हिंदूसेनानी अशोकजी सिंघल

अशोक सिंघल
बाळासाहेब ठाकरे


हिंदूसेनानी अशोकजी सिंघल

संकलन शब्दांकन : श्रीपाद श्रीकांत रामदासी
_________________________________________________________________

जेंव्हा कधी हिंदूंचा आधुनिक काळातील इतिहास लिहिला जाईल तेंव्हा त्याच्यामध्ये दोन व्यक्तिमत्त्वांना विशेष स्थान असेल त्या दोन व्यक्ती म्हणजे, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय हिन्दुसेनानी अशोकजी सिंघल.

आज १७ नोव्हेंबर या दोनही हिंदूवीरांचा स्मरण दिन. सर्वप्रथम या उभयतांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बाळासाहेब ठाकरे माहीत नाहीत असा माणूस निदान महाराष्ट्रात सापडणे कठीण आहे
आणि जर सापडलाच तर त्याच्यासारखा करंटा तोच. 

परंतु अशोक सिंघल हे नाव जरी भारतभर परिचित असले तरी, त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांना विशेष माहिती नाही असे आम्हाला जाणवले, आणि म्हणूनच आजचा हा लेखन प्रपंच. ज्याप्रमाणे पर्वताला मिठीत कवटाळता येत नाही, समुद्राला ओंजळीत उचलून घेता नाही त्याचप्रमाणे अशोक सिंघल हे व्यक्तिमत्वत्यांचे कार्य काही 
शे-पाचशे शब्दात मांडता येणे शक्य नाही.

या लेखातून आम्ही, त्यांच्या कार्याचा मांडलेला हा वृत्तांत म्हणजे समुद्रातून ओजंळीत भरून घेता येईल एवढेच आहे. अशोक सिंघल यांचा जन्म १९२६ साली आग्रा शहराजवळील अत्रौली येथे एका सुखवस्तू, संपन्न अश्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर त्यांनी काशी हिंदू विश्वविद्यालय येथून धातूकर्म अभियांत्रिकी (Metallurgical engineering) शाखेतून पदवी घेतली. 

या अभियांत्रिकीमध्ये ते प्रथम स्थान मिळवून उत्तीर्ण झाले होते. अविरत परिश्रम आणि संकल्पित कार्याप्रती श्रद्धा यांमुळेच आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये ते नेहमीच अव्वल स्थानावर असत. अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर ते नोकरी किंवा व्यवसाय करावा असे त्यांच्या कुटुंबीयांची ईच्छा होती, परंतु अशोकजींना हिंदू हिताचा प्रपंच मांडायचा होता त्यामुळे त्यांनी आपले सुखनैव, ऐश्वर्य संपन्न कुटुंबाचा त्याग करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य स्वीकारले. पुज्यनीय रज्जूभैया यांच्या सोबत संघकार्यासाठी आपले जीवनमान व्यतीत करायचा निर्णय त्यांनी घेतला.

स्वयंसेवक ते प्रचारक असा प्रवास करत ते १९५० साली उत्तर प्रदेशचे प्रांताचे प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ही जबाबदारी २५ वर्षे सांभाळली. १९७५ आलेल्या आणिबाणीचा त्यांनी कडवा विरोध केला आणि वेळप्रसंगी भूमिगत होऊनही कार्य केले.

आणीबाणी नंतर अशोकजींना दिल्ली प्रांत प्रचारक अशी जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी ५ वर्षे तितक्याच धडाडीने आणि तळमळीने कार्य केले. अंततः १९८२ साली त्यांना विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी देण्यात आली आणि याच नियुक्तीने अशोकजीच नव्हे हिंदुसमाजाला वेगळीच कलाटणी मिळाली. 

अशोकजींचे अजोड नेतृत्व आणि अमोघ वक्तृत्व याची छाप समस्त हिंदू समाजावर पडली. त्यांच्या भाषणातील काही वाक्ये, वाक्यप्रचार ही विश्व हिंदू परिषद आणि हिंदू  समाजाची घोष वाक्ये झाली. "गर्व से कहो हम हिंदू है ", सौगंध राम की खाते है, मंदिर भव्य बनायेंगे", " हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा" ही घोषवाक्ये उदाहरण म्हणून देता येईल.

हिंदू समाजाचे निरीक्षण करताना त्यांना जेंव्हा लक्षात आले की बऱ्याच समाजघटकांना शिक्षणासाठी  शाळा उपलब्ध नाहीत, काही जणांना शाळेत जाणे शक्यही होत नाही तेंव्हा त्यांनी, सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे कडून प्रेरणा घेत; एकल विद्यालयाची (एकशिक्षकी शाळा) स्थापना करून शिक्षणाची गंगा खेडोपाडी नेली.
आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेऊन विकसित व्हावेत या करता वसतिगृहांची उभारणी करण्याचा उपक्रम सुरु केला. एकल विद्यालय आणि आदिवासी विद्यार्थी वसतिगृह या उपक्रमातून लाभ घेतलेले लाखो विद्यार्थी आज समाजामध्ये एक उत्तम नागरिक म्हणून अभिमानाने जीवन व्यतीत करीत आहेत.

हिंदू-हिंदू मध्ये असणारा जातीभेद, अस्पृश्यता त्यांना कधीच मान्य नव्हता आणि म्हणूनच त्यांनी या भेदभावाविरोधात खंबीरपणे पावले उचलली. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, राममंदिर कोनशिला जेंव्हा बसवली गेली तेंव्हाएका अनुसूचित जातीतील बांधवांच्या हातून बसवली गेली. 
हे करण्याचा आग्रह अशोकजींचाच होता. 

हिंदू समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे अंतःकरण सदैव तळमळत असे. हिंदू धर्मातील विविध संप्रदाय, मठ आणि साधू संत यांना एकत्र करून त्यांच्या द्वारे समाजप्रबोधन करण्यासाठी धर्मसंसद, धर्मपरिषद भरवण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.

रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन जन आंदोलनामध्ये परावर्तित करून अवघा हिंदू समाज त्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यात अशोकजींची भूमिका महत्वाची आहे. 

गौ-गंगा-गायत्री या विश्व हिंदू परिषदेच्या त्रिसूत्रीला रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची जोड अशोकजींनीच दिली असे म्हणणे योग्यच ठरेल. अशोकजी केवळ भाषणबाजी करणारे नेते नव्हते तर प्रत्येक आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय तथा अग्रभागी असणारे वीर योद्धा होते.

एका आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये ते स्वतः जखमी देखील झाले होते.
रामजन्मभूमी मुक्तता हेच त्यांच्या आयुष्याचे प्रमुख लक्ष बनले आणि अखेर पर्यंत ते या लक्षासाठी संघर्ष करतच राहिले.

अखेर १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सर्वांचे लाडके, मार्गदर्शक अशोकजीनी गुरुग्राम येथे अखेरचा श्वास घेतला.

१९९२ साली जेंव्हा बाबरी मशिदीचा ढाचा उध्वस्त करण्यात आला तेंव्हा, संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि अशोकजी यांच्यावर टिकेचा भडीमार करण्यात येत होता. त्यावेळेस त्यांच्या मागे उघडपणे आणि भक्कमपणे उभी राहिलेली एक व्यक्ती म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. 

हिंदू हितासाठी, धगधगत्या हिंदुत्वासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या या दोनही हिन्दुसेनापतीचा स्मरणदिन एकाच दिवशी असावा याला कसला योग म्हणावे हेच आम्हाला सुचत नाही परंतु हिंदुत्वासाठी संघर्षमय जीवन जगणाऱ्या आणि जगू इच्छिणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने या दोन हिंदू वीरांचा आदर्श जरूर पुढे ठेवावा.

आयोध्येमध्ये भव्य राममंदिराचे निर्माण व्हावे हीच या दोन्ही हिंदू सेनापतींना खरी श्रद्धांजली ठरेल,
असेच आमचे मत आहे.

हिन्दुसेनानी विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक हिंदुकुलभूषण अशोकजी सिंघल
हिंदुसरसेनापती शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना कोटी कोटी प्रणाम.

श्रीपाद श्रीकांत रामदासी
   धायरी पुणे - ४१

Comments