गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !




गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

अंजन कांचन करवंदी तर कधी गडकोटांच्या चिरेबंदी यांनी संपन्न असणारा एक मंगलदायी प्रदेश म्हणजे; तुमचा आमचा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा इतिहासाकडे अगदी सहज दृष्टी टाकली तर विविध क्षेत्रातल्या विविध परंपरांचे दर्शन घडते. या अनेक परंपरांमधील एक परंपरा म्हणजे संत परंपरा. महाराष्ट्रामध्ये अलौकिक असे अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला दिलेले आहे.

संतांनी प्रबोधनाद्वारे निर्माण केलेल्या ज्ञानमंदिराच्या ओवरीवर आजही मराठी माणूस नतमस्तक होतो आणि अडचणीच्या काळामध्ये संतवचनांचे स्मरण करत मार्ग काढतो. या ज्ञानमंदिराकडे भक्तिमय मनःचक्षूंनी पाहिल्यावर समजतं की या ज्ञानमंदिराचा पाया माउली ज्ञानेश्वरांनी रचला, संत नामदेवादी संत सज्जनांनी त्याच्या भिंती उभारल्या तर जगतगुरु संत तुकाराम त्याचा कळस ठरले.

थोडे आणखी पुढे जाऊन पाहिल्यास त्या कळसावर एक पताका फडकताना दिसते, त्या पताकेचा मंजुळ स्वर अस्पष्ट ऐकू येतो.... आणखी पुढे गेल्यावर त्या स्वराचे शब्द ऐकू येतात ..... गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला .....
मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते...   ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा ....

झिंगराजी राणोजी जानोरकर आणि सखुबाई झिंगराजी जानोरकर यांच्या पोटी, दि २३ फेब्रु १८७६ रोजी कोतेगाव (शेंडगाव जि. अमरावती) येथे गाडगे बाबांचा जन्म झाला. त्यांचे खरे नांव डेबूजी. डेबूजींचे लहानपण, तारुण्य हे अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच गेले, प्रापंचिक म्हणून संसार करत असतानाच त्यांना वैराग्य आले आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून स्वतः चे आयुष्य समाजसेवेसाठी देण्याचा निश्चय केला. पुढील १२ वर्षे ते देशाटन करत समाजाचे हाल अपेष्टा बघत, दिनदुबळे, महारोगी, वंचित, शोषितांची सेवा करत एका वेगळ्याच रूपात जगापुढे प्रकट झाले.

ते जिथे जात तिथे सर्वप्रथम हातात खराटा घेऊन स्वच्छता करत असत, प्रारंभी त्यांची टिंगल टवाळी केली गेली परंतु त्यांनी जेंव्हा स्वच्छतेचे महत्व सांगायला सुरुवात केली तेंव्हा मात्र तीच मंडळी गाडगे बाबांना अवलिया समजून त्यांच्या दर्शनाला येऊ लागली. गाडगे बाबांनी कधीही कुणालाही आपले चरण स्पर्श करू दिले नाहीत. कोणी जास्तच लगट केली तर त्याच्या पाठीत खराटा मारून बाबा तिथून निघून जात असतं. सन्यास घेतल्यानंतर बाबा केवळ गोधडीवरच झोपत असत. त्यामुळे काहीजण त्यांना गोधडे महाराज असेही म्हणत. त्यांच्या डोक्यावरच्या मडक्यामुळे त्यांना काहीजण मडकेबुवा असेही म्हणत असत. पण बहुतांशी जनमानसांमध्ये त्यांची ओळख गाडगेबाबा किंवा गाडगे महाराज अशीच आहे.

ज्याच्या मनामध्ये सर्वच प्राणिमात्रांच्या बाबतीत दया ममता आणि कारुण्य आहे त्यांनाच संत म्हटले जाते अशी धारणा कीर्तनकारांच्या परंपरेत आहे. त्यामुळे गाडगे बाबा हे खऱ्या अर्थाने संतच होते. गाडगे बाबांनी समाजात उतरून जेंव्हा कार्य सुरु केले तेंव्हा प्रबोधनाकरता महाराष्ट्राच्या परंपरेचा कणा असणाऱ्या कीर्तनाचे माध्यम निवडले. कीर्तने किंवा प्रवचने म्हटले की त्यामध्ये पोथ्या पुराणांचे संदर्भ, ओव्यांचे निरूपण किंवा पौराणिक कथा हा भाग असतोच, परंतु गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये तुकोबारायांचे अभंग आणि कबीरांचे दोहे याव्यतिरीक्त अन्य काहीही नसे. ते आपल्या कीर्तनातून स्वच्छता, समानता आणि शिक्षण याचाच प्रसार करत असत. अंधश्रद्धा, जातीभेद, अनिष्ट रूढी, अस्पृश्यता यांच्यावर कडाडून हल्ला करणारे गाडगे बाबा भजन कीर्तनातून लोकांना तासनतास खिळवून ठेवत असत. गाडगे बाबांचे कीर्तन अज्ञजन, अडाणी, उपेक्षित आणि भरकटलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे.

किर्तन हा गाडगे बाबांचा श्वासच म्हणावा लागेल, आचार्य अत्रेंनी सांगितल्याप्रमाणे " सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पहावे पाण्यात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात " . हजारोंच्या समुदायापुढे बाबा किर्तनाला उभे राहिले की बस्स ते त्यांचे राहत नसत, बराच वेळ दाटून आलेले आभाळ जसे गडगडून बरसायला लागते तसे, वंचित, पिडीत अज्ञजनांच्या दुःखद स्थितीने मन भरून आलेल्या बाबांची वाणी गडगडू लागे... "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला" ... हे भजन ते इतके तल्लीन होउन गात असत की श्रोतेसुद्धा अगदी त्या भजनामध्ये बुडून जात असत. काव्य, दोहे, अभंग आणि वऱ्हाडी बोलीतील विनोद यांची भरगच्चं मेजवानी असणारे त्यांचे किर्तन दलितांच्या, अज्ञजनांच्या दुभंगलेल्या मनाला सावरत, धीर देत अखेर प्रबोधनाच्या मार्गावर घेऊन जात असे.

" दगडात देव पाहू नका, माणसांत देव पहा " असा संदेश ते आपल्या कीर्तनातून देत असत हे सत्य आहे परंतु त्याच बरोबर भजन आणि नामस्मरण करत स्वतःच देवत्वाला पोहोचण्याचा दिलेला संदेश आपण नाकारू शकत नाही. त्यांच्या अखेरच्या किर्तनामध्ये गाडगे बाबा स्पष्टपणे म्हणतात की, स्वतः मध्ये देवत्व आणले तर बाहेर देव शोधायची गरजच नाही. या साठी त्यांनी संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ दिलेला आहे, तुकोबाराय म्हणतात " देव पाहण्यासी गेलो अन स्वतः देवची झालो " म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा महिमा इतका अगाध आहे की, त्याचे नामस्मरण करणारा भक्त हा अखेर देवत्वाला पोहोचतो.

यांवरून संत गाडगे बाबांची धार्मिकता स्पष्ट होते, दुर्दैवाने आज त्यांच्या वाक्याचा अर्धाच भाग सांगून समाजातील नैतिक धार्मिकता संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ही बाब दुर्दैवी आहे. गाडगे बाबांनी मूर्तीमध्ये देव पाहिला का नाही यांवर वादविवाद होऊ शकेल पण एक बाब विसरता कामा नये की, स्वतः बाबांनी मूर्तीत देव पाहिला नसेलही परंतु ज्यांना मूर्तीमध्ये देव दिसतो अश्या भक्तजनांची देहू, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी धर्मशाळा उभारण्याचं काम प्रामुख्याने कोणी केले असेल तर ते गाडगे बाबांनीच केले आहे विसरता येणार नाही. आपल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुपयाचा निधी उभा केला होता परंतु त्यातील एका कवडीलाही स्पर्श न करता या निधीमधून धर्मशाळा, विद्यार्थीगृहे, भोजनशाळा आदी गोष्टी सुरु केल्या होत्या. पंढरपुरातील ' संत चोखामेळा ' ही धर्मशाळा त्याचेच एक उदाहरण होय. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही धर्मशाळा गाडगे बाबांनी डॉ. आंबेडकरांना समाजकार्यासाठी देऊन टाकली होती.

विज्ञानवाद मांडत असताना, अंधश्रद्धेचे निर्मूलन करत असताना ज्यांच्या विकासासाठी हे करायचे आहे त्या समाजाच्या श्रद्धांना ठेच पोहोचणार नाही याची खबरदारी गाडगे बाबानी घेतली होती असेच वाटते.

संत गाडगे बाबांचे, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, आचार्य अत्रे यांचेशी चांगलेच ऋणानुबंध होते. गाडगे बाबांनी कधीही स्वतः जातीभेद, अस्पृश्यता मानली नाही त्यामुळे सर्वच महापुरुषांमध्ये असणारा हा सद्गुण त्यांची महानता सांगून जातो. झाडूचे तंत्र आणि दरिद्रीनारायणाची पूजा हा मंत्र गांधीजींनी दिला असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, स्वच्छता आणि समानता याचे बीज जर कोणी रोवले असेल तर ते गाडगेबाबांनी रोवले असे माझे स्पष्ट मत आहे.

प्राणिमात्रांवर दया हे संतांचे प्रमुख लक्ष्मण आहे हे वर सांगितलेच आहे, गाडगेबाबानी मुक्या जनावरांचे प्राण घेऊ नका हा संदेश नेहमीच दिला आहे. त्यासाठी ते कबीरांच्या दोह्यांचा संदर्भ देत असत.

तिरथ जावो, काशी जावो चाहे जावो गया ।
कबीर कहे कमालकू, सबसे बडी दया ।।

गाडगे बाबानी उभारलेल्या निधीचा निस्वार्थ केलेला विनियोग पाहता, त्यांनी केलेले प्रबोधन पाहता, त्यांनी समाजातील पीडितांची केलेली सेवा पाहता त्यांचा आदर्श हा आजच्या तरुणाईने जरूर घेतला पाहिजे.

अज्ञजनाना मुख्य प्रवाहात आणून, आपला परिसर स्वच्छ ठेवून, शिक्षणाची कास धरून, निस्वार्थपणे समाजसेवा करून संत गाडगे बाबांची ही दिव्य परंपरा अव्याहत ठेवली पाहिजे एवढीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. गाडगे बाबांबद्दल एवढेच म्हणेन की;

जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले
साधू तेथेचि ओळखावा, देव तेथेचि जाणावा .....

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला .....


© श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments

Samyak Sadhana said…
छान व ओघवता लेख
Unknown said…
खूपच छान
Unknown said…
खुप छान लेख