अनंतवंशज मेथवडेकर - रामदासी


जय जय रघुवीर समर्थ !


काल देशभरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.  जागो जागी श्रीराम प्रतिमा स्थापून सार्वजनिक स्वरूपामध्ये देखील हा उत्सव साजरा झाला. 

श्री समर्थ संप्रदायात, श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आहे. संप्रदायातील अनेक घराण्यांपैकी एक घराणे म्हणजे,

सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील श्री अनंत महाराज  यांचे मेथवडेकर घराणे. 

सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या कृपाछत्राची दिक्षा प्राप्त असणारे मेथवडेकर; समर्थ कालापासून श्रीराम नवमीचा उत्सव करत आले आहेत. 

सद्यस्थितीमध्ये तब्बल १३ वी पिढी कार्यरत असूनही, हा उत्सव आजही कुटुंबातील प्रत्येक घरी होत आहे. 

यंदाच्या वर्षी, हाती आलेल्या माहिती नुसार; मेथवडे, तळेगांव दाभाडे, वारजे माळवाडी, सांगली, लोटेवाडी, धायरी, विठ्ठलवाडी, वाकड, पंढरपूर, बाणेर येथील  मेथवडेकरांच्या विविध घरांमध्ये हा उत्सव पार पडला. 

या उत्सवात स्थानिक सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील शेकडो रामभक्तांनी उपस्थिती लावली. 

सांप्रदायिक पद्धतीने उपासना, रामनामावली, गुलाल आणि पाळणा असे रामजन्मोत्सवाचे स्वरूप असते.  

३०० वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असणारा उत्सव, हिंदू समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचावा असा प्रयत्न आत्ताच्या पिढीचा आहे. 

अनंत महाराजांचे वंशज असणारे मेथवडेकर हे, वैद्यकीय, शिक्षक, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवसाय, उद्योजक, अभिनय, वादन, गायन आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असले तरी आपला प्रपंच सांभाळून शक्य तितके समर्थ कार्य करत असतात; याची प्रचिती रामनवमी उत्सवामुळे येते.

या सर्व मेथवडेकर मंडळींमधील आणखी एक साम्य म्हणजे, बहुतेक मेथवडेकर हा कोणत्याना कोणत्या संघटनेशी किंवा चळवळीशी संबंधित आहे. 

अर्थात " सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, परंतु तेथे अनुष्ठान पाहिजे भगवंताचे. " हा समर्थ आदेश असल्याने त्याचे आपसूकच पालन केले जाते. 

अनंत महाराज मेथवडेकर यांचे विषयी:

श्री समर्थ रामदास स्वामीनी स्थापन केलेला संप्रदाय म्हणजे, रामदासी संप्रदाय होय. या संप्रदायाची दिक्षा प्रापंचिक अनुयायांना देखील देण्यात असे. 

समर्थ एकदा पंढरपूर येथे आले असता, त्यांचा मेथवडे येथील अनंत महाराज मेथवडेकर यांचेशी संपर्क झाला.
या मेथवडेकर कुटुंबात विठ्ठलभक्ती आधी पासूनच होती, समर्थ रामदास स्वामींनी विठ्ठल आणि श्रीराम यांची  एकरूपता दाखवताना, अनंत महाराजांना विठ्ठलामध्ये श्रीरामाचे रूपदर्शन घडवले. विठ्ठल आणि श्रीरामाची एकरूपता पाहून अनंत महाराजांनी समर्थांचे शिष्यत्व पत्करले. 

पुढे मेथवडे गावी जाऊन, मांडव खडकावर बसून, श्री समर्थांनी अनंत महाराजांना दिक्षा दिली आणि मेथवडेकर मंडळी रामदासी झाली. याच भेटी प्रसंगी, श्री समर्थ नदीमध्ये पोहत असता त्यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या. समर्थानी स्वहस्ते त्या मूर्तीची मेथवडे येथे स्थापना केली.  आजही त्या मूर्ती मेथवडे येथील मठामध्ये आहेत. 

वारकरी आणि रामदासी अश्या दोनही संप्रदायाची एकरूपता असणारे हे मेथवडेकर, श्री समर्थांची पंढरपूरची वारी वंशपरंपरेने आजही चालवत आहेत. 

मेथवडेकरांच्या जश्या पिढ्या वाढत गेल्या तसा कुटुंब शाखांचा विस्तार देखील होत गेला आहे. 

मूळची मेथवडेवासी  असणारी मंडळी आज देशभरात, देशाबाहेर  विविध ठिकाणी स्थायिक झाली आहेत.
आम्ही त्यांचा शोध घेऊन समस्त मेथवडेकरांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

अनंत महाराज मेथवडेकर यांचेपासून उदयास आलेला मेथवडेकर - रामदासी वंश हा मुळातच अनंतवंशी आहे पण तरीही हा वंश आणि धर्मकार्याची ती प्रेरणा अशीच अनंत काळ राहो हीच श्रीराम चरणी ईच्छा. 

श्रीपाद श्रीकांत रामदासी (मेथवडेकर)

Comments