महालेखक : डॉ.धनंजय कीर


डॉ.धनंजय कीर

चांगले चरित्र जगणे हे जसे कठीण असते तसेच थोर पुरुषांची चरित्रे उत्तमरीतीने लिहिणे हे देखील मोठे जिकिरीचे आणि जबाबदारीचे कार्य असते. या दोनही गोष्टी ज्या काही थोड्याफार भारतीय चरित्रकारांनी जपल्या आहेत त्यातील एक अग्रणी म्हणजे डॉ.धनंजय कीर.

रत्नागिरीच्या खडपे वाठारांत २३ एप्रिल १९१३ रोजी, धनंजय कीर यांचा जन्म वडील विठ्ठल आणि आई देवकी यांच्या पोटी झाला. धनंजय कीर हे रत्नागिरीच्या दक्षिणेस तीन -साडेतीन किलोमीटरवर असणाऱ्या जुवे बेटावरील श्रीमंत अश्या गोविंद कीर यांच्या भंडारी कुळात त्यांचा जन्मलेले. गोविंद कीर हे त्यांचे पणजोबा होत. धनंजय कीर जरी श्रीमंत कुटुंबात जन्मले असले तरी स्थलकाल परत्वे त्यांच्यापिढीपर्यंत ही श्रीमंती टिकली नाही.

त्यांचे वडील सुतारकाम व ड्रॉईंग ची कामे करत असत. त्यांना सगळे कीर मिस्त्री असे म्हणत असत.
वयाच्या सहाव्या वर्षी धनंजय कीर हे देखील चित्रशाळेमध्ये, ड्रॉईंग आणि सुतारकाम करण्यासाठी जात असत. कीरांच्या लहानपणी घरची परिस्थिती बेताचीच असे परंतु तशाही परिस्थिती ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 

खरे तर कीरांचा आणि शालेय किंवा क्रमिक शिक्षणाचा या नंतर फारसा संबंध आला नाही. पण याच काळात त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा ध्यास लागला. याकरता ते जेंव्हा एखादे इंग्रजी पुस्तक, वृत्तपत्र, मासिक वाचत त्यातील आवडलेली वाक्य एका वहीमध्ये टिपून ठेवत असत.  शब्दसंचयाचा यापेक्षा सोप्पा मार्ग नाही असे त्यांचे मत होते.

स्वतःला उत्तम इंग्रजी बोलता तसेच लिहिता आले पाहिजे हा त्यांचा हट्टच होता, त्यामुळे त्यांनी अफाट वाचन केले होते. वाचनालये, अभ्यासिका त्याचप्रमाणे आपल्या मित्रपरिवाराकडून ग्रंथ मिळवून तासंतास ते त्याचे वाचन करीत असत. कधी रेल्वेचे डबे, कधी बाग तर कधी रात्री अपरात्री उठून स्वतःच्या खोलीत असे त्यांचे वाचन नेहमीच चालत असे. यामध्ये बहुतांशी चरित्रे आणि ऐतिहासिक ग्रंथच असत.

अर्थार्जनासाठी महापालिकेच्या विविध भागात कारकून म्हणून नोकरी करत असताना १९४३ साली त्यांच्यातील लेखक खऱ्या अर्थाने उदयास आला.  १० मार्च १९४३ रोजी बेझवाडा येथील "गोष्टी" मध्ये त्यांनी सावरकरांवर इंग्रजीमध्ये लिहिलेल्या लेखाने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली होती, त्या लेखाचा शेवट करताना त्यांनी लिहिले होते; ......
शूर लोक कार्य करतात तेंव्हा त्यांचे समकालीन झोपलेले असतात
ते धाडस करतात तेंव्हा समकालीन पळतात
ते राष्ट्र मजबूत स्तंभावर उभारतात;
आणि ते आकाशात वर चढवितात ;

यानंतर त्यांनी लेखांचा धडाका लावला होता, हरबिंजर, संडे टाईम्स, फ्री हिंदुस्थान अश्या बाहेरील पत्रांमधून त्यांनी लेख लिहिले होते, खरे तर स्थानिक पत्रके असताना बाहेरील पत्रांमधून लेखन का केले असावे असा प्रश्न पडणे साहजिक आहे, परंतु वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि कीरांचे लेखन हे, सावरकरांवरचे होते आणि ते काँग्रेसी पुढाऱ्यांचे वर्चस्व असणाऱ्या मुंबई नगरपालिकेत एक साधे कारकून होते त्यामुळे, त्यांचे लेखन जर वरिष्ठांच्या हाती लागले असते तर सावरकर द्वेषापायी त्या पुढाऱ्यांनी कीरांची काय अवस्था केली असती याचा वाचक अंदाज लावू शकतील. 

त्याकाळी राजकीय टीकाटिप्पणीं करताना वर्तमानपत्रे, नियतकालिके यांच्या माध्यमातून लेख लिहिण्याचा प्रघात होता. त्यामुळे इंग्रज आणि काँग्रेसी वर्तमानपत्रे, नियतकालिके बऱ्याचदा सावरकरांवर टिका करत असत तेंव्हा त्यांच्या लेखांना टोपण नावाने कीर उत्तर देत असत. नांव प्रसिद्ध न करण्यामागचे कारण वर सांगितले आहेच.

खरे तर धनंजय कीर हे काही सावरकरांचे किंवा हिंदू महासभेचे कट्टर अनुयायी नव्हते, त्यांना सावरकरांविषयी आदर निश्चितच होता त्याच प्रमाणे ते सावरकरवादाचे समर्थक देखील होते पण म्हणून ते काही सावरकरांचे अंधभक्त किंवा चेले नव्हते. अर्थात याची प्रचिती त्यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्रातून निश्चितच येते. आजही त्या चरित्रांमधील काही लेखनावर सावरकरवादी नाराज असलेले आम्ही पहिले आहेत. तसेच त्या मजकुराचा सोयीप्रमाणे भलताच अर्थ लावून सावरकरांना बदनाम करू पाहणारी सावरकरद्वेषाची कावीळ झालेली मंडळीही दिसत आहेत. समर्थक आणि विरोधक या दोघांनाही संदर्भ पुरवणारा ग्रंथ आणि ग्रंथलेखक हा एककलली किंवा एखाद्याचा अंधभक्त असू शकेल का ? याचा वाचकांनी साकल्याने विचार करावा.

धनंजय कीरांनी जेंव्हा इंग्रजीमध्ये सावरकर चरित्र लिहिण्याचा मानस खुद्द सावरकरांना सांगितलं तेंव्हा सावरकर म्हणाले;
" इंग्रजीमध्ये लेखन तुम्ही चांगल्यापद्धतीने करू शकाल यात मला शंका नाही, परंतु मी गुणांचं पुतळा आहे, असे सहसा लिहू नका त्यामुळे पुस्तकाचे वजन व शोभा जाते व ते भक्ताने लिहिलेले गुरुचरित्र वाटते." 

 अर्थात कीरांनी लिहिलेले कोणत्याही राष्ट्रपुरुषाचे चरित्र हे सहसा अंधभक्तीने किंवा द्वेषभावनेतून लिहिलेले नाही.

कीरांनी सावरकर चरित्र लिहून पूर्ण केले आणि त्याच दरम्यान गांधी हत्या झाली, सावरकरांना अटक झाली हे सर्वश्रुतच आहे. पण केवळ सावरकरांवर लेखन करतात म्हणून कीरांच्या घरावरही हल्ला करण्याची तयारी झाली होती. पण सुदैवाने त्यांच्याच चाळीतील लाडू महार या व्यक्तीने कीरांना संरक्षण दिले होते म्हणून अनर्थ टळला. मागे म्हटल्याप्रमाणे कीरांचा आणि सावरकरांच्या राजकीय चळवळीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता परंतु इतरांप्रमाणे त्यांनाही अश्या संकटातून जावे लागले.  असे असूनही अखेर त्यांनी हे चरित्र छापायचे ठरवले.
त्यांचा हा मनोदय जेंव्हा एका पुस्तकविक्रेत्याला समजला तेंव्हा ते म्हणाले;

 "हे धाडसाचं आहे, सर्व घरादाराला आग लावा आणि मग पुस्तक छापा." 

अर्थात ही सूचना केवळ काळजीतून केलेली होती, पुढे याच विक्रेत्याने पाच प्रति नोंदविल्या. 
अनेक संकटातून जाऊन अखेर २८ मे १९५० रोजी सावरकर चरित्र प्रसिद्ध झाले. धनंजय कीरांचे हे पहिलेच वाङ्मयीन अपत्य अनेक संकटातून सुखरूप सुटले आणि अवघे अवकाशव्याप्त करत सूर्याप्रमाणे तेजाळले.

सावरकर चरित्रानंतर कीरांनी डॉ.आंबेडकर यांचे चरित्र लिहिण्याचा संकल्प जाहीर केला. आपल्या या संकल्पबद्दल सांगताना ते लिहितात,
" सावरकर चरित्र लिहिताना मला एक गोष्ट जाणवली की; सावरकर हे मानवी मूल्यांसाठी झगडले, अस्पृश्यांची अस्पृश्यता गेली पाहिजे हे त्यांचे ध्येय होते. या तऱ्हेच्या मूल्यांसाठी झटणारे अन्य पुढारी कोण आहेत हे मला सावरकर चरित्रातच समजले त्यामुळे आपोआपच डॉ. आंबेडकरांचे नाव माझ्यापुढे आले. "

अर्थात हे असे असले तरी सावरकर, आंबेडकर आणि गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यातील फरक देखील कीरांना निश्चितच ठाऊक होता. त्यासंदर्भात अन्य एखाद्या लेखामध्ये आम्ही माहिती देऊ.

कीरांनी डॉ. आंबेडकर चरित्र इंग्रजीमधून लिहिण्याचे ठरविले आणि योगायोगाने डॉ. आंबेडकरांचे सहकारी, अनुयायी असणाऱ्या चांगदेवराव खैरमोडे यांनी मराठीतून चरित्र लिहिण्याचे ठरविले. यासंदर्भात त्यांच्यात पत्रव्यवहार झाला होता आणि एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. त्याप्रमाणे या दोनही चरित्रकारांनी एकमेकांप्रती आदरभाव आपापल्या चरित्रग्रंथातून व्यक्त केलेला दिसतो.

धनंजय कीरांनी डॉ आंबेडकरांचे चरित्र लिहिण्याकरता अनेक प्रकारे साहित्य जमवाजमव केली, आंबेडकरांचे ग्रंथ, भाषणे, लेख आणि मुलाखती यांचा बारकाईने अभ्यास केला. डॉ. आंबेडकरांच्या अनेक सहकाऱ्यांना, विरोधकांना ते भेटले. काहींनी प्रारंभी माहिती देण्यास नकार दिला तर काहींनी टाळाटाळ केली. पण कीरांची जिद्द, पाठपुरावा आणि विशेष म्हणजे चरित्रलेखनाची तळमळ यांमुळे कालान्तराने सगळ्यांनीच त्यांना सहकार्य दिले. 

डॉ. आंबेडकरांचे सहकारी भास्करराव भोसले यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले होते. त्यांनीच कीर आणि डॉ. आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली होती. एका भेटीदरम्यान चर्चा करत असताना गांधीजींविषयक एका  प्रसंगाचा संदर्भ डॉ. आंबेडकरांना सापडत नव्हता तेंव्हा कीरांनी तो सांगितला आणि पुढे जाऊन हा संदर्भ कोणत्या ग्रंथात कोणत्या पृष्ठावर आहे हेही पत्राद्वारे कळवले. डॉ. आंबेडकर चरित्राविषयी कीरांनी सांगितलेली आठवण सांगणे आवश्यकच आहे, त्याशिवाय डॉ. आंबेडकरांचे मोठेपण कळून येणार नाही, जेंव्हा कीरांनी भास्करराव भोसलें मार्फत आपण डॉ. आंबेडकरांचे चरित्र लिहू इच्छितो असे कळविले आणि यावर आंबेडकरांचे मत विचारले तेंव्हा डॉ.आंबेडकरांनी दिलेले उत्तर वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. डॉ आंबेडकर लिहितात;

" ज्या तरुणाला माझे चरित्र लिहायचे आहे तो अर्थात तसे करण्यास समर्थ आहे आणि माझ्याविषयी जी मते तो मांडेल टी मला अनुकूल नसतीलही; परंतु सर्व सार्वजनिक कार्यकर्त्यांना ते सहन करावे लागते. जे माजविषयी बोलले आहेत किंवा ज्यांनी माझ्याविषयी लिहिले आहे त्यांपैकी बहुसंख्य लोकांनी माझ्यावर सतत टीकाच केली आहे. मी त्यांच्या टीकेकडे लक्ष दिले नाही त्यामुळे तुमचा मित्र माझ्याविषयी काय लिहितो त्याविषयी फार काळजी नसावी."

अनेक प्रकारे शोध करून, साहित्य जमवून कीरांनी आंबेडकर चरित्र लिहून पूर्ण केले, या चरित्राकरता छायाचित्रे मिळवताना त्यांच्या जीवावर देखील बेतले होते पण सुदैवाने त्यातून ते वाचले. अखेर मे १९५४ साली ते प्रसिद्ध झाले. ते त्यांनी डॉ.आंबेडकर : लाईफ अँड मिशन्स या नावाने प्रसिद्ध केले आहे. या चरित्राचे महत्व हे संदर्भ ग्रंथाइतके आहे कारण, हे चरित्र खुद्द डॉ. आंबेडकरांनी दोनदा वाचले आहे आणि बऱ्याचदा आपल्या सहकाऱ्यांकडून वाचून घेतले आहे. जेंव्हा डॉ. आंबेडकर आणि कीर यांनी भेट झाली तेंव्हा डॉ.आंबेडकर म्हणाले 

" या चरित्रानंतर मी आत्मचरित्र लिहिण्यास मोकळा झालो."

कीरांनी बर्याचजणांना हे चरित्र अभिप्राय देण्याकरता पाठवले होते पण त्यातील बहुतेकांनी त्याला एक संदर्भ ग्रंथ म्हणून जतन ठेवला आहे असेच उत्तर दिले.

सावरकर, आंबेडकर याचप्रमाणे कीरांनी, महात्मा फुले, लो.टिळक, राजर्षी शाहू महाराज, गांधी यांची देखील चरित्रे लिहिले आहेत.

कीरांनी चरित्र लेखनाची स्वतःची शैली विकसित केली होती, त्यांच्या मते चरित्र लेखन करताना केवळ भाटगिरी करू नये, चरित्रनायकाचे जर एखादे विधान कृती चुकीची असेल तर ती चुकीची आहे असेच लिहावे, प्रसंगी त्याचे अवगुणही सांगावेत पण त्या अवगुणांभोवतीच फिरू नये, चरित्रनायकाच्या पूर्वीच्या पिढ्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी त्याचप्रमाणे चरित्रनायकाच्या नंतर त्यांच्या अनुयायांबद्दलही सांगावे. चरित्राची भाषा अगदीच सोपी, स्पष्ट असावी त्यावर क्लिष्ट अलंकारिकतेचे गुलाबपाणी असू नये. या  अश्या अनेक गोष्टी सांगता येतील.

धनंजय कीरांनी लिहिलेली चरित्रे वाचताना जाणवणारी एक गोष्ट म्हणजे त्यांनी चरित्रनायकाच्या तत्वांशी, विचारांशी एकरूप, समरस होऊन चरित्रे लिहिली असल्याने त्या चरित्रांमध्ये जीवनपणा आणि कळकळ दिसते. कीरांनी लिहिलेली बहुतेक चरित्रे ही संदर्भ ग्रंथ म्हणूनच पाहिली जातात असा आमचा अनुभव आहे.

साहित्यिक कार्याप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्य देखील मोलाचे आहे, परंतु त्यासर्वांचा आढावा इथे घेणे शक्य नाही. केवळ मॅट्रिक झालेल्या, पांडित्याचा कसलाही वारसा नसणाऱ्या, भंडारी ज्ञातीतील एका मराठमोळ्या कारकुनाने, महापुरुषांची महाचरित्रे इंग्रजीमधून लिहिली ही एक अलौकिक बाबच आहे.

वास्तविक स्वतः पदवीधर नसताना, पदवी मिळवण्याकरता ज्यांचा आधार घ्यावा लागतो अश्या ग्रंथांची निर्मिती करणाऱ्या, धनंजय कीरांना शिवाजी विद्यापीठाने " डी. लिट " ही सन्मान्य पदवी दिली.

त्यांच्या साहित्यनिर्मितीचा, कार्याचा गौरव करत त्यांना १९७१ साली त्यांना भारत सरकारने " पदमभूषण " ही पदवी बहाल केली.

जाता जाता एवढेच सांगतो की; चरित्रनायकांची भाटगिरी करणारे, त्यांचे उदात्तीकरण, दैवतीकरण करणारे चरित्रकार, लेखक सहस्त्रावधी असतात पण या गर्दीतून बाजूला होऊन त्रयस्थपणे जो चरित्र लिहितो तो आणि तोच खरा महालेखक ठरतो.

अश्या या महान चरित्रकाराला त्रिवार वंदन आणि विनम्र अभिवादन !!!

Ⓒ श्रीपाद श्रीकांत रामदासी.

Comments