आपले पाल्य सुरक्षित आहेत का ? 

© श्रीपाद श्रीकांत रामदासी
 
सकाळची गडबडीची वेळ, ज्याला त्याला ऑफिस गाठायची घाई. अशाच वेळी दळवीवाडी फाटा येथे घडलेली ही घटना.

दळवीवाडी कडून नांदेड कडे जाणाऱ्या वळणावरून निघालो होतो, नेहमीप्रमाणे वाहतूक अडखळत चालू होती येवढ्यात किरकिटवाडी कडुन एक भरधाव वॅन आली आणि एका दुचाकीस्वाराला जोरात धडकली.
यांची धडक होणार हे लक्षात आल्या आल्या माझ्यासह आणखी काहीजणानी व्हॅनला थांबवण्यासाठी आरडा ओरडा केला परंतू व्हॅन काही थांबली नाही.

नशीबाने दुचाकीस्वाराच्या अंगावर जर्किन आणि डोक्यावर हेल्मेट होते म्हणून त्याला काही फारशी इजा झाली नाही.

त्या व्हॅन जवळ गेल्यावर लक्षात आले की ती व्हॅन विद्यार्थी वाहतूक करणारी व्हॅन होती. चालकाने सिट बेल्ट लावला नव्हता. त्याला बेदरकार गाडी चालवण्याचा जाब विचारला तर उलट उत्तरे ठरलेली......

उपस्थितांपैकी काही जणानी त्याला खाली उतरायला सांगितले पण गाडी बाजूला घेण्याच्या बहाण्याने तो पळून गेला.

त्या व्हॅनच्या बाबतीत जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे ती व्हॅन पांढरी होती आणि नंबरप्लेट पण पांढरी काळी होती. म्हणजे ती काही प्रवासी वाहतूक करण्यासाठी अधिकृत अशी व्हॅन नव्हती पण तरीही त्यातून विद्यार्थी वाहतूक होत आहे. ही अशी वाहतूक बेकायदेशीर आहे.

मला त्या व्हॅन वाल्याचे काही वाटले नाही कारण व्यवसायातली नैतिकता त्याच्याकडे असती तर त्याने असे बेकायदेशीर कृत्य केलेच नसते पण त्या पालकांचे काय जे या अश्या बेजबाबदार व्हॅनमधून आपली पाल्ये पाठवतात ?

दुचाकी ऐवजी जर एखादी मोठी चारचाकी धडकली असती तर काय झाले असते ?

आपण आपल्या पाल्याला कोणत्या प्रकारच्या गाडीत  पाठवत आहोत ? गाडीचा चालक  सुरक्षीत वाहन चालवतो का ? याचा फारसा विचार होताना दिसत नाही.

आपले पाल्य हे आपलीच मुले असतात ना ?  मग त्यांच्या सुरक्षीततेची काळजी आपणच घेतली पाहिजे असे मला वाटते.

दुसरे असे की या अश्या अवैध वाहतूकीवर पोलिस काही कारवाई करणार आहेत कि  नाहीत ?

या अश्या प्रकारच्या अवैध, बेजबाबदार, बेदरकार वाहन चालकांमुळे आपण आपला पाल्य आणि पर्यायाने राष्ट्राचे भविष्य धोक्यात तर घालत नाही ना ? याचा विचार प्रत्येक पालकांनी आणि वाहन चालकांनी आवश्य करावा येवढेच सांगणे आहे.

बाकी ज्याचा निर्णय त्याने घ्यावा.

आपलाच

श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments