आपली मातृभूमी

 
ऑगस्ट महिना हा प्रत्येक भारतीयांसाठी विशेष असतो कारण याच महिन्यात आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असतोयंदाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्या सर्वांसाठी अधिकच विशेष आहे, कारण स्वातंत्र्याची पंचाहत्तरी या वर्षी पूर्ण झाली आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत इंग्रज राजवटीपासून मुक्त झाला असला तरी या देशाचे, राष्ट्राचे अस्तित्व फार फार पुरातन आहे. आपण प्रत्येकजणच या देशाला केवळ आखीव सिमा असणारा एक भूपृष्ठ भाग मानता, आपली माता मानतो.

आपल्या देशाच्या नावातच (भारत) हे राष्ट्र आपली माता असल्याचे स्पष्ट होते. आपल्याकडे एखाद्या स्त्रीला आदराने हाक मारताना, तिच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावानेच संबोधले जाते. उदा. श्याम ची आई, रमाची आई वगैरे वगैरे. स्त्रीची ओळख करून देताना, सौभाग्यवती अमुक तमुक हे संबोधन पाश्चिमात्य संस्कृतीत वापरले जाते परंतु आपल्याकडे मात्र तिच्या अपत्यांच्या नावानेच हाक मारली जाते. फार फार पूर्वी आपल्याकडे भरत नावाचा एक पुण्यशील राजा होऊन गेला हे आपण जाणतोच. त्याच्याच नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव प्राप्त झाले आहे. एका अर्थाने तो पुण्यशील राजा भरत हा आपला सर्वात ज्येष्ठ बंधूच मानला पाहिजे. त्यामुळे आपल्या देशाला भारत माता संबोधण्यात आपल्या मनात कोणताही किंतु असता काम नये. हा देश इतरांसाठी काहीही असो पण आमच्या दृष्टीने मात्र ती आमची माताच आहे हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

या भूमीबद्दल ती आपली माता असण्याच्या भावनेमुळेच, आक्रमकांशी लढा देताना हजारो तरुण हसत हसत वध स्तंभावर चढले असे मला वाटते.

कदाचित याच कारणामुळे, वंदे मातरम हा स्वतंत्र्य लढ्याचा क्रांती मंत्रच ठरला होता.

वर सांगितल्या प्रमाणे, आपल्या देशाचे अस्तित्व तर पुरातन आहेच परंतु, तिची गौरवगीते ही साक्षात देवांनीही गायिली आहेत, त्या संदर्भातला पुढील श्लोकही प्रसिद्ध आहे.

 

गायंती देवा: किल गीतकानी धन्यास्तु ये भारतभूमीभागे

स्वर्गापवर्गस्पदहेतुभूते भवंती भूय: पुरुषा: सुरत्वात ।।

अर्थ : स्वर्ग मोक्ष यांचे प्रवेशद्वार असलेल्या या भारतभूमीमध्ये जन्मलेले पुरुष देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशी गीते देव गातात.

आपल्या या मातृभूमीची सर्वच भारतीय महापुरुषांनी आणि ऋषीमुनींनी मातृभुमी, धर्मभुमी, पुण्यभुमी, देवभुमी आणि मोक्षभुमी असे म्हणून नित्य नित्य पूजा केली.

आधुनिक काळामध्ये बंकिमचंद्र यांनी लिहिलेले वंदे मातरम गीत जर पहिले तर त्यामध्येही या भूमीला

" त्वां ही दुर्गा दशप्रहरधारिणीं " असाच तिचा गौरव केलेला दिसतो,

तसेच हिंदुहृदय सम्राट स्वा. सावरकरांनी देखील आपल्या जयोस्तुते या प्रसिद्ध गीतामध्ये, " मोक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे.... " असे म्हटलेले आहे.

आजही आम्हाला या मातृभूमीतून अधिक पवित्र अशी कोणतीच बाब नाही. हिंदूंच्या जीवनशैलीत तर मातृभूमीचे पूजन हे केवळ आधुनिक राष्ट्रवादावर आधारलेले नसून, त्याला धार्मिक आधार आहे. कोणत्याही धार्मिक कार्याचा शुभारंभ हा भूमीच्या पूजनाने होतो. तर रोज सकाळी उठल्यावर धरणीमातेची क्षमा मागतो असा एक परिपाठच आहे. आपण जिला माता मानतो त्या भुमीला होणाऱ्या पद्स्पर्शासाठी ही क्षमा असते. त्या संदर्भातला खालील श्लोकदेखील प्रसिद्ध आहे.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडिले विष्णुपत्नी क्षमादेवी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ।।

हिंदू संस्कृतीमध्ये, परंपरांमध्ये मातृभूमीला निर्जीव किंवा अचेतन वस्तू कधीच मानले गेले नाही. आजही आमचा शेतकरी या भूमीला काळी आई असेच संबोधतो आणि नांगरणी सुरु करण्यापूर्वी तिचे पूजन करतो.

असे असूनही गेली काही दशके दुर्दैवाने आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण आपल्यातल्या सात्विक तसेच, समाजोन्नतीस उपयुक्त अश्या भावनाच संपवून टाकत आहोत की काय ? असे वाटत आहे. काळानुरूप आपण बदलले पाहिजे असे म्हणत म्हणत आपण आपले मुळ सोडून दूर होत आहोत की काय असे वाटत आहे.

 

असे वाटण्यामागचे कारण म्हणजे राष्ट्रात वाढत चाललेला व्यभिचार होय, आज आमची तरुण पिढी ड्रग्स सारख्या व्यसनात अडकतीये, पब, डांसबार, बलात्काराच्या घटना, स्त्रियांवरचे अत्याचार, कौटुंबिक कलह हि आपली संस्कृतीच नव्हे ! दहशतवाद हे होय.

आपल्या राष्ट्रापेक्षा आपल्या पंथातील भ्रामक संकल्पना या टोकाच्या अस्मिता बनून अधिक महत्वाच्या वाटू लागल्या आहेत. काश्मीर मधील झालेले हिंदूंचे हत्याकांड आणि अगदी गेल्या काही महिन्यांपासून होणाऱ्या हिंदूंच्या कत्तली हे राष्ट्रीयत्वापेक्षा भ्रामक कल्पनांना टोकाच्या अस्मिता बनवल्याचेच उदाहरण आहे.

इतरांचे ठाऊक नाही, परंतु प्रत्येक हिंदूने मात्र राष्ट्रभक्ती ही धार्मिक कर्त्यव्याप्रमाणे जपली पाहिजे, वाढवली पाहिजे.

अ-भारतीय विचारधारा, जीवनशैली यांचा अंगीकार करताना आपले मुळ असणाऱ्या, या राष्ट्राचा आधार असणाऱ्या सत्य सनातन जीवनशैलीला बाधा तर पोहोचणार नाही ना याचाही विचार केला पाहिजे.

अंततः एवढेच सांगू इच्छितो की; आजच्या तरुणाईने, आपली बुद्धी, शक्ती, युक्ती, भक्ती ही परकीयांच्या गुलामगिरीत खर्चण्यापेक्षा स्वदेश, स्वदेशी आणि स्वदेशबांधव यांच्या कल्याणार्थ खर्च केली पाहिजे. सर्व विश्वामध्ये हा आपला देश, आपली संस्कृती याचे असणारे भव्य दर्शन घडवले पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थापेक्षा राष्ट्रहित हेच सर्वतोपरी मानले पाहिजे. हे जर आत्ताच्या पिढीने केले नाही तर येणाऱ्या पिढयांना आपला स्वतःचाच इतिहास गूगल वर शोधावा लागेल.


 स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा !


श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments