गांधी - सावरकर - गांधी
गांधी - सावरकर - गांधी
© श्रीपाद श्रीकांत रामदासी
नागपूर येथील एका
कार्यक्रमात बोलताना, बापूजींचे पणतू ‘तुषार गांधी’ यांनी "
बापूजींच्या हत्येमागे सावरकर हेच होते " असे विधान केल्याचे ३१ डिसेम्बर
२०१८ रोजी, महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांतून आम्ही वाचले [ या वृत्ताची प्रत, संदर्भासाठी राखून ठेवलेली आहे ]
गांधीजींची झालेली हत्या, ही दुःखदायकच होती यात दुमत नाही, परंतु त्या हत्येमध्ये
वीर सावरकरांचे नाव विनाकारण गोवणे हे तेंव्हाही आणि आत्ताही, दुर्दैवीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
खरे तर गांधी हत्येमध्ये
सावरकरांचा सहभाग असण्याचे कोणतेच कारण नाही, किंवा सावरकरांना
गांधीहत्या व्हावी असे वाटण्याचे कारणच काय?
सावरकर आपल्या भाषणांतून, लेखनातून गांधीजींवर टीका करत होते, हे तर जगजाहीरच आहे.
सावरकर आणि गांधीजी यांच्यातील वैचारिक विरोध हे काही लपून राहिले नव्हते, त्याचप्रमाणे गांधीजींवर टीका करणारे सावरकर हे काही एकटेच नव्हते. समकालीन
नेते नव्हते, सावरकरांना जसे गांधींजींचे अति अहिंसेचे, मुस्लिम लांगूलचालनाचे वर्तन मान्य नव्हते, त्याच प्रमाणे डॉ.
आंबेडकरांना गांधीजींचे पूर्वास्पृश्यांविषयीचे धोरण देखील मान्य नव्हते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर उघड उघड
काँग्रेसशी काडीमोड घेऊन देशाटन केले होते. मग केवळ सावरकरांवरच त्यांच्या हत्येचा
ठपका का ?
नथुराम गोडसे यांचा
सावरकरांशी थोडाफार असणारा संबंध जर त्यांच्यावर ठपका ठेवण्यासाठी उद्युक्त करत
असेल तर, गोडसे-सावरकर यांच्यामध्ये " हिंदुत्व " ही बाब
सोडल्यास ऐक्य असे कुठेच दिसत नाही,
नथुराम गोडसे हे काही
सावरकरांचे अगदीच निष्ठावंत, अंधळे किंवा
समर्पित अनुयायी होते असे नाही. काही पत्रांमधून
गोडसेंनी सावरकरांना फुकटचे सल्ले देखील दिलेले आहेत, ज्याबद्दल सावरकरांनी साधे उत्तरदेखील दिले
नाही. गोडसेंनी स्थापन केलेल्या
हिंदुराष्ट्र दलाचा आणि सावरकरांचा काडीचाही संबंध नव्हता याचे पुरावे उपलब्ध
आहेत.
नथुराम गोडसेंच्या
"अग्रणी" या दैनिकांस सावरकरांनी दिलेली रक्कम हि उसनवारी स्वरूपाची
होती, परंतु जेंव्हा गोडसे-आपटे यांना अग्रणीसाठी आणखी आर्थिक मदत
लागली तेंव्हा सावरकरांनी दिली नाही. गोडसेंनी अनेक वेळा विनंती करूनही सावरकरांनी
गोडसेंच्या पत्रात कधीही लेखन केले नाही.
यावरून हेच स्पष्ट होते
की सावरकर हे गोडसेंना जेवढ्यास तेवढे ठेवणाऱ्यातले होते. त्यांचे गोडसेंवर किंवा
त्यांच्या पत्रकावर विशेष प्रेम वगैरे नव्हते. दुसरे असे की; अग्रणी प्रमाणेच
सावरकरांनी, हिंदुत्ववादी विचारधारा असणाऱ्या अन्य
दैनिकांना, पत्रकांना अश्याच पद्धतीने उसने पैसे देऊन
सहकार्य केले होते.
वर म्हटल्याप्रमाणे गोडसे, सावरकरांचे अगदीच निष्ठावंत अनुयायी नव्हते. गोडसेंची स्वतंत्र
विचारधारा होती, १५ ऑगस्ट १९४७ रोजी अखिल भारतीय हिंदुमहासभेने, स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करताना राष्ट्रध्वज आपापल्या घरांवर उभारण्याचे
आवाहन केले होते, परंतु महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभेने फाळणीचा
निषेध करण्यासाठी स्वातंत्र्योत्सवावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, तेंव्हा सावरकरांनी महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभेचे आवाहन मान्य न करता, फाळणी मान्य नसतानाही आपल्या सदनावर राष्ट्रध्वज उभारला होता. सावरकरांच्या या कृतीचा राग येऊन नथुराम
गोडसेंनी त्यांचे संयमी नेतृत्व झुगारून लावले होते. या आणि अश्या अन्य काही उदाहरणांवरून गोडसे - सावरकर मतभेद स्पष्ट होत
असतानाही उगाचच गोडसेंच्या कृत्यासाठी सावरकरांचीच प्रेरणा होती असे म्हणणे
तर्कहीन आहे.
सावरकरांना न्यायालयाने
निर्दोष मुक्त केले आहे. तुषार गांधी म्हणतात त्याप्रमाणे ती मुक्तता केवळ पुराव्या
अभावी होती, परंतु जी घटना घडलीच नाही तिचे पुरावे तरी कसे मिळणार ? आणि जर पुरावे असतील पण समोर आले नसतील तर तो दोष कुणाचा? जेरबंद असणाऱ्या सावरकरांचा?.......
हा दोष असेलच तर साहजिकच तपास यंत्रणेचा आणि तात्कालीन सरकारचा
आहे. तात्कालीन गृहमंत्री, पंतप्रधान हे सगळे काँग्रेसचेच होते आणि तरीही तपासात कचुराई झाली असे तुषार गांधी यांना म्हणायचे असेल तर; असे म्हणून तुषार गांधी, बापूजींच्याच सहकाऱ्यांवर अविश्वास दाखवून
त्यांची नालस्ती करीत आहेत असेच मला वाटते.
खरे तर सावरकरांना या
प्रकरणात गोवण्याचे निमित्त म्हणजे बडगेची साक्ष होय. वाचकांनी एक बाब लक्षात
घेतली पाहिजे की बडगे हा माफीचा साक्षीदार होता. माफीचा साक्षीदार म्हणजे आपल्याच
सहकाऱ्यांवर उलटलेला गुन्हेगार असतो. बडगेने ही साक्ष, अमिषापोटी किंवा भयापोटीही दिलेली असू शकते. परंतु तशीही बडगेची साक्ष तथ्यहीन होती आणि म्हणूनच
सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली.
जेंव्हा एखाद्या आरोपीला
सक्षम न्यायालय निर्दोष मानून मुक्त करते तेंव्हा, तो मुक्त झालेला
पूर्वाश्रमीचा आरोपी हा गुन्हेगारच होता असे म्हणणे योग्य आहे का ?
सावरकरांवर टीका करणारे
आणखी एक आधार देतात तो म्हणजे " कपूर आयोग ", खरे तर वाचकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; कोणताही आयोग म्हणजे सक्षम न्यायालय नव्हे.
आयोगाचे अधिकार केवळ चौकशी करून निष्कर्ष मांडणे एवढेच असतात.
वास्तवात या कपूर आयोगाची
नेमणूक सावरकरांचा गांधी हत्येमध्ये सहभाग होता का ? याची चौकशी करून निष्कर्ष
मांडण्यासाठी झालीच नव्हती. हा अयोग्य मुख्यतः सरकारी अधिकारी, तात्कालीन मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकारी यांना गांधी हत्येच्या कटाची माहिती
होती की नाही याची चौकशी करण्यासाठी नेमलेला होता. विशेष म्हणजे या आयोगाच्या
अंतिम निष्कर्षांमध्येदेखील सावरकरांचा नामोल्लेख नाही. तथापि आयोगाने
साक्षीदारांच्या नोंदवलेल्या साक्षीमध्ये सावरकरांचे नाव आहे. या आयोगाने बडगेची
साक्ष नोंदवलेली नाही ही बाब विशेष उल्लेखनीय आहे, ज्या तथ्यहीन साक्षीच्या
जोरावर सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले ती साक्ष तपासावी किंवा
नोंदवावी याची आवशक्यता आयोगास वाटू नये याचे कारण काय असावे ?
असा प्रश्न
जनमानसाप्रमाणेच मला देखील पडला आहे.
खरे इतर
साक्षीदारांच्या ऐकीव माहितीवर आधारित साक्षींमधील कोणाच्याही
नावाचे उल्लेख म्हणजे अंतिम निष्कर्ष नव्हे हे कोणत्याही सर्वसामान्य बुद्धीच्या
मनुष्यास सहज समजेल, परंतु विरोधकांनी मात्र याचेच कोलीत बनवून
सावरकरांविषयी बदनामीचा हलकल्लोळ माजवलेला दिसतो. असो ज्याची त्याची बुद्धिमत्ता
आणि नीतिमत्ता असते....
वाचकांना एक बाब आम्ही
सांगू इच्छितो की; सावरकरांनी आपले
राजकीय, वैचारिक मतभेद हे वैयक्तिक पातळीवर येऊ दिले नाहीत, याची उदाहरणेच द्यायची झाली तर,
कस्तुरबा गांधींचे निधन
झाले तेंव्हा सावरकरांनी शोक व्यक्त केला होता. जेंव्हा एका मुसलमानाने जीनांवर
हल्ला केला; तेंव्हा सावरकरांनी
त्याचा निषेध केला होता. सरदार वल्लभभाई पटेलांचा विमान अपघात झाला तेंव्हा
सावरकरांनी त्यांची आस्थेने चौकशी केली होती. सावरकरांनी प्रत्येकवेळी राजकीय विरोध, हे राजकीय आणि वैचारिकच पातळीवरच ठेवले होते.
सावरकर-गांधी हे
परस्परांचे राजकीय किंवा वैचारिक विरोधक होते. द्वेष आणि विरोध यांतील फरक समजून घेणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीमध्ये एकंदरीतच काय तर सावरकरांची बदनामी करून
स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे षडयंत्रच रचण्याचा प्रयत्न सावरकर विरोधकांनी
चालवलेला दिसतो आहे, तथापी तुषार गांधींसारख्या एका महान
व्यक्तित्वाच्या वंशजाने या षडयंत्रात अडकू नये. अन्यथा गांधी-सावरकर-गांधी हा
सिलसिला चालूच राहील.
बाकी गांधी सुज्ञ
आहेतच.....
© श्रीपाद श्रीकांत रामदासी
Comments