सं-सा-र त्रिसूत्री



 बऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले;  दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले. 

कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. कुटुंबातील सर्वच सदस्यांनी सामंजस्याने घेतले तर असे तणाव दूर होण्यास नक्कीच सहकार्य होईल असे वाटले आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच.

बऱ्याचदा विवाहित तरुणाईला त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगावेसे वाटत असते, घरामध्ये स्वतंत्र स्थान / अधिकार हवे असतात, प्रायव्हसी हवी असते अर्थात यात गैर काहीच नाही. केवळ पती-पत्नी राहत असणाऱ्या स्वतंत्र कुटुंबामध्ये हे शक्य असतं.

पण जिथे पती-पत्नी आणि सासू-सासरे एकत्र असतात तिथे मात्र यातील बऱ्याच गोष्टींवर मर्यादा येऊ लागतात; यातूनच वादाच्या ठिणग्या पडू लागतात.

घरात काही वस्तू विकत घ्यायची म्हटली तर सगळ्यांचीच मते मतांतरे घ्यावी लागतात. स्वयंपाक, सण-उत्सव आदी करण्याच्या पद्धतीमध्ये असणारे सूक्ष्म फरक लक्षात येऊ लागतात मग माहेरची पद्धत चांगली कि सासरची पद्धत चांगली अशी द्विधा मनस्थिती होते. यावरूनच सासू आणि सून या दोन व्यक्तिमत्वांमध्ये नकळत स्पर्धा, ईर्षा उत्त्पन्न होताना दिसते.

घरात कोणती पद्धत चालवायची हेच वादाचे मूळ आहे असेच मला वाटते. यावरूनच आमच्यात-तुमच्यात असे वाद निर्माण होतात.

सासू नामक व्यक्तिमत्वाने गेली अनेक वर्षे जे कुटुंब सांभाळलेले, जोडून ठेवलेले असते तेच पुढे सुनेला न्यायचे असते हा एक सर्वसाधारण नियम आहे.

स्थल-काल अनुसार सुनेला नवीन पद्धतींचा अवलंब करावा वाटत असतो. सासूला वाटत असते की ज्या पद्धती एवढ्या वर्षे चालत आल्या त्याच योग्य आहेत. अर्थात या दोन्हीही भावना नैसर्गिकच आहेत.

याद्वारे निर्माण होणारे संघर्ष टाळण्यासाठी काही बाबी समजून घेतल्या पाहिजेत.

सासू असो वा सून या दोघीही एकाच कुटुंबाच्या सदस्य असतात,  त्यामुळे हे असे वाद दोन व्यक्तिमत्वांमधले किंवा भूमिकांमधले असावेत, व्यक्तींमधले नाहीत.

बदल हा कोणत्याही बाबतीत एकदम होत नसतो. कुटुंबामध्ये घडवून आणावयाचा बदल हा सदस्यांना पुरेसा वेळ देऊन, त्यांच्या भावनांना समजून घेऊन, चर्चा करून घडवावा लागतो. जबरदस्तीने किंवा एककल्ली निर्णयाने घडवून आणलेला बदल क्लेशदायीच असतो.

कोणत्याही रूढी या कालसुसंगत केल्यास त्या पाळायला सोप्या जातात आणि नव्या पिढीला स्विकार्ह देखील असतात. कुटुंबातील दोनही पिढ्यानी जर या बाबी समजून घेतल्या तर, आमचे-तुमचे वरून आपले पर्यंत पोहोचणे फारसे अवघड नाही.

काहीजणांच्या मते एकमेकांना समजून घेण्यापेक्षा, विभक्त कुटुंब व्यवस्था काय वाईट आहे ? अर्थात यात देखील काही गैर नाही.

शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील विभक्त कुटुंब पद्धतीला मान्यता नक्कीच आहे, पण याची आर्थिक आणि भावनिक  बाजू देखील समजून घेणे गरजेचे आहे.

सध्या तीस ते चाळीस वयोगटातील मंडळी ही; आर्थिक वर्गांचे स्थिन्त्यन्तर पाहिलेली; कदाचित घडवून आणलेली पिढी आहे. मोठ्या शहरांतून असणारी ही पिढी बहुतांशी आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ किंवा मध्यम वर्गातून आलेली आहे. रोजगाराच्या संधी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी युवा अवस्थेतच, आपली गावे-घरे सोडून आलेली ही मंडळी, आर्थिक संघर्षातून उच्च मध्यम वर्गीय किंवा त्याहून पुढच्या वर्गामध्ये पोहोचली आहे.

कोणत्याही संघर्षांतून पुढे येताना आपले कुटुंब हेच सर्वात जास्त स्फूर्ती आणि शक्ती देणारे असते.

आपला आर्थिक वर्ग बदलत असताना कुटुंबातील सदस्यांप्रती असणारे प्रेम, आदर वृद्धिंगत होत जाणे नैसर्गिक आहे. त्यामुळे अश्या मंडळींना विभक्त कुटुंब पद्धती पचनी पडणे अवघड जाते. ही झाली भावनिक बाजू.

ज्या कुटुंबातील पतीचे आई-वडील आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र (पेन्शन किंवा अन्य मार्गामुळे) असतात तिथे, विभक्त होणे आर्थिक दृष्टिकोनातून फारसे अवघड नसते. पण जिथे आपल्या आई-वडिलांची आर्थिक जबाबदारी सुद्धा घ्यायची असते तिथे विभक्त होण्यापेक्षा तक्रारी ऐकत, एकत्रच राहणे जास्त सोयीस्कर ठरते.

आणि मग अश्याच कुटुंबातील विवाहित तरुणाई ही पती-पत्नीतील वाद-विवादाने त्रस्त होते. मानसिक तणावाखाली जाते.

खरे तर एकदा का आपल्या मुलांचे विवाह झाले की; हळू हळू मागील पिढीने आपल्या सर्व कौटुंबिक जाबदाऱ्या पुढच्या पिढीला सोपवणे आवश्यक असते.

आता प्रपंच मुलांचा आहे अशी भावना मनात ठेवली तर; एकत्र राहूनही वाद टाळले जाऊ शकतात.

यांवर ज्येष्ठ नागरिक म्हणतील की; म्हणजे तुमची लग्न झाली की आमची किंमत संपली का ? .... नाही असे मुळीच नाही.

माणूस नोकरी व्यवसायातून रिटायर होतो तेंव्हा त्याची कार्य क्षमता संपली म्हणून नव्हे तर, कार्यसिद्धी झाली म्हणून तो निवृत्त होतो. त्याच प्रमाणे पालकांना जबाबदारीतून मुक्त करणे ही त्यांची कार्यसिद्धी असते; ही भावना जपणे आवश्यक आहे.

 

विभक्त कुटुंबामध्ये जर पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायात असतील तर पुढे जाऊन भेडसावणारा प्रश्न म्हणजे मुलांचे पालन पोषण. बालसंगोपन केंद्र किंवा पाळणाघर हा पर्याय त्यालाही उपलब्ध आहे.

स्वतःच्या घरावरील, प्रपंचावरील हक्कावर गदा येऊ नये म्हणून विभक्त होणारे, आपल्या मुलांचा आजी-आजोबांचे प्रेम मिळवण्याचा हक्क कसा काय डावलू शकतात ?  बऱ्याच वेळा केवळ नाईलाज म्हणून मुलांना पाळणाघरात ठेवणे क्रमप्राप्त असते हे मान्य आहे. पण हे खरंच आवश्यक आहे का ?

केवळ स्वतः ला विभक्त व्हायचे म्हणून नातवंडांना त्यांच्या आजी आजोबांचे प्रेम मिळू द्यायचे नाही; हा त्या मुलांवर अन्याय नाही का ?

अश्यावेळी घरातील पुरुषांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. बऱ्याच वेळेस पुरुष मंडळी गोंधळून गेलेली दिसतात. साहजिक आहे म्हणा;

आपल्याला जन्मच नव्हे तर नावासकट सगळे काही दिले ते आईवडील एका बाजूला;

आपल्या नावासकट सगळ्याचा त्याग करून आजन्म साथ देण्याकरता आलेली पत्नी दुसऱ्या बाजूला

असा संघर्ष जेंव्हा उभा राहतो तेंव्हा त्या पुरुषाची अवस्था कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनापेक्षा वेगळी नसते.

आई वडिलांच्याप्रती असणारे कर्तव्य आणि पत्नीच्या अपेक्षा या दोन्हीचे दडपण, दुखवायचे कोणाला ? हा मोठा प्रश्न त्याच्या समोर असतो. यातूनच मानसिक तणाव निर्माण होतो.

खरे तर इथेच पुरुषाचा खरा कस लागत असतो; कुटुंब जरी त्याचे असते त्यामुळे तो साऱ्या कुटुंबाचा असतो. जसा हक्क पत्नीचा तसाच हक्क पालकांचा आणि तेवढाच हक्क मुलांचा देखील त्याच्यावर असतो. त्यामुळे प्रसंगानुरूप त्याला कठोर आणि मृदू होणे आवश्यक असते.

केवळ भावनिक ना राहता आपल्या संपूर्ण कुटुंबाचे, सामाजिक, आर्थिक आणि भावनिक हित नेमके काय याचे चिंतन करून निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या अंगी असणे गरजेचे आहे.

आपले आईवडिलांप्रती असणारे कर्तव्य; पत्नीला समाजवुन सांगणे आणि आपल्या पत्नीची होणारी भावनिक कुचंबणा आईवडिलांच्या निर्दशनास आणून देणे या दोनही बाजू व्यवस्थित सांभाळणे हीच खरी पुरुषाची भूमिका असते.

पुरुषांच्या बाबतीत आणखी एक महत्वाचे म्हणजे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी जशी आपण घेतो तशीच पत्निच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेणे आवश्यकच आहे. प्रसंगी वैयक्तिक स्वतः ला काही करणे शक्य नसेल तर पत्नीला तिच्या माहेरच्या जबाबदाऱ्या पार पडण्यास वाव देणे, सहकार्य करणे हे देखील तितकेच महत्वाचे असते.

खरे तर, अगदी मागील पिढीपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती ही आदर्शवत होती. आत्ताच्या कमावत्या पिढीने एकत्र कुटुंबे पहिली आहेत अनुभवली आहेत.

पण गेल्या २-३ दशकात वाहिन्यांवरील मालिकामधून दाखवले जाणारे कौटुंबिक संघर्ष हे समाजाला नाकारात्मकतेकडे, अनैतिकतेकडे घेऊन जात आहेत.

नात्यांचे पावित्र्य, त्यातील मर्यादा यांना तिलांजली दिलेली वारंवार दाखवली जात आहे.

अश्याच एका मालिकेतल्या दोन पात्रांचे नाते समजून घेताना माझी दमछाक झाली होती, एक पात्र हे दुसऱ्या पात्राच्या दुसऱ्या बायकोच्या, पहिल्या नवऱ्याच्या, पहिल्या मुलाच्या, पहिल्या बायकोचा, दुसरा नवरा असतो. यातून काय बोध घ्यावा हेच कळत नाही.

स्वतः च्याच घरात चोरी करणे, आपल्याच कुटुंबात चुगली करणे, विवाह बाह्यसंबंध ठेवणे, घटस्फोट की लगेच दुसरे लग्न की लगेच पुन्हा घटस्फोट.

यातून नेमकी कसली पिढी घडतीये याचे भानच राहिलेले दिसत नाही. दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन असले तरीही त्याद्वारे समाजामध्ये परिवर्तन घडू शकते हे विसरता येणार नाही.

तथापि स्त्री-पुरुषांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की; मालिकांमधील पती-पत्नींना, सासू-सुनांना, भाऊ-बहिणींना भांडणे, कारस्थाने करण्याचे पैसे मिळतात परंतु खऱ्या आयुष्यात मात्र स्वतः चे नुकसान झाल्याशिवाय राहात नाही.

खरे तर नाती म्हणजे भेळ त्यात आंबट गोड तुरट खारट अशा अनेक चविचे असते. आपल्याला हवी ती चव मिळाली नाही एखादा पदार्थ कमी जास्त करून  हवी तशी चव मिळवतोच पण सहसा टाकून देत नाही. त्यातच खरी मज्जा आहे.   

जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते की

संवाद - सामंजस्य- रक्षण या त्रिसूत्रीवर होतात तेच खरे संसार... बाकी सारे संहार ....


Comments

Suhas Ingle said…
छान लिखाण आणि विषय...
Anjalee bodas said…
विषय चांगला आहे, लेखकाची आत्मीयता आणि कळकळ त्यातून जाणवतेय, पण एकाचवेळी बऱ्याच मुद्यांना हात घातल्यामुळे, लेखात विस्कळीतपणा आलाय. कारण प्रत्येक मुद्दा हा कळीचाच असून,त्याला बरेच कंगोरेही आहेत.लेखकाच्या
पण प्रामाणिक भावनांना सलाम🙏👍
hvshrotriya said…
बरेच काही शिकण्यासारखे!!!
Bhaskar said…
लेख छान आहे.
कौटुंबिक प्रश्नांना समोर आणले आहे पुन्हा सर्वांनी याकडे काळजीपूर्वक विचारांनी बघणे आवश्यक झाले आहे.
मंदार जोशी.
Unknown said…
श्रीपाद जी
अगदी योग्य. आज काल घरातला संवाद तुटत जात आहे आणि तडजोड दूर होताना दिसत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट.
Unknown said…
लेख छान आहे