्रतापराव ओसरीवर आले होते. त्यांना बघून निळकंठ अक्षरश:
त्यांच्या पायावर डोकं ठेऊन म्हणाला....
" मालक आमच्या सायबास्नी वाचावा..... "
टिप : सदर कथेतील नावे, पात्रे आणि प्रसंग ही काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी असणारे साधर्म्य केवळ योगायोग मानावा.
Comments