जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ वारी पंढरीची ...

जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ 
 वारी पंढरीची ... 

© श्रीपाद श्रीकांत रामदासी


छायाचित्र साभार -- गुगल सर्च इंजिन

कालपासून पंढरीच्या वारीचा सोहळा सुरु झाला.....
खरंच काय गूढ आहे या वारीमध्ये ? ......

शतकानुशतके कोणीही ना आमंत्रण पत्रिका छापते, ना कुणी कोणाला
वारीमध्ये सामील होण्याचे आवाहन करते, ना कोणाला सामील होण्याचे  मानधन मिळते,
 तरीही बरोबर ज्या त्या तिथीला, जो तो आपापल्या दिंडीसोबत हजर.

वारी ..... 

या दोन अक्षरांमध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे कि केवळ या दोन शब्दांचा महामंत्र,
लाखो भाविकांना शेकडो किलोमीटर चालण्याची ऊर्जा देतो.

जात, पंथ,वर्ण, वंश, आपले समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक प्रश्न,
हे सगळे आपोआप बाजूला सारून वारकरी अखंड चालत असतो, विठू नामाचा गजर
करीत असतो.

जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात " विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ "

म्हणूनच भेदभाव विसरून एक होणे म्हणजे नेमके काय ते वारीतच कळते, समरसता प्रत्यक्षात उतरते ती इथेच.

मला पोटाला अन्न मिळेल का ? झोपायला जागा मिळेल का ? परगावात माझे कसे होईल ?
पाऊस आला तर कसं ? हे असले प्रश्न कधीच कोणत्याही वारकऱ्याला भेडसावत नाहीत.
त्याला एवढेच कळते कि " जो चोच देतो, तोच दाणाहि देतो ".

समर्थांनीही म्हटलेच आहे कि " रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी ". 


वारीमध्ये भुकेल्याला अन्न मिळते, तहानलेल्याला पाणी मिळते, एकटेपणा वाटणाऱ्याला सखे सोबती मिळतात,
हौश्याची हौस फिटते, नवश्याचा नवस फिटतो तर गावश्याला हवे ते गवसतेच, व्यावसायिकांना उद्योग मिळतो,
तर समाजसेवकांना सेवेचे समाधान मिळते.

भागवत धर्माची परम पवित्र भगवी ध्वजा खांद्यावर तर आरोग्यदायी, मंगलकारी तुळस डोईवर घेऊन
लहान, थोर, महिला, पुरुष, युवती, युवक, वयस्कर सगळे सगळे त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने अहोरात्र प्रवास करत असतात.
एकादशीला तर चंद्रभागेच्या तीरावर भक्तीची गंगाच नव्हे तर महासागर लोटतो......

वारीमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी होतही असतील परंतु मान-पान, मोठेपणा यांवरून कधीच
वाद होताना निदान मला तरी दिसले नाहीत. उलट वारीमध्ये एक-मेकांच्या पाया पडण्याची पद्धत आहे.

स्वतःच्या मोठेपणाचा फुका अभिमान गळून पडतो तो फक्त वारीतच.

म्हणूनच जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटले आहे कि,

" पंढरीसी नाही फुका अभिमान, 
 पाया पडे जन एकमेका ...... "

जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते कि जीवन जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ,म्हणजे वारी. 

कुठेही अनाठायी न रमता, अति चिंता विवंचना न करता, न थकता, कोणाचाही द्वेष, मत्सर न करता, ईश्वराचे गुणगान करीत, अविरतपणे आपल्या अंतिम ध्येयाकडे चालत राहणे, पुन्हा पुन्हा चालत राहणे हिच या वारीची शिकवण आहे असेच मला वाटते.


देहू आणि आळंदीच्या संतश्रेष्ठांच्या पालख्या आपल्या पुण्यात असणार आहेत.
जमलं तर जरूर दर्शन घ्या आणि आयुष्यात किमान एकदातरी वारकरी व्हाच !!!


पांडुरंग हरी वासुदेव हरी .... नित्य घडावी तुझीच वारी 

आपलाच :
श्रीपाद श्रीकांत रामदासी.
     धायरी पुणे ४१.

Comments

Satish said…
खुपच छान वर्णन केले आहे श्री ...