सावरकर एक दीपस्तंभ : भाग ५ वा.
गांधी हत्या
अभियोगातून निर्दोष आणि निष्कलंक मुक्तता झाल्यावर सावरकर प्रकृती स्वाथ्यासाठी
बंगलोरला काहीदिवस राहून आले. तदनंतर त्यांनी पुन्हा कार्यास आरंभ केला पण पुढच्या
काही महिन्यातच, १९ ऑक्टो १९४९
रोजी, नारायण
सावरकरांचा मृत्यू झाला. हा प्रसंग सावरकरांच्या मनाला चटका लावणारा
होता;
" तुम्ही आम्ही सकल
हिंदू बंधू बंधू " असा बंधुत्वाचा संदेश समाजाला देणाऱ्या सावरकरांच्या
बंधूला, मात्र
समाजकंटकांनी ठेचून ठेचून मारले. सावरकरांचे दोन्हीही बंधू कालवश झाले होते
सावरकरांचे मन त्यावेळेस विच्छिन्न झाले होते परंतु समाजाचे दुःख संपवण्यासाठी जगणाऱ्या
महापुरुषांना स्वतः ची वैयक्तिक सुखेच नव्हे तर दुःखेदेखील बाजूला सारूनच मार्ग
क्रमावा लागतो.
सावरकरांच्या
अंदमान सुटकेसाठी जर कोणी जीवाचा आटापिटा केला असेल तर तो नारायणरावांनीच.
बाबाराव-तात्याराव यांच्या प्रमाणेच नारायणरावांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान
हे अमूल्यच आहे परंतु कालानुरूप आज नारायणरावांची विस्मृती झालेली दिसते.
गांधीहत्या
अभियोगातून मुक्तता होऊन अवघे वर्षदेखील उलटले नव्हते तोच सावरकरांना पुन्हा अटक
करण्यात आली.
बंगाल प्रश्न
सोडवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकतअली एप्रिल १९५० मध्ये दिल्लीत येणार
होते, त्याचवेळी सावरकर
हिंदुमहासभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीमार्गे रोहटक येथे जाणार होते, बस्स एवढेच कारण घडले आणि ४ एप्रिल १९५० रोजी
सावरकरांना प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झाली.
भारतियांच्या
रक्ताची हाव असणाऱ्या शत्रूराष्ट्राचा प्रतिनिधी येणार म्हणून, भारतमातेसाठी अनन्वित छळ सोसणाऱ्या
राष्ट्रभक्ताला जेरबंद करणे याला कसला राजधर्म म्हणावा तेच समजत नाही.
पुन्हा एका
नाट्याची रचना करण्यात आली, थोड्याफार फरकाने
कथा-पात्रे तीच फक्त काहीसे कलाकार बदलले गेले, गांधीहत्या अभियोगावेळी लाल-किल्ल्याचा रंगमंच
वापरण्यात आला होता तर तर या वेळेस बेळगाव पण अखेर निकाल तोच आला, परंतु यावेळेस सावरकरांवर राजकारणात भाग न
घेण्याची अट लादण्यात आली. स्वतंत्र
हिंदुस्थान मध्ये हिंदुत्ववाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली ही पहिली
गदा.
सावरकरांचा मुलगा
विश्वास यांच्या प्रयत्नाने आणि लोकदबावापुढे झुकत सावरकरांवरील बंधने जुलै १९५१
रोजी हटवण्यात आली. या बंधमुक्ततेनंतर काही महिन्यातच देशभरात पहिल्या सार्वत्रिक
निवडणुकांचे वारे वाहू लागले, श्यामाप्रसाद
मुखर्जींनी ' जनसंघाची '
(आताचे भा.ज. पा. ) स्थापना केली.
सावरकरांनी
तेंव्हाच श्यामाप्रसाद मुखर्जींना सांगितले की जनसंघाने जर आपले हिंदुत्व टिकवले
तर त्यांची हिंदुमहासभा होईल अन्यथा मुस्लीम अनुनय केला तर त्यांची काँग्रेस
होण्यास विलंब लागणार नाही.
हिंदुमहासभा आणि
जनसंघ स्वतंत्रपणे लढले, हिंदुमतांचे
विभाजन झाले, जनसंघ ३, शे. का. फे. (डॉ. आंबेडकरांचा पक्ष) १, हिंदुमहासभा १९ अश्या जागांवर निवडून आले,
आंबेडकर स्वतः मात्र
पराभूत झाले. सावरकरांवरच्या निर्बंधामुळे सावरकर मात्र निवडणूक लढवू शकले नाहीत.
एव्हाना सावरकर
सत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते, अंदमानातील मरणासन्न यातना,
त्यांनी भोगलेले
शाररिक कष्ट, मानसीक आघात,
अविरत केलेले कार्य
यांमुळे त्यांची प्रकृती खंगत चालली होती.
आजन्म लक्षावधी
भारतीयांना ऊर्जेचा स्रोत ठरलेला हा तेजोनिधी त्यावयातही मनाने अजून तरुणच होता,
१९५३ ते १९६० या सात
वर्षांमध्ये सावरकरांनी देशभर दौरे केले, भाषणे दिली, अगणित लेख लिहिले.
१९६० साल म्हणजे
सावरकरांच्या जन्मठेप संपण्याचे वर्ष, सावरकरांना १९१० साली शिक्षा ठोठावण्यात आली होती त्यानुसार
जर सावरकर शिक्षा भोगत असते तर ते १९६० साली मुक्त झाले असते.
परंतु मृत्यूशी
झुंझ देऊन हा ' मृत्युंजय '
त्यापूर्वीच मुक्त झाला
होता. म्हणूनच त्यांच्या मुक्ततेचा दिवस २४ डिसें. १९६० हा मृत्युंजय दिन म्हणून
साजरा करण्यात आला. सावरकरांनी अंदमानातील शिक्षेच्या पहिल्या दिवशी केलेले भाकीत
अखेर सत्य ठरले, सावरकर
शिक्षेनंतर ५० वर्षे जिवंत राहीले पण इंग्रज मात्र देशासोडून गेले.
सावरकरांच्या ८०
व्या वाढदिवसानिमित्त (१९६३) , मुंबईमध्ये ' सावरकर-सप्ताह ' साजरा करण्यात आला, या सप्ताहात आदरणीय श्री. गोळवलकर गुरुजींचे
व्याख्यान झाले. साऱ्या देशभर सावरकरांचे वाढदिवस उत्साहात साजरे होत होते
परंतु स्वतः सावरकर मात्र रुग्णशय्येवर होते, त्यांच्या मांडीचे हाड मोडले होते.
१६ ऑगस्ट १९६३
रोजी सावरकरांच्या सौभाग्यवती ' माई सावरकरांनी ' इहलोकाची यात्रा संपवली, नाशिक पासून सावरकरांच्या सुखदुःखाची चालती
बोलती साक्षीदार,
सावरकरांची सावली आज
हरपली होती. आता मात्र सावरकर पूर्णपणे खचले, त्यांच्या बरोबरीचे जिवा-भावाचे असे कोणीच उरले
नव्हते; वय देखील ८० च्या
घरात गेले होते एका अर्थाने सावरकरांच्या आयुष्याची संध्याकाळ हळूहळू रात्रीकडे
सरकत होती.
वयाच्या १४ व्या
वर्षी घेतलेलया शपथेनंतर आयुष्यातला क्षण न क्षण सावरकरांनी या मातृभूमीकरताच खर्च
केला होता, त्यांच्याच
म्हणण्यानुसार त्यांनी केवळ मुलाबाळांची वीण न वाढवता यथार्थ संसार केला होता.
सावरकरांनी
सरकारला अनेक वेळा अनेक सूचना केल्या पण सरकारने त्या जाणीव पूर्वक दुर्लक्षित
केल्या परंतु १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर सावरकरांनी सांगितलेले सैनिकीकरणाचे
महत्व समजले. १९६५ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले परंतु तात्कालीन संरक्षण
मंत्री यशवंत चव्हाणांनी घोषणा केली कि,
" चढाईचा पवित्रा
घेऊन लाहोरमध्ये घुसा. " '
आक्रमण हेच संरक्षण ' हेच सावरकर त्यापूर्वी ३० वर्षांपासून सांगत आले होते,
सरकारने त्याचा अवलंब
१९६५ मध्ये केला आणि पाकिस्तानचे कंबरडे मोडले.
पण दुर्दैवाने '
ताशकंद करार ' करून लाल बहाद्दूर शास्त्रींनी भारताने
जिंकलेला प्रदेश पाकिस्तानला परत दिला. सैनिकांच्या रक्ताने मिळवलेला प्रदेश
शाईच्या फटकऱ्याने गमावला गेला, शास्त्रींचेही
तिथेच निधन झाले.
१९६६ साल,
आता मात्र सावरकर जीर्ण
झाले होते, एका अर्थाने
सावरकरांच्या जीवित कार्याची परिपूर्णता झाली होती. खंडित का असेना पण देश
स्वतंत्र झाला होता, सैनिकीकरणाचे मोल
राष्ट्रांस समजले होते, मुळातच निर्मोही
असणारे सावरकर, तृप्त झाले होते.
त्यांचे अंतःकरण
धन्योहं धन्योहं असाच हुंकार देत होते, जीवित कार्याची परिपूर्णता झाल्यावर, मृत्यू न येणे ही सामान्यांची शोकांतिका,
पण महापुरुषांचे तसे
नसते.
मृत्यू, सावरकरांची पाठराखण सततच करत होता पण
त्यांच्यावर झडप घालण्याचे धैर्य त्याच्यातही नव्हते.
अखेर सावरकरांनीच
३ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रायोपवेशनास आरंभ केला.
अन्न - पाणी -
औषधे या सर्वांचाच सावरकरांनी त्याग केला, तरीही २२ दिवस मृत्यू सावरकर सदनात घुटमळतच राहिला, सावरकरांना घेऊन जाणे मृत्यूलाही कष्टप्रद वाटत
होते, मग सावरकरांनीच
२६ फेब्रुवारी १९६६ रोजी सकाळी १० वाजता, मृत्यूला आपल्या
जवळ ओढले आणि स्वतःला त्याच्या बाहुपाशात ढकलून दिले, सावरकर अनंतात विलीन झाले.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक धगधगते क्रांतिपर्व शांत झाले.
सावरकरांनी
जन्मभर सैनिकीकरणाचा पुरस्कार केला, सशस्त्र क्रान्तीचा उद्घोष केला, जन्मभर केवळ शस्त्रांचेच पूजन केले अश्या
वीराची अंत्ययात्रा रणगाड्यावरून निघावी अशी बऱ्याच जणांची ईच्छा होती, पण सरंक्षण मंत्रालयाने रणगाडा देण्यास नकार
दिला.
रणगाड्याची हि
उणीव प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व्ही.
शांताराम यांनी भरून काढली, त्यांनी रातोरात
आपल्या नीलकमल स्टुडिओमध्ये रणगाड्याची प्रतिकृती तयार केली, त्यांवरूनच सावरकरांची अंतयात्रा निघाली. दादर
ते चंदनवाडी अशी दहा किलोमीटर हि अंतयात्रा चालली होती, चौका-चौकातून
हजारो लोक अंत यात्रेत सामील होत होते.
मुंबई सेंट्रल
जवळ रा. स्व. संघाच्या १५०० स्वयंसेवकांनी सावरकरांना घोषासह मानवंदना दिली.
अखेर विद्युत
दाहिनीचे दार उघडण्यात आले ट्रॉलीवर ' मृत्युंजयाचे ' कलेवर ठेवण्यात आले; उपस्थितांना सावरकरांचे हे अखेरचे दर्शन होते
ज्यांची केवळ एक झलक पाहायला मिळावी या साठी लोक तासनतास रस्त्यावर उभे राहत अश्या,
महानेत्याचे एका
महामानवाचे हे अगदी अंतिम दर्शन होते. अखेर कळ दाबली गेली आणि एक धगधगता
अग्निकल्लोळ अग्निकुंडात विलीन झाला.
सावरकरांच्या
अंतयात्रेत एकही मंत्री उपस्थित नव्हता, सावरकर हे एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते,
स्वातंत्र्य संग्रामातील
एक जनमान्य नेते होते, अग्रणी
क्रान्तिकारी होते याचाही विसर त्यावेळेसच्या सरकारला पडला होता, राजकीय शिष्टाचार म्हणून तरी राजकीय
प्रतिनिधींनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण याप्रसंगी देखील काँग्रेसने द्वेषाचेच
राजकारण केले.
सावरकरांनी
राजकीय विरोधास कधीच वैयक्तिक पातळीवर आणले नाही. जेंव्हा एका मुसलमानाने जीनांवर
हल्ला केला तेंव्हा सावरकरांनी त्याचा निषेध केला होता. कस्तुरबा गांधींचे निधन
झाले तेंव्हा सावरकरांनी शोक व्यक्त केला होता.
सरदार वल्लभभाई
पटेलांचा विमान अपघात झाला तेंव्हा सावरकरांनी त्यांची आस्थेने चौकशी केली होती.
सावरकरांनी
प्रत्येकवेळी राजकीय विरोध हे राजकीय आणि वैचारिकच पातळीवरच ठेवले होते.
पण निर्भसना आणि
निर्लज्जपणाचा कळस गाठलेल्या काँग्रेसने आजन्म सावरकरांची अवहेलना अवहेलना आणि
केवळ अवहेलनाच केली.
सावरकरांना
हिंदुस्थानच्या जनतेने अतोनात प्रेम दिले, परंतु त्यांच्या पश्चात १००% सावरकर अंगीकारण्याची हिम्मत मात्र
कोणातही झाली नाही. सावरकरांचा १००% अनुनय
ही मोठी अवघड बाब आहे, म्हणूनच
वेगवेगळ्या विचारधारेतील, संघटनांतील
लोकांनी आपल्याला उपयुक्त आणि पचू शकतीलअसेच सावरकर स्वीकारले, आणि ज्यामुळे स्वतःच्या प्रतिमेला धक्का पोहोचू
शकेल अशी सावरकरी तत्वेच गैर ठरवली.
शस्त्राचाराचा
पुरस्कार केला म्हणून अहिंसावाद्यांनी सावरकरांना धिक्कारले, हिंदूंचा पक्ष घेतना कणखर भूमिका घेतली,
म्हणून मुस्लिम समाजाने
सावरकरांना नाकारले, विज्ञाननिष्ठतेचे
धडे शिकवताना भाबड्या धर्मसंकल्पना, अनावश्यक कर्मकांडे, अंधश्रद्धा यांच्यावर सडेतोड टीका केली म्हणून कर्मठांनी सावरकरांना नाकारले.
सावरकर एकदा
म्हणाले होते की, " सुधारक अगदी
क्रांतीकारक जरी असला तरी त्याला तिरस्काराच प्राप्त होतो " असे अनेक तिरस्कार पचवूनच सावरकर आपले कार्य
करत राहिले होते, पण सावरकरांच्या विचारातला
हिंदुस्थान कोणीही नीट समजून घेतलाच नाही.
सावरकरांनी
सांगितलेले हिंदुत्व हे कर्मकांडे, धर्मतत्वे यांपासून अगदीच स्वतंत्र आहे, सावरकरांना अपेक्षीत हिंदुत्व हे आधुनिकते कडे
जाणारे आहे, हिंदुपरिजनांच्या
स्वयंपूर्णतेकडे जाणारे आहे, हिंदुपरिजनांना, शक्तिमान, गतिमान, तेजोमय आणि कीर्तिमान करणारे आहे.
खरेतर सावरकर
त्यांची तत्वे समजून देण्यासाठी कधीच कमी पडले नाहीत, कमी पडलो ते आपण सामान्य जनता आणि म्हणूनच आजही
सावरकरांवर अनावश्यक टीका, चिखल फेक होते
आहे, त्यांची अवहेलना
होते आहे.
सावरकरांचे कार्य
अभ्यासताना, चरित्र वाचताना,
लिहिताना आज त्यांची
होणारी अवहेलना, निंदा नालस्ती
पाहून मन विच्छिन्न होते. सावरकरी तत्वांची होणारी विटंबना पाहून अंतःकरण पिळवटून
जातं,
मनोमंदिराच्या
गाभाऱ्यातून असह्य वेदनांचे हुंकार उठतात, ते हुंकार शब्दांचे रूप घेतात आणि फिरून तात्याराव सावरकरांनाच सवाल करतात ....
" तात्या, तात्या… कशासाठी केलेत
हे ?
कोणासाठी मरण यातना भोगल्यात ?
बॅरिस्टरीची आयती मिळणारी पदवी आणि ऐश्वर्य सोडून,
क्रांतिकारकांची सुळावरची पोळी का निवडलीत ?
स्वतः शिळे टाकाऊ अन्न खाऊन,
आम्हाला सोन्याचा घास का दिलात ?
आज तुम्हाला जर जातीच्या चौकटीमध्ये बसवले जाते
तर,
जाती भेदाच्या भिंती तोडण्यासाठी डोकेफोड का
केलीत ? "
वैचारिक विरोधाला, वैयक्तिक द्वेषाचे कधीच रूप येऊ दिले नाहीत,
तरीही तुमची मात्र सर्रास अवहेलना आणि कुचेष्टाच होताना का दिसते ?
अर्थात या साऱ्या
प्रश्नांची उत्तरे देण्याकरता आज स्वतः सावरकर हयात नाहीत.
पण जर भाबडे भक्त
त्यांना पुन्हा जन्माला या ! असे म्हणणार असतील तर आमचे एवढेच म्हणणे असेल की;
" तात्याराव, परकीय घाबरले
तुमच्या अस्तित्वाला पण स्वकीय घाबरले तुमच्या सावलीला.
जमलेच तर आम्हाला माफ करा ! आणि तुमची तत्वे, कार्यप्रणाली न
समजू शकणाऱ्या,
पण तरीही तुमच्यावर चिखलफेक करणाऱ्या या देशात
पुन्हा जन्म घेऊ नका ...."
आम्हाला माफ करा
तात्याराव, आम्हाला माफ करा !!!
संदर्भ :
१) वीर सावरकर -
धनंजय किर
२) ५५ कोटींचे
बळी - गोपाळ गोडसे
३) सावरकर एक
धगधगते अग्निकुंड - वा. ना. उत्पात
४) The
Murder of the Mahatma - G. D. खोसला
Comments