सहजीवनाची ९ वर्षे .....

 


आज आमच्या लग्नाचा ९ वा वाढदिवस म्हणजे सहजीवनाची, सहवेदनेच्या दशकाकडे वाटचाल सुरु झाली. खरं तर ही ९ वर्षे कधी सरली हे अजूनही कळतच नाही. [ कशी सरली हे पत्नीच्या लक्षांत आहे बरं का ]

सर्वसाधारण जोडप्यामध्ये असणारे बंध (आणि बंधनसुद्धा) आमच्यामध्येही आहेत. ९ वर्षांचा स्मृतिगंध देखील आहे.

अनेक अडचणी, पराजय, विजय, संघर्ष हे सारे आम्ही एकत्र राहूनच पाहिले, अजूनही पाहतच आहोत.

आनंदाचे क्षण देखील भरभरून जगलो आहोत, अजूनही जगतो आहोत.

अनेकदा अनेक गोष्टींतून बाहेर येण्याकरता, पुढे जाण्याकरता माझ्या पत्नीने निश्चित साथ दिली आहे

पण तरीही मी म्हणेन की, माझ्या यशामागे मागे माझी पत्नी नाही .......

हो ! कारण ती प्रत्येक बाबतीत माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी जे काही मिळवले असेल (यश / अपयश)  त्यात तीला बरोबरीचे स्थान आहे.

प्रत्येक मनुष्याचे आयुष्य हे खऱ्या अर्थाने त्याचा संसार सुरु झाल्यावरच होते असे मला वाटते, पण संसार या शब्दाचा अर्थ नेमका काय असतो हे त्यात पडल्याशिवाय कळत नाही.

संसार ..... यातलं 

" सं " जे आहे ते संवादासाठी,

"सा" सामंजस्यासाठी, तर 

" र " रक्षणासाठी आहे.

याची अनुभूती माझ्या पत्नीसोबतच मी घेतली.

पत्नी खरंच कशी असते ? ती कधी गौरी सारखी अल्लड असते,  ती कधी अनुमिता असते तर  कधी सरस्वती सारखी ज्ञानदायीनी असते, कधी प्रीतीचा वर्षाव करणारी देवयानी असते तर कधी साक्षात दुर्गा असते. अशी अनेक रूपं गेल्या ९ वर्षांत पत्नीची पहिली....

प्रेम विवाहा पेक्षा, विवाहितांचे प्रेम हे अधिक उत्कट असते याची प्रचिती मी माझ्या पत्नीसमवेत घेतली. सप्तपदीची ती सात पावले कधी साथपदी  ठरते तर कधी ही सप्तपदी; तप्तपदी ठरते .....

एकंदरीतच काय ? काय संवेदने पेक्षा सहवेदनाच जास्त महत्वाची असते .....

आज खरं तर ९ वर्षे पूर्ण होतायत पण अजूनही आत्ताच तर कुठे सुरुवात झालीये असे वाटतेय ....

हा प्रवास असाच निरंतर चालू राहो आणि तिची नी माझी शादीवाली लव्ह स्टोरी फुलत राहो हीच श्रीराम चरणी इच्छा !  

सखी राज्ञी जयतु !

फक्त मयुरीचाच " श्री " (बाकीच्यांचा श्रीपाद श्रीकांत रामदासी )


Comments

Kaustubh said…
खूप छान लेख. ' तीला बरोबरीचे स्थान आहे' हे वाक्य मला आवडले. तसेच सं सा र या शब्दाचा अर्थ खरंच अर्थपूर्ण आहे.

तुम्हाला दोघांना पुढच्या वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची शादी वाली love story अशीच फुलत राहो.