सावध रहा राजा... आठवडा वैऱ्याचा आहे.



हिंदुस्थानसह  देशामध्ये कोरोना विषाणूने घातलेला धुमाकूळ सर्वश्रुतच आहे.

हिंदुस्थानमध्ये अनेक बाधित रुग्ण नोंदवले गेले आहेत. संशयितांचा आकडा याहून अधिक असायची शक्यता आहे गेल्या पंधरवाड्यामध्ये  हे प्रमाण वाढले आहे. कालचा जनता कर्फ्यू जरी यशस्वी झाला असला तरी जनता कर्फ्यू औषध नाही.

आज सकाळपासून बरेच नागरिक हे सोसायटी, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे येथे सर्रास वावरताना दिसत आहेत. अत्यावश्यक बाबींकरिता फिरणे मान्य आहे, परंतु अश्यावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क किंवा रुमाल वापरणे हे अनिवार्य आहे हे विसरून चालणार नाही.

आज इटली, चीन या देशातील नागरिकांनी वेळीच आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेतली असती तर आज त्या देशांमध्ये मृत्यूने एवढे थैमान घातले नसते.

सध्या चीन आणि इटलीच्या शासनाच्या नावाने खडेफोड करणारे सोशल मिडिया वीर स्वतः जबाबदारी पार पाडतायत का हे त्यांनी आत्मपरीक्षण करून पहावे.

हिंदुस्थान आणि महाराष्ट्र शासन त्यांचे कार्य करतेच आहे, आता काही जण त्यावरही टीका टिंगल करताना दिसत आहेत, काही जण क्रेडिट वॉर खेळताना दिसत आहेत, पण बंधुनो जर प्रशासन कमी पडत आहे असे वाटत असेल तर आपण नागरिक म्हणून पुरेसे जागरूक आहोत का ? याचा विचार देखील केला पाहिजे असे मला वाटते.

कोरोनाचा संबंध धर्माशी जोडणाऱ्या महाभागांबद्दल न बोलणेच योग्य राहील, अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे ही खबरदारी म्हणून बंद केली आहेत हे पाहून खरंच आनंद वाटला, परंतु उगाचच धर्मस्वातंत्र्याचा बाऊ करत सामूहिक प्रार्थनेसाठी एकत्र जमणारी मंडळी पाहून मात्र खेद वाटला हे सांगितल्या वाचून राहवत नाही.

एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी धडपडणारे प्रशासन आणि दुसरीकडे बेजबाबदारपणे वागणारे नागरिक पाहून, ही लढाई कोरोना विरुद्ध नसून बेजाबदार नागरिकांविरुद्धच जास्त आहे असेच वाटते.

बेजबाबदार नागरिकांनो तुमच्याकडे कदाचित अमरत्वाचे देणे असेल परंतु सर्वसामान्य जनतेकडॆ ते नाही; तेंव्हा तुमचे थोरपण तुमच्यापाशी ठेवा आणि आम्हाला निरोगी राहू द्या.

लक्षात ठेवा काळ तर सर्वत्र फ़िरतोच आहे परंतु स्वतःच्या मूर्खपणाने वेळ ओढावून घेऊ नका.

येणारा सप्ताह हा अधिक खबरदारीचा असणार आहे, त्यामुळे सावध रहा... आठवडा वैऱ्याचा आहे.

Comments