चिऊ ताईचा संदेश ......
चिऊ ताईचा संदेश ......
© श्रीपाद श्रीकांत रामदासी
घनदाट सुंदर बहरलेली, असे एक वनराई,
जो जे वांछील तो ते मिळवी, उणे नसेच काही....
वटवृक्ष, आम्रपल्लव, पिंपळ, कुठे चाफा अन जाई
केसरी करी गर्जना कोकीळ मंजुळ गाई ...
पशु पक्षी सौख्ये नांदती गोड मधुर फळे ती खाई
दाट सावली पाहुनी अंती सुखासीन ते होऊन जाई
एक दिनू उगमे भयंकर वडवानल तो पेटत जाई
जे जे येती मार्गावर ते ते भस्म करीत जाई
पक्षी घाबरे प्राणी बावरे कळेना कोणास काही
कसे वाचावे अग्नीतून या सुचेना कोणास काही
प्राणी धावे ठाई ठाई पक्षीही उडून जाई
क्षणार्धात ती वनराई धगधता अग्निकल्लोळ होई
एक उठे गोंडस चिऊताई, तीही म्हणे कोठे ना जाई
घर हे माझे हि वनराई त्यांसी वाचवून करेन उतराई
पुकारे व्याघ्रास, कधी गजास, कधी पुकारे पक्षीराजास
कोणी ना येई कामकाजास, जो तो धावे स्वतः वाचण्यांस
मग करुनी विचार चिऊताई, गाठी पाणवठा घाई घाई
धरोनी जलकण चोची ठाई, वृक्षावरी ओतून देई
पुन्हा पुन्हा धावे घाई घाई, एक एक जलकण ओतून देई
पाहुनी तिजला पशु पक्षि ते, म्हणे अगं ए वेडाबाई
चोच तुझी इतुकीशी गे बाई, वणवा जाळेल तुज वेडापाई
चल सोडुनी ही वनराई, दूर जाऊ देशा ठाई
म्हणे चिमुकली चिऊताई, घर हे माझे हि वनराई
घेतला सहारा जिचे ठाई, तिजला कैसे सोडावे भाई
ऐकून तिचे ऐसे वचन, पक्षिराजही थांबे काही क्षण
म्हणे दिलीस चांगली तू शिकवण, मी हि ना जाणार येथून क्षणभर
सर्वदूर मग वार्ता जाई, म्हणे चिमुकली वाचवू पाही
आपणही मग करू काही, वाचवू आपली वनराई
आले केसरी, व्याघ्र, अस्वले जमती सारे पाणवठ्याच्या ठाई
वदे केसरी सारे जरी ना जमले तरी राखू शक्य तितके आपुल्या ठाई
गजराजही डुलत येई, म्हणे नसावी चिंता या समई
शुंड भरोनी मारत जाई, वणवा विझवण्या करी घाई
पाहता पाहता सांजसमयी, वणवा सारा विझून जाई
गजराजास दुवा देई, म्हणे तुजमुळे वाचली हि वनराई
गजराज म्हणे मी न येथे आलो प्रथम, मज पाचारी केसरी भाई
मग कोण तो असे प्रथम, कार्य आरंभिले ज्याच्या ठाई
जो तो विचारे ज्याला त्याला, कोणी म्हणे मी न पहिला
पक्षिराज मग सांगू लागला, चिऊताई ने पाय रचिला
शोधता सारे चिऊ ताई, कोठेच न सापडे ती बाई
अखेर एका पर्णाखाली, निपचित देह दिसून जाई
जिने वाचवली वनराई, तीच आता जगी नाही
कैसे कर्म म्हणावे बाई, स्मरून शोकमग्न ते होई
संदेश स्मरे तिचा पक्षीराजास म्हटली होती चिऊताई
म्हणे आपण आपल्या करावे कार्यास, का विसंबावे दुसऱ्या ठाई
हळहळून प्राणी पक्षी जाई, म्हणे धन्य तू गे चिऊताई
नाही जोड तुजला काही, चिरसंदेश तूच देई
" बंधुनो नका घाबरू संकटांना, संकट असते क्षणाचे
मिळुनी लोटता संकटावरी भय राहील का कोणाचे ? "
रचना : श्रीपाद श्रीकांत रामदासी
Comments