कालव्याची कालवा कालव

                                                                                        दि. २९ सप्टेंबर २०१८ 

२७ सप्टेंबर २०१८ सकाळची गडबड संपवून वस्तीतील महिला, घरातील उरले सुरले काम आटोपत होत्या,
काही जण आपापल्याला मुलांना शाळेत सोडायला निघालेले, तर काहीजण परत आणायला....

सारं कसं अगदी रोजच्या सारखं चाललं होतं.... पण एवढ्यात गिल्ला झाला,

पाणी पाणी पाणी ........  पाहता पाहता पाण्याचा जोरदार लोंढा रस्त्यावरून वाहू लागला.

पाण्याचा जोर इतका प्रचंड होता कि वाटेत जे येईल ते पार बुडून, वाहून जाऊ लागले.
पाऊस नसताना, रणरणत्या उन्हात एवढे जलौघ आला तरी कुठून ???? कोणी तरी ओरडले

कालवा फुटला......  कालवा फुटला .....

आणि पाहता पाहता वाटेत येईल त्याला भुसपाट करत आपल्यासोबत ओढत, फरपटत.. पाण्याचे लोंढेच्या लोंढे आजूबाजूच्या घराघरातून घुसले, तकलादू पत्र्याची घरे...  घरे कसली,  खरं तर पाठ टेकवण्यासाठी,
आणि मुळातच असलेला फाटका संसार झाकण्यासाठीची केलेली खटपट; पाहता पाहता पाण्यासोबत वाहून गेली.......
                                     " भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, 
                                      प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले "

अशीच गत अनेकांची झाली.....   काही घरची चूल नुसती विझली नाही तर वाहूनच गेली......

हे वर्णन आहे सिंहगड रस्ता-दांडेकर पूल येथील दुर्घटनेचं....

प्रत्यक्ष दुर्घटना स्थळाची पाहणी केली तेंव्हा त्याची रौद्रता, भयानकता हि अधिक स्पष्ट झाली.

घडू नये ते घडलं, आता कालचक्र उलटे फिरवून त्यात बदल करता येणार नाही, परंतु पुढे काय ?
हाच एक यक्ष प्रश्न प्रत्येक पिडीताच्या चेहऱ्यावर उभा होता.

समाजाचे प्रश्न समाजाने सोडवायचे असतात आणि म्हणूनच दुघटना घडल्यानंतर काही वेळातच मदत कार्य सुरु झालं...
कोणी झोपडयांमध्ये अडकलेल्याना बाहेर काढलं, पाण्याचा ओघ कमी झाल्यावर कोणी घरात शिरलेले पाणी काढलं, कोणी चिखल गाळ काढला, कोणी बेघर झालेल्यांच्या भोजनाची व्यवस्था केली....
आणि पाहता पाहता या संकटावर मात करण्याची तयारी सुरु झाली.

दुर्घटनास्थळी अजूनही मदत कार्य चालूच आहे, विविध संघटना, प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक लोकप्रतिनिधी हे सर्वजण झपाटून काम करतायत, रोगराई पसरू नये म्हणून काही सत्शील डॉक्टरानी मोफत उपचारही सुरु केले आहेत.

मी जेंव्हा तिथे पोहोचलो तेंव्हा काही विविध संघटनांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक, काही मंडळांचे सभासद, प्रतिष्ठाने...
दुर्घटनाग्रस्त बंधू भगिनींना मोठ्या प्रेमाने, सहानुभूतीने भोजन वाटप करीत होते, कोणी जुनेच परंतु चांगले असे कपडे वाटत होते, कोणी उद्यासाठी काय काय करावे लागेल याची विचारपूस करत होते, काही संस्थानी ज्या विद्यार्थ्यांची वह्या पुस्तके वाहून गेली आहेत, त्यांच्या साठी वह्यापुस्तके, दप्तरे यांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे, काही संघटना निधी जमा करत आहेत, कोणी धान्य पुरवतो आहे तर कोणी पांघरूण.

तेथील घरांची झालेली दुरावस्था पाहून मन सुन्न झाले होते, घरी आलो आणि नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप
चाळले ... तर या दुर्घटनेवर चक्क विनोद येत होते, श्शी !!!

एका बाजूला समाजातील जागृत आणि संवेदनशील तरुणाईचे सेवाकार्य दिसत होते तर दुसरीकडे निर्लज्जपणाचा कळस गाठलेले हे विनोद...  तर काही जणांनी त्याला दोनदा तीनदा दात विचकवत दिलेली दादही पाहिली, दात विचकवणाऱ्यांसाठी तो विनोद फाईव्ह स्टार ग्रेडचा असेलही परंतु माझ्यादृष्टीने त्या विनोदाचा निर्माता मात्र अगदीच थर्ड ग्रेडेड आहे.

एकीकडे लोकांचे संसार अक्षरश: उध्वस्त झाले आहेत आणि त्यावर विनोद बनविले जातात ? हि माणसांच्या रूपातली गिधाडंच असली पाहिजेत.

जात-पात, संघटना, विचारधारा, पक्ष, या असल्या खुळचट संकल्पना बाजूला सारून माणुसकीचं दर्शन घडवणारी ती सेवेकरी मंडळीही दिसली तर सहकार्य करणाऱ्या संघटना अमुक एक विचारधारेच्या आहेत म्हणून सेवाकार्यापासून दूर पाळणारी, " मला काय त्याचे ?"  असे म्हणत घरातल्या टिव्हीवर दुर्घटनेची चलचित्र पाहत चूकचकणारी मंडळी, व्हाट्स ऍप वर " अरेरे वाईट घडलं " असं म्हणत, प्रत्यक्षात मात्र उदासीन राहणारी मंडळीदेखील दिसली.  यातला खरा भारत कोणता ? हे तुम्हीच ठरवा.

एकदा दुर्घटनास्थळी जरूर जा आणि त्या फुटलेल्या कालव्यामुळे जर तुमच्या मनात कालवा कालव झालीच तर, तुम्हाला आवडेल त्या संघटनेच्या माध्यमातून दुर्घटनाग्रस्तांना जरूर सहकार्य करा.

बाकी वाचक सुद्न्य आहेतच .....

श्रीपाद श्रीकांत रामदासी

धायरी पुणे ४१....


Comments

Suhas Ingle said…
अगदी बरोबर आहे मित्रा, जे लोक यावर पण जोक बनवतात ते तर खरे निर्लज्ज आणि फालतू लोक आहेत आणि सॉरी त्यादिवशी मी नाही येऊ शकलो तुज्यासोबत..