तो नक्की आहे का ?
टिप : सदर कथा ही संपूर्णपणे काल्पनिक असून, याचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
पहाटेचा बोचरा वारा अंगाला नुसता झोंबत होता. नुकताच पूर ओसरल्यामुळे गावगाडा हळूहळू जागेवर येत होता.
पहाटे ४:३० च्या सुमारास, डॉक्टर साहेबांना हाका मारत नीलकंठ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धावत आला.
केंद्रातील डॉक्टर राकेश यांना नुकताच डोळा लागत होता, नीलकंठचा आवाज ऐकून डॉक्टर बाहेर आले.
नीलकंठ धापा टाकतच म्हणाला " सरपंचांना छातीत दुखतंय, लै त्रास होतोय जरा येताव का ? "
डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि सरपंचांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे.
अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की;
" मोठ्या गाडीची सोया करा ... तालुक्याला न्यावे लागेल. "
खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला रंगराव देशमुखांची गाडी तेव्हढी वाचली होती.... पण रंगराव आणि सरपंच यांचे हाडवैर सगळ्या गावाला ठाऊक होती पण तरीही नीलकंठ धावला, रंगरावाने देखील मागच्या गोष्टी सोडून देऊन लगेचच आपल्या गड्याला गाडी घेऊन पाठवले....
डॉ. राकेश गाडीत बसल्यानंतर विचार करत होते की; रंगराव आणि सरपंच दोघेही गावासाठी गेले कित्येक दिवस राबत होते... दोघांच्यात वैर असून देखील खांद्याला खांदा लावून, पुरातून गाव वाचवत होते... हेच खरे राजकारण आणि समाजकारण, नाहीतर काही काही लोकं आपल्या गावाचे हित कश्यात आहे ? याचा विचार न करता केवळ आपल्या स्वार्थासाठी भांडत बसतात.... एवढ्यात अचानक गाडी थांबली आणि डॉक्टरांची विचार शृंखला थांबली...
" काय झाले महादू ? " डॉक्टरांनी विचारले ...
" काय कळेना बगा पण गाडी एकदम बंदच पडली.... चालू बी होईना ... "
डॉक्टर राकेशची काळजी वाढली, सरपंचांना वेळीच उपचार नाही मिळाले तर त्यांच्या जीवावर बेतू शकत होते....
" थांबा, हितच बजरंग ग्यारेज हाये, त्याला बोलिवतो... " महादू म्हणाला ....
धावतच तो बजरंग ग्यारेजकडे धावला ..... पुरात खराब झालेल्या गाड्या रात्रभर दुरुस्त करून हणमंता म्हणजेच त्या बजरंग ग्यारेज चा मालक दमून भागून पहुडला होता. महादुने त्याला उठवले आणि म्हणाला " गाडी बंद पडलीये "
हणमंता त्या महादुला बघून जरा चिडूनच म्हणाला " काय रं म्हाद्या आर काय येळ काळ हाय का नाही ? .... सकाळी ये गाडीचे काम करू ... अंग लै दुखतंय माज "
महादू म्हणाला;
" आर गाडीत सरपंच हायेत त्यांना तालुक्याला नेतुया दवाखान्यात... डॉक्टर सायेब बी हायेत गाडीत .... जरा बग की "
खुद्द डॉक्टर सरपंचाला रंगरावांच्या गाडीतून नेतायत म्हणजे मामला गंभीर आहे त्याने ओळखले, आपली हत्यारांची पिशवी घेऊन तो निघाला...
थोड्यावेळ झटापट करून हणमंत म्हणाला " म्हाद्या मार स्टार्टर .... " आणि गाडी सुरु झाली...
डॉक्टरांनी खिशाकडे हात नेला तसा हणमंत म्हणाला " सायेब आधी तालुका गाठा पैश्याचं बघू नंतर " जाऊ द्या गाडी ....
डॉ. राकेशने अभिवादन करण्यासाठी त्याचे हात हातात घेतले तेंव्हा त्यांना कळले हणमंता स्वतः तापाने फणफणतोय... गाडीतून आपल्या बॅग मधून त्यांनी गोळ्या काढल्या आणि म्हणाले " तीन डोस घे बरे वाटेल ".
मग लगबग करून सरपंचांना घेऊन गाडी पुढे निघाली....
काही दिवसांनी सगळे ठीकठाक झाल्यावर सरपंचानी डॉक्टर, रंगराव, महादू आणि हणमंत यांना वाड्यावर बोलावलं.... हणमंत जरा उशिराने आला त्याच्या हातात कसला तरी पुडा होता....
डॉक्टर म्हणाले " काय हणमंता बारायस ना ? "
" व्हय जी ! हे घ्या येशीच्या मारुतीचा परसाद ... शनवार हाय ना आज " हणमंता म्हणाला.
डॉक्टर म्हणाले " अरे मी देव, प्रसाद वगैरे काही मानत नाही माहितीये ना ! संकटात धावून येणारा तुझ्या सारखा माणूस हाच माझ्यासाठी देव "
" त्ये तुमच्या सारख्या शिकलेल्या लोकांसारखं आपल्याला काय कळत नाही बगा, पण एवढं मात्र ठावं हाय की त्या दिवशी तुमची गाडी झटक्यात सुरु करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती मला आमच्या मारुतीरायांनीच म्हणजेच देवाने दिली,
भांडण इसरून आपली गाडी द्यायची रंगरावासनी बुद्धी त्या मारुतीनंच, म्हणजेच देवाने दिली,
माझ्या ग्यारेज जवळ गाडी बंद पडणं आणि माझं तिथं असणे ही योजना त्या मारुतीरायचीच, म्हणजेच देवाचीच.....
म्हणून म्हणतो माणसात देव नक्की बघा; पण त्या माणसाला देव बनायची बुद्धी देणाऱ्या भगवंताला इसरू नका .... काय चुकलं असलं तर जोड्यानी हाना ... "
हणमंताचे हे बोलणे ऐकून डॉक्टर निशब्द झाले आणि काही क्षण थांबून म्हणाले....
" दे तो प्रसाद.... आज तू मला नवी जाग आणलीस .... "
सत्कर्माची बुद्धी देणारा " तो म्हणजेच देव " नक्कीच आहे; फक्त त्याची अनुभूती घेता आली पाहिजे .....
Comments