मराठ्यांचा अग्निपथ : पानिपत..... !

 


युद्धभूमीवरील स्मारक (काला आम)


युद्धस्य कथा रम्य: असे म्हटले जाते.  युद्धाच्या कथा ऐकण्यासाठी जितक्या रम्य, श्रवणीय असतात तितक्या त्या प्रत्यक्षात असतात का ?

नाही मुळीच नाही !     धूळ, आक्रन्दने यांनी कोंदट झालेले वातावरण, जखमी सैनिकांचे आणि प्राण्यांचे विव्हळणे आणि मैदानभर मूडद्यांचा खच.....  ही वर्णने निश्चितच रमणीय असू शकत नाहीत.

आज पासून तब्बल २६१ वर्षांपूर्वी असेच एक भयंकर, भीषण युद्ध उत्तर भारतामध्ये कुरुक्षेत्राजवळ झाले होते.

" लाख बांगडी फुटली, दोन मोत्ये गळाली, २७ मोहरा गमावल्या " (अर्थात एक लाख माणसे मारली गेली, दोन खास नेते गेले आणि २७ प्रमुख सरदार गमावले ) असे सांकेतिक वर्णन ज्या महायुद्धाबद्दल केले जाते  महायुद्ध म्हणजेच पानिपत चे रे युद्ध  " मराठ्यांचा अग्निपथ; पानिपत ....!"

पानिपत हा शब्द उच्चारल्याबरोबर ज्यांच्या मनात " हरलेले युद्ध " असा विचार येतो; त्यांना पानिपत कधीच समजणार नाही. कोणत्याही युद्धाचा परिणाम हा केवळ हरणे किंवा जिंकणे एवढाच पुरता मर्यादित  ठेवता येत नाही. पानिपतावर मराठे जरी हरले असे मानले तरी त्यांचा शत्रू तरी कुठे जिंकला होता ?

महाबलाढ्य अफगाणी अहमदशाह अब्दाली पानिपतानंतर ना आपले राज्य इथे स्थापू शकला; ना इथून नेऊ शकला. एवढेच नव्हे तर पानिपतापूर्वी वेळा स्वारी करणारा अब्दाली पुन्हा परत भारताच्या वाटेला गेला नाही. याला जिंकणे म्हणता येईल ?      नक्कीच नाही !

अब्दालीने या युद्धाचा आणि मराठ्यांच्या शौर्याचा घेतलेला धसका त्याच्याच शब्दात सांगायचं तर ;

" मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी  कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुनः पुन्हा हल्ले चढवले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रुस्तुम आणि इस्फिन्दर (अफगाण महाकाव्यातील कृष्णार्जुन ) सारखे वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालून चावली असती ! मराठ्यांसारखी युद्धाची लालसा, अशी खुमखुमी आणि इतकें शौर्य होणे दिसणे अशक्य ! " ()

ज्याच्या विरोधात युद्ध झाले तो विदेशी अब्दाली सुद्धा मराठ्यांचे शौर्य मान्य करतो पण आपलीच म्हणवणारी काही स्वदेशी माणसे मात्र पानिपतची मस्करी करताना दिसतात हे केवळ दुर्दैव म्हणावे लागेल.

पण मग पानिपत म्हणजे नेमके काय ? पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या छातीवरची भळभळणारी जखम....

लक्षात ठेवा !  छातीवर जखमा वीरांना होतात; पळपुट्याना नाही.

निमक हराम नजीबखानाच्या आमंत्रणावरून या राष्ट्रावर घातला गेलेला अब्दाली रुपी घाव ज्या फाकड्या, मर्द छातीने झेलला ती स्वाभिमानी छाती म्हणजे पानिपत....!

पण हे पानिपत नेमके झाले कशासाठी ? दख्खनेतले मराठे उत्तरेत लढण्यासाठी का गेले ? असे अनेक प्रश्न पडू शकतात

काहीजणांच्या मते, अहमदिया कराराचे पालन करण्यासाठी मराठे पानिपतावर गेले. तांत्रिकदृष्ट्या हे योग्य जरी असले तरीनसता पाळाला करार तर फरक काय पडला असता ? याचाही विचार करणे आवश्यक आहे.

तो काळच मुळात असा होता की; दख्खनेतला मराठा हा  अवघ्या हिंदुस्थानचा संचालक बनला होता. त्यामुळे मराठ्यांनी एखादा करार मोडला असता आणि दंडेलशाहीने वसुली केली असती तर; त्यांना आडवणारी एकही सत्ता हिंदुस्थानात नव्हती.

पण तरीही मराठे पानिपतावर का गेले ? याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर त्यामागे; मराठ्यांचे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसुरक्षा हेच तत्व दिसते.

शिवकालानंतर विस्तारत गेलेले हिंदवी स्वराज्य हे अहत तंजावर ते तहत पेशावर  पर्यंत पोहोचले होते. पण तरीही आपल्या देशाचे राजकारण, सत्ता ही स्वदेशी सत्ताधीशांकडेच राहिली पाहिजे हे तत्व राखून मराठे आपला कारभार चालवत होते.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांपासून हेच तत्व चालत आले होते, अफगाणी नादिरशाहच्या स्वारी प्रसंगी श्रीमंत बाजीराव; चिमाजी अप्पांस लिहितात की; " अप्पा परराज्य राहिले तरी सर्वांवरच आहे. " ()

हेच तत्व पुढे नेत मराठ्यांनी दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः च्या शिरावर घेतली होती. १५ मार्च १९६० च्या एका पत्रात सदाशिवरभाऊ पेशवे स्पष्ट लिहितात की;

" सांप्रत तैमूर याची पातशाही; अब्दालीने गारद केली. म्हणजे अमीर राजपूत आहे. याची पातशाहत घ्यावयाची राहिली की काय ? हिंदुधर्म तैमूर यांचे काहीच नाही असे होणे हे आमचे पाहिल्यात कसे येईल ? पातशाहत दिल्लीस कायम करून; परकी शत्रू नाहीसा करावा मग घरचा बंदोबस्त सहजात होईल. घरचे पेच असतील ते त्याचे आमचे विचारे दूर होतील "  ()  

आधी बाहेरचा शत्रू घालवूया आणि मग आपापसातील तंटे बघेडे विचारांती सोडवूयात; 

याला " राष्ट्रसुरक्षा सर्वतोपरी " या व्यतिरिक्त अन्य काही उक्ती आम्हाला तरी सुचत नाही.

एकीकडे मराठ्यांची अशी उदात्त नीती होती तर दुसरीकडे; कोणी इस्लामसाठी तर कोणी चौथाईपासून मुक्तता मिळवण्यासाठी अब्दालीच्या गोटात सामील झाले होते

त्यामुळे हे युद्ध मराठे विरुद्ध अफगाण एवढ्यापुरते मर्यादित राहता राष्ट्रीयत्व विरुद्ध अराष्ट्रीयत्व त्यांच्यातीलच युद्ध मानावे लागेल.

मराठ्यांचा हेतू , नीती आणि करणी ही सत्वशील आणि राष्ट्रहिताकारी अशीच होती आणि म्हणूनच आजही पानिपतच्या आजूबाजूच्या गावांतून सदाशिव भाऊंचे पोवाडे गायले जातात, अब्दाली किंवा नजीबखानाचे नाही

पानिपत जिल्ह्यातील एका गावाला ' भाऊपूर ' असे नाव आजही आहे. पानिपतच्या किल्ल्यालाध्ये मराठी लष्कराने रोजच्या पूजेसाठी बांधलेलं भवानी मातेचं मंदिर आजही दिमाखात उभं आहे.

पानिपत, सोनपत आदी भागामध्ये आजही ' रोड-मराठा ' ही जमात अस्तित्वात आहे आणि या समाजाला महारष्ट्राबद्दल नितांत आदर आहे (याच समाजातील श्री. मनोज कुमार या बॉक्सरने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे.) इंदौर, ग्वाल्हेर, बडोदा, या ठिकाणी विस्तारलेली मराठेशाही ही पानिपतनंतरच मोठी झाली.

आपली संस्कृती, नावे, वास्तू  यांचे अस्तित्व सोडून जाणे, आपल्याच माणसांच्या विविध सत्ता उदयास आणणे, ही सारी जेत्यांची लक्षणे आहेत, त्यामुळे पानिपतावर मराठे हरले होते हे काळाच्याच ओघाने पुसून टाकले आहे.

वर म्हटले तसे पानिपत एखाद्या शिवीसारखे वाटणारी काही मंडळी आजही महाराष्ट्रात आहेत हे मोठेच दुर्दैव आहे. जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद अश्या मुर्दाड आणि हलकट प्रवृत्तीच्या धेंडांना पानिपत कधीच समजणार नाही

युद्धाच्या दृष्टीने काही चुका घडल्याही असतील; पण त्या चुका होत्या आणि त्या परिस्थितीत कदाचित कोणाकडूनही घडल्या असत्या.

पानिपत संग्रामातून मिळणारा राष्ट्रीयत्वाचा उदात्त संदेश समजला तरच पानिपतचे महत्व आपणांस समजेल, पानिपत म्हणजे राष्ट्ररक्षणाकडे नेणारा अग्निपथ होता हे जाणवेल, अन्यथा ते एक हरलेले युद्ध एवढाच समज आपला होईल.

पानिपतचे स्मरण म्हणजे राष्ट्रासाठी सर्वस्वाची आहुती देण्याची प्रेरणा होय, असेच आम्हांस वाटते. पानिपतचा प्रसंग आठवत असताना, मा. विश्वास पाटील यांच्या पानिपत कादंबरीतील श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या मुखातील एक संवाद सहज आठवतो; ()

" दादा... पानिपतचा प्रसंग म्हणजे मराठी मातीच्या सर्वोच्च सद्गुणांची आणि दुर्दैवी दुर्गुणांची निशाणीच ! पण खरे सांगू दादा... जोवर ह्या मातीत भाऊबंदकीची, बेदिलीची, गद्दारीची बीजे आहेत, जोवर ह्या राष्ट्रात लाचारी आणि लाथाळीला कायमची मूठ माती मिळणार नाही, तोवर मराठी मातीच्या भाळी पानिपतचा मळवट पुनः पुन्हा भरला जाणार आहे. पानिपत एकदा नव्हे तर अनेकदा घडणार आहे ! .... "

देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध होणारे जीवघेणे कारस्थान, सत्तेसाठी तत्वांना दिली जाणारी मूठ माती, घोटाळे, भ्रष्टाचार हे देशाला पुन्हा एकदा पानिपताकडेच घेऊन जात आहेत असेच मला वाटते

स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी विदेशी अब्दालीला आक्रमणासाठी बोलावणारे गद्दार नजीबखान आजही या राष्ट्रात आहेत पण राष्ट्रासाठी आपापसातील वाद मिटवून एकदिलाने संघर्ष करू हे सांगणारे; सदाशिव भाऊ मात्र लुप्त झाले आहेत हाच या राष्ट्राचा दैदुर्विलास आहे....

जाता जाता एवढेच सांगेन की

 

राखण्या राज्य स्वकीयांचे, विश्वासासह सदाशिव ते लढले

हिमालयाच्या रक्षणार्थ, कडे सह्याद्रीचे धावले ।।

शौर्याचे मेघमल्हार बरसले, जानकोजी इथेच जान देउनी गेले

राष्ट्रसुर्य तळपत राहण्या, लक्ष लक्ष दिवे ते विझले ।।

करुनि स्मरण पानिपताचे, राष्ट्र चेतना जागवू

करुनि अठरा पगडी एकअजेय हिंदुस्थान घडवू ... ।। 

 ----- (रचना : श्रीपाद श्रीकांत रामदासी)


संदर्भ :-

() पानिपत : विश्वास पाटील : प्रस्तावना.

() मराठ्यांचा इतिहास: खंड : लेखांक .

() मराठ्यांचा इतिहास: खंड : लेखांक .

() पानिपत : विश्वास पाटील : पृ. ५८७

Comments

Unknown said…
अतिशय सुंदर लेख वाचून अंगावर रोमांच उभे राहिले.
Unknown said…
पानिपत युद्धावर अतिशय सुंदर लेख आहे.अजुन माहितीची वाट बघत आहोत.