वासुदेव हा वासुदेवच.....
गेले दोन - तीन दिवस झाले, सांता क्लोज नको वासुदेव हवा, लाल टोपी नको वासुदेवाची टोपी घाला,
महाराष्ट्राचा हरवलेला सांता क्लोज म्हणजेच वासुदेव..... अश्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वाचल्या.
खरं तर सांता क्लोज आणि वासुदेव यांची तुलना कधीच होऊ शकत नाही.
सांताच्या डोक्यावर टोपी आणि वासुदेवाच्या डोक्यावर पण टोपी म्हणून त्यांचा बादरायण संबंध जोडणे हे योग्य नाही. सांता आणि भारतीय यांचा तसा सांस्कृतिक दृष्ट्या काहीही संबंध नाही, मुळात सांता क्लोज ही काही कुठली धार्मिक संकल्पना नाही. त्यात, कोणत्याही प्रकारचे ईश्वरीय अनुष्ठान नाही की; भक्तिमार्गाचे विवरण नाही.
युरोपियन चर्च मधून १८व्या शतकात केवळ ख्रिश्च्यानिटीचा प्रसार करण्यासाठी म्हणून, ख्रिसमसच्या निमित्ताने जगभर प्रसिद्धीस आणलेले पात्र म्हणजे हा सांता क्लॉस.
हां ! सांताचे; आपली खरी ओळख लपवून, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे; ही बाब उल्लखनीय असली तरी त्यात ईश्वरीय अनुष्ठान कुठेच नाही.
त्याच्या अगदी उलट; ईश्वरीय अधिष्ठान असणारा जनमानसातील एक म्हणजेच वासुदेव.
प्रापंचिकाला देवाचे नाव घेत काही तरी दान द्यायला शिकवणारा वासुदेव स्वतःची खरी ओळख कधीच लपवत नाही.
अगदी सकाळी सकाळी, " गाव जागवत आली.... वासुदेवाची स्वारी " असे म्हणत भजनं, गीतं गात गावात फेरी मारणारा वासुदेव; समाजाला भक्तीच्या, कर्माच्या मार्गावर नेणाऱ्या धर्म प्रतिनिधीपेक्षा कमी नाही याचीच प्रचिती देत असतो.
गेल्या काही वर्षांपासून, २५ डिसेम्बरच्या पार्श्वभूमीवर सांता क्लोजला पर्याय म्हणजे वासुदेव असे चित्र रंगवले जात आहे; परंतु एक बाब लक्षात ठेवावी की; सांता क्लोज ची टूम भारतात येण्याच्या खूप पूर्वीपासून वासुदेवाचे अस्तित्व आहे. त्यामुळे वासुदेवाला ख्रिश्चन पर्याय म्हणजे सांता क्लोज असे असू शकेल पण सांता क्लोजला पर्याय म्हणजे वासुदेव असे होऊ शकत नाही.
रंगमंचावर साकारल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीय लोककला पाहण्याकरता शेकडो रुपयांची तिकिटे विकत घेणारे; दारी आलेल्या वासुदेव, पोतराज, वाघ्या-मुरळींच्या हातात १० रुपये सुद्धा देत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे.
असो ! वासुदेवाच्या बाबतीतही सांगायचे तर, उपऱ्या सांता क्लोजचा पर्याय म्हणून केवळ १-२ दिवस नव्हे तर; अगदी मोजक्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या या ईश्वरनिष्ठ परंपरेचा; वर्षभर सन्मान व्हावा हीच अपेक्षा आहे.
बाकी आपण सुज्ञ आहातच !!!
Comments