एक श्रीमंत कलादृष्टी : शिवसृष्टी ! शिवसृष्टी !!
आज सहकुटुंब आंबेगाव येथील शिवसृष्टी अनुभवली. होय अनुभवलीच म्हणावे लागेल कारण तिथे जे काही निर्माण केले गेले आहे ते अनुभवावेच लागते त्याला पहिले, बघितले अश्या शब्दात बांधता येत नाही. भव्य असे प्रवेशद्वार, त्याला दिंडी दरवाजा. आतील रचना देखील ऐतिहासीक प्रकारच्या वाड्याचीच. दगडी कारंजे, ओवऱ्या मोठाल्या पायऱ्या, उबंरठे अगदी कित्येक वर्षे जुनी वाटावी अशीच वास्तू. पण ही रचना जरी ऐतिहासिक प्रकारची असली तरी, आतील तंत्रज्ञान मात्र अत्याधुनिक पद्धतीचे आणि निदान मला तरी नवखे. शिवसृष्टीचे प्रत्येक दालन म्हणजे जणू इतिहासाचे हळुवार उलगडणारे पानचं, ऐतिहासिक शस्त्रे, काहीं शस्त्रांच्या प्रतिकृती, इतिहासातील व्यक्तींची अस्सल चित्रे, महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती, राज्याभिषेक समयी असणारी चिन्हे, आग्र्याहून सुटकेचा आणि अफझल खान वधाचा थरार प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना अगदी आपण प्रत्यक्षदर्शीच आहोत असेच वाटते. एकंदरीत चित्रे, शस्त्रे प्रतिकृती पाहता हे एखादे पारंपरिक वस्तुसंग्रहालय आहे का ? असे वाचकांस वाटेल परंतु ते तसे नाही. येथे आपण काही नुसते बघत नाही, तर प्रत्येक ब...