वासुदेव गीत


© श्रीपाद श्रीकांत रामदासी

वासुदेव आला हो वासुदेव आला
रामच्या पारी हरिनाम बोला ....
वासुदेव आला हो वासुदेव आला ।। धृ ।।

आटपाट नगरात एक धनिक झाला
काहीच कमी नव्हतं हो त्याला
पैसा अन अडका भरून वाहिला
तरीबी देई ना पसडा कोणाला ।। १।।
रामच्या पारी हरिनाम बोला ....
वासुदेव आला हो वासुदेव आला......

एके दिवशी बायको लाडे म्हणे त्याला
गाडी घेऊन आपण, जाऊ फिरायला
म्हणे धनिक तिला, राणी चिंता कशाला
डायवर हाये बग आपल्या सेवेला ।। २ ।।
रामच्या पारी हरिनाम बोला ....
वासुदेव आला हो वासुदेव आला......

लगोलग सांगावा धाडला डायव्हरला
म्हणती धावून येई सेवेला
जायचे फिराया माझ्या राणीला
कसा मी पाडू तिच्या शब्दाला ।। ३।।
    रामच्या पारी हरिनाम बोला ....
    वासुदेव आला हो वासुदेव आला......

निघाली जोडी दूरवर फिरायला
नाही काही कमी त्यांच्या मौजेला
पण काळानं त्यांच्यावर घातला घाला
अवचित अपघात झाला गाडीला ।। ४ ।।
    रामच्या पारी हरिनाम बोला ....
    वासुदेव आला हो वासुदेव आला......

काही ना झाले डायवर अन धनिकाला
परी आघात झाला, राणीच्या डोक्याला
घाबरी धनिक, कोसे नशिबाला
लगेच धावी हॉस्पिटलाला ।। ५ ।।
     रामच्या पारी हरिनाम बोला ....
     वासुदेव आला हो वासुदेव आला......

डॉक्टर म्हणे पाहून राणीला
ऑपरेशन लागेल हेच करायला
म्हणे धनिक, चिंता नको कमी ना पैशाला
तुमि लगेच लागा हो तयारीला ।। ६ ।।
      रामच्या पारी हरिनाम बोला ....
     वासुदेव आला हो वासुदेव आला......

म्हणे डॉक्टर पाहून धनिकाला
पैश्यापेक्षा, रक्त लागेल ऑपरेशनला
म्हणे धनिक मागवा रक्त, देऊ लाखो त्याला
पण आधी वाचावा हो माझ्या राणीला ।। ७ ।।
      रामच्या पारी हरिनाम बोला ....
      वासुदेव आला हो वासुदेव आला......

डॉक्टर म्हणे काय बोलावे याला
पैशाविना ना काही सुचे याला
म्हणे डॉक्टर दुष्काळ असे रक्ताला
रक्तदाते हवेत भरून काढायला ।। ८ ।।
      रामच्या पारी हरिनाम बोला ....
      वासुदेव आला हो वासुदेव आला......

म्हणे धनिक विचारतो मित्राला
सांगे बोलावतो साऱ्या गावाला
बोले धनिक नात्यात या रक्ताला
म्हणे सारे, आता बोलावं तुझ्या पैश्याला ।। ९ ।।
    रामच्या पारी हरिनाम बोला ....
    वासुदेव आला हो वासुदेव आला......

पैसा हाये मान हाये त्या धनिकाला
तरीबी धनिक, भिकारी ठरला
पस्तावून धनिक रडू लागला
काय करावे असल्या पैशाला ।। १० ।।
     रामच्या पारी हरिनाम बोला ....
     वासुदेव आला हो वासुदेव आला......
होता एक तिथे गरीब झाडूवाला
म्हणे साहेब रक्त मी देईन माउलीला
धनिक पाहून त्याला, खजील झाला
म्हणे हा तर देवच धावून आला ।। ११ ।।
      रामच्या पारी हरिनाम बोला ....
      वासुदेव आला हो वासुदेव आला......

रामच्या पारी गातो कथेला
रक्तदान महती सांगतो जनाला
सत्ता ना मत्ता येती कामाला
रक्तंच कामी येई रक्ताला ।। १२ ।।
      रामच्या पारी हरिनाम बोला ....
      वासुदेव आला हो वासुदेव आला......

होई जागा माणसा, लाग रं कर्माला
आधी जाऊन दान, कर रक्ताला
सांगतो श्रीपाद, घेऊन वासुदेवाच्या रुपाला
तुमच्या रक्ताचं मोल ना, कळलं तुम्हाला ।। १३ ।।
     रामच्या पारी हरिनाम बोला ....
     वासुदेव आला हो वासुदेव आला......     वासुदेव आला हो वासुदेव आला......

© श्रीपाद श्रीकांत रामदासी
    धायरी पुणे-४१

Comments