एक श्रीमंत कलादृष्टी : शिवसृष्टी ! शिवसृष्टी !!


 

आज सहकुटुंब आंबेगाव येथील शिवसृष्टी अनुभवली. होय अनुभवलीच म्हणावे लागेल कारण तिथे जे काही निर्माण केले गेले आहे ते अनुभवावेच लागते त्याला पहिले, बघितले अश्या शब्दात बांधता येत नाही. 

भव्य असे प्रवेशद्वार, त्याला दिंडी दरवाजा. आतील रचना देखील ऐतिहासीक प्रकारच्या वाड्याचीच. 

दगडी कारंजे, ओवऱ्या मोठाल्या पायऱ्या, उबंरठे अगदी कित्येक वर्षे जुनी वाटावी अशीच वास्तू. 

पण ही रचना जरी ऐतिहासिक प्रकारची असली तरी, आतील तंत्रज्ञान मात्र अत्याधुनिक पद्धतीचे आणि निदान मला तरी नवखे. 

शिवसृष्टीचे प्रत्येक दालन म्हणजे जणू इतिहासाचे हळुवार उलगडणारे पानचं, ऐतिहासिक शस्त्रे, काहीं शस्त्रांच्या प्रतिकृती, इतिहासातील व्यक्तींची अस्सल चित्रे, महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती, राज्याभिषेक समयी असणारी चिन्हे, आग्र्याहून सुटकेचा आणि अफझल खान वधाचा थरार प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना अगदी आपण प्रत्यक्षदर्शीच आहोत असेच वाटते.

एकंदरीत चित्रे, शस्त्रे प्रतिकृती पाहता हे एखादे पारंपरिक वस्तुसंग्रहालय आहे का ? असे वाचकांस वाटेल परंतु ते तसे नाही. 

येथे आपण काही नुसते बघत नाही, तर प्रत्येक बाबीची काटेकोर माहिती, मावळे आणि रणरागिणी येथे पारंपारिक वेशभूषेत देत असतात. कोणाच्या काही शंका असतील तर त्या देखील येथे व्यवस्थित दूर केल्या जातात. 

शिवसृष्टीतील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे " दुर्गवैभव ". महाराजांच्या महत्वाच्या दुर्गांच्या प्रतिकृती येथे अगदी ऐसपैस उभारल्या आहेत. 

प्रत्येक दुर्ग आणि तेथील महत्वाचे प्रसंग यांचे वर्णन देखील तेथील सेवक मंडळी करत असतात, प्रोजेक्टरच्या सहाय्याने दुर्गावरील महत्वपूर्ण वास्तू त्या प्रतिकृती मध्ये स्पष्ट दाखवल्या जातात. एवढेच नव्हे तर काही घटनांची चलचित्रे देखील तिथेच स्वतंत्र अश्या भव्य पडद्यांवर पाहताना एक वेगळाच अनुभव येऊन जातो. 

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, " श्रीमंतयोगी " हे महाराजांचे हृदयगत सांगणारे एक अलौकिक सादरीकरण. या सदराद्वारे प्रत्यक्ष महाराजच आपल्याशी संवाद साधत आहेत असे वाटते. 

शिवसृष्टी मधील अद्ययावत तंत्रज्ञान, मांडणी, रचना हा भाग तर अलौकिक आहेच, परंतु तेथील काम करणारा कर्मचारी वर्ग ( हा शब्द संयुक्तिक वाटत नाही ) हा जणू शिवसेवक असल्याप्रमाणे, पोटतिडकीने प्रत्येक दुर्गाची, प्रसंगांची अगदी काटेकोर पणे माहिती देत असतात. आमच्या चिरंजीवाने सिंधुदुर्गाची माहिती ऐकल्यावर बालसुलभ प्रश्न विचारले पण जाधव नामक शिवसेवकाने त्याला अगदी जवळ घेऊन प्रेमाने उत्तरे दिली. मोठी अगत्यशील मंडळी आहेत ही. 

साक्षात इतिहासातच राहण्याचे भाग्य लाभलेली ही मंडळी सुद्धा शिवसृष्टी प्रमाणे अद्भुतच म्हणावी लागतील. 

पदमविभूषण शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांची भव्यदिव्य संकल्पना, अपार जिद्द आणि अजोड परिश्रम याचे फलित म्हणजेच ही शिवसृष्टी. वाहनांची वर्दळ, गोंगाट आणि धूळधाण असणाऱ्या कात्रज-आंबेगाव परिसरात असणारी सृष्टी खऱ्या अर्थाने आपणांस वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. 

एक असे विश्व जिथून कधीच बाहेर यावे वाटणार नाही, माझी अवस्था अशीच झाली होती. 

खरं तर या सगळ्या प्रवासामध्ये २-३ तास गेले होते, तहान भूक तर केंव्हाच हरली होती आणि तेथून बाहेर पडायचे मनच होत नव्हते. पण काळाच्या मर्यादा कोणाला चुकल्या आहेत त्यामुळे. हरपलेले भान सावरून जणूकाही दिव्यत्व्याचा साक्षात्कार झाल्याप्रमाणे नकळत त्या वास्तूला हात जोडले आणि  आस्ते कदम आस्ते कदम बाहेर आलो. 

पहिले दालन अनुभवल्यापासून ते अगदी बाहेर पडून बसे पर्यंत नकळत ओठावांवर समर्थ रामदास स्वामी रचित ओळी येत होत्या..... 


शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।  


--- श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments

Unknown said…
फार सुंदर व अतिशय अचुक वर्णन केलय तुम्ही 👍