स्वा. सावरकर : एक प्रतिभावंत.



 

नाशिक येथे संपन्न होत असणाऱ्या, ९४ व्या. अखिल भारतीय साहित्य संमेल्लनावरून बराच गोंधळ माजला आहे.

त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुद्धा होताना दिसतो आहे. अशी ही संमेल्लने खरे तर सारस्वतांची मांदियाळी ठरली पाहिजेत परंतु दुर्दैवाने ती राजकीय आखाडा बनताना दिसत आहेत.

स्वा. सावरकरांसारख्या साहित्यिकाच्या जन्मभूमी मध्ये हे संमेल्लन आयोजित होत असताना, संमेलनाचे गीत, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठ या पैकी कशातही सावरकरांना स्थान नसणे ही बाब खटकते आहे. काही सावरकर प्रेमी यासाठी निषेध, विनंती करून अशी मागणी करताना दिसत आहेत. 

पण इथे प्रश्न असा पडतो की; ही वेळच का यावी

स्वा. सावरकरांच्या अन्य बाबींप्रमाणे त्यांचे साहित्य देखील काहींना पोटशूळ उठवते आहे का ? ,

स्वा. सावरकरांचे साहित्य विश्वातील योगदान, आयोजक विसरले तर नाहीत ना ?

असे जर असेल, तर स्वा. सावरकरकरांची प्रतिभा कशी होती ? त्यांनी कोणकोणत्या साहित्य प्रकारात संपदा निर्माण केली होती ? याची पुन्हा एकदा तोंड ओळख करून देणे हे आवश्यकच आहे.

यासाठी अशा संमेल्लनामध्ये, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठ यांना स्वा. सावरकरांचे नाव देऊन थांबण्यापेक्षा, भाषेचे सौंदर्य कसे फुलवावे याची प्रचिती नव साहित्यिकांना यावी यासाठी, सावरकर साहित्याचे वाचन देखील अशा संमेलनातून झाले पाहिजे असेच मला वाटते.

 

हे मातृभूमि तुजला मन वाहियेले

वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले

तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला

लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll

 

 

असा भाव मनी ठेवून, हजारो पृष्ठांचे साहित्य निर्माण करणाऱ्या स्वा.सावरकरांच्या साहित्य संपदेवर आधारित हा लेख आम्ही वाचकांच्या हाती देत आहोत.

कोणतीही प्रतिभा ही निसर्गदत्त देणगी असते असे म्हटले जाते, काही अंशी ते खरं देखील आहे पण प्रतिभेचा अंश अंगी असून उपयोगाचे नाही तर प्रतिभेची साधना करून तिला सिद्ध करणे हे आवश्यक असते. जे जे प्रतिभासंपन्न आपल्याला प्राप्त प्रतिभेची साधना, आराधना करून त्यामध्ये अभिवृद्धी आणतात तेच अखेर प्रतिभावंत म्हणून नावारूपाला येतात. अश्या एका प्रतिभावान साहित्यिकाचे नांव म्हणजेच " स्वा. विनायक दामोदर सावरकर "

उपलब्ध माहिती नुसार वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी " श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग " हा फटका प्रथम लिहिला होता.

तसेच वयाच्या सत्तरीनंतर " सहा सोनेरी पाने " हा ग्रंथ लिहिला होता त्यामुळे सावरकरांमधील प्रतिभावंत हा निसर्गदत्त होता हे स्पष्ट आहे.

सावरकरांच्या साहित्याची, साहित्यिक म्हणून चिकीत्सा करण्याची आमची प्राज्ञा आणि प्रज्ञा नाही, त्यामुळे सावरकर साहित्य वाचताना आम्हाला जाणवलेल्या बाबी आम्ही वाचकांपुढे मांडत आहोत.

सावरकरांनी बहुतेक साहित्य प्रकारांमधून लेखन केलेले आहे, इतिहासकार, ग्रंथकार, विशेष लेखमाला, निबंधमाला, कविता, लावणी, फटका, उर्दू गझल, पोवाडे, मेळ्यांसाठी गीते, भावगीते, देशभक्तीपर गीते, नाटककार, वृत्तपत्रीय लेखन हे आणि असेच अनेक प्रकारचे लेखन त्यांच्या साहित्यामध्ये समाविष्ट होते. भाषाशुद्धीची मोहीम हाती घेतल्यानंतर, इंग्रजी फारसी, उर्दू शब्दांना शेकडो पर्यायी मराठी शब्द सावरकरांनी दिले आहेत.

खरं तर त्यांनी दिलेले अनेक शब्द आज मराठीमध्ये इतके मिसळून गेले आहेत की; आपल्याला माहीतच नाही की हे शब्द गेल्या ७०-८० वर्षांमध्ये मराठी भाषेत रुळले आहेत. उदा. महापौर, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, दिनांक, हुतात्मा, चित्रपट, बोलपट, टंकलेखन (टायपिंग), विधिमंडळ, दिग्दर्शक, वगैरे....  अजूनही असे अनेक शब्द आहेत जे आपण सहसा वापरत नाही पण सावरकरांनी सुचवले होते.

सावरकरांनी साहित्यिक व्हायचे म्हणून साहित्याची निर्मिती केली, असे आम्हांस वाटत नाही.

कारण एखादा कवी किंवा कोणताही प्रतिभावंत जेंव्हा साहित्यनिर्मिती करतो तेंव्हा त्याला आपल्या कल्पनाशक्तीचे वारू मुक्तिपणे चौफेर उधळू द्यायची मुभा असते. पण सावरकरांची साहित्य निर्मिती ही मुख्यत्वे करून रंजनासाठी नव्हती तर समाजातील अज्ञान, गैरसमज, अंधानुकरण यांच्या भंजनांसाठी होती. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये कपोल कल्पित रंजक कहाण्या नाहीत तर, ऐतिहासिक संदर्भ, समाजाची वर्तमानातील स्थिती, भविष्याची गरज या साऱ्याचे सार मांडलेले दिसते.

सावरकरांच्या कवितांचा विचार करता, सुमारे ९० कवितांमध्ये छंद, वृत्त, वृत्तजाती यांचा वैविध्यपूर्ण उपयोग केलेला आढळतो, त्यातील वैनायक वृत्त हे सावरकरांनी स्वतः रचले होते असे म्हटले जाते परंतु आमच्याकडे त्याबद्दलचा स्पष्ट संदर्भ नाही.

माझ्या आठवणी ( भाग ), शत्रूच्या शिबिरात, माझी जन्मठेप आदी आत्मचरित्रे, जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकाच्या चरित्राचे भाषांतर आदी चरित्रात्मक साहित्य, मोपल्यांचे बंड, काळे पाणी आदी कादंबऱ्या, १८५७ चे स्वतंत्र समर (या ग्रंथावर प्रकाशनापूर्वीच बंदी अली होती) , हिंदुपदपातशाही, सहा सोनेरी पाने आदी ऐतिहासिक ग्रंथ, गरमागरम चिवडा, गांधी गोंधळ आदी तत्कालीन राजकारण, समाजकारण यांचे समालोचन करणारे काहीसे व्यंगोक्तिपूर्ण लेख, अंधश्रद्धा निर्मूलन कथा, विज्ञाननिष्ठ निबंध आदी प्रबोधनात्मक लेखमाला, सन्यस्त खङग, बोधिवृक्ष, :शाप, उत्तरक्रिया आदी संगीत नाटके.

हे आणि अन्य अनेक विविध विषयांना स्पर्श करणारे, त्यांचा उहापोह करणारे आणि सुमारे ४० ग्रंथ निर्माण होतील इतके विस्तृत साहित्य निर्माण करणारे सावरकर साहित्यसम्राटच वाटतात.

सावरकरांनी आपल्या साहित्याचा, प्रतिभेचा वापर हा काही अर्थाजनासाठी केला नव्हता, त्यांचे साहित्य हे त्यांच्या चळवळीचाच एक भाग म्हणावा लागेल, कारण आपल्या चळवळीचे विचार जन्मांसापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्या करता साहित्य निर्मिती करावीच लागते हे सावरकरांनी पूर्णपणे ओळखले होते.

सावरकरांचे सर्व साहित्य आज वैद्युत (इलेक्ट्रॉनिक) स्वरूपात उपलब्ध आहे. वाचकांनी त्यांचे अध्ययन आवश्य करावे.

जर कोणी चांगले लिहू इच्छित असेल तर त्याला आधी चांगले वाचावे लागेल, जर कोणाला एखादी चळवळ उभी करायची असेल तर त्याला उत्तम विचारधन हवेच हवे. असे विचारधन जसे अनुभावातून मिळते तसेच ते ग्रंथाटन केल्याने म्हणजेच वाचनातून देखील मिळते असे आमचे मत आहे.

जाता जाता, ग्रंथाटन विषयी एवढेच सांगू इच्छितो की;

चळवळीचे साधन, ते एक विचारधन

सदा पावती कार्यप्रवण, केल्याने ग्रंथाटन ।।



Comments