सावरकरांना भारतरत्न का द्यावे ?

।। श्रीराम ।।

विनायक दामोदर सावरकर 

२८ मे १८८३ - २६ फेब्रु. १९६६

 दि. १६-११-२०१८ रोजी वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रस्ता पुणे. 
येथे केलेल्या भाषणाचा सारांश....

नमस्कार !

स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी, सावरकर प्रेमींच्या सह्या घेण्याचा उपक्रम श्री.सुनील मारणे सुरु करत आहेत. त्या संदर्भातील एका महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मला सावरकर अभ्यासक या नात्याने, सावरकरांना भारतरत्न का द्यावे ? हा विषय मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्या प्रसंगी, ३५ मिनिटे चाललेल्या भाषणाचा सारांश वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. याप्रसंगी, श्री.सुनील मारणे, श्री.बाप्पू शिळमकर,श्री.प्रीतम बहिरट, श्री.केतन घोडके, स्तंभलेखक तुषार दामगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सावरकरांना भारतरत्न का द्यावे ?

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वां अहं यशोयुतां वंदे ।।

स्वातंत्र्यदेवतेला भगवतीचे (देवीचे) रूप मानणारे आणि परवशतता, जातीय उच्चनीचतेच्या अंधकाराने हतबद्ध झालेल्या भारतीय जनतेस आपल्या सशक्त आणि सशस्त्र करकमलांनी सावरणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व, प्रखर राष्ट्रभक्तीने अवघा हिंदुस्थान व्यापून टाकणारे एक तेजोनिधी म्हणजेच,
हिंदूसमाज संरक्षक, हिंदू संघटक, हिंदूहृदयसम्राट, राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.....

खरेतर स्वा. सावरकरांचे अलौकिक चरित्र सांगायला दिलेला वेळ हा फार म्हणजे अगदी फारच कमी कालावधी आहे,  परंतु त्यांच्या चरित्राचा धावता जीवनपट मांडण्याचा एक प्रयत्न करतो आहे.
एक असा क्रांतीकारी ज्याने बालवयातच सशस्त्र क्रान्तीचा केतू उभारून स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करायचा दृढ निश्चय केला होता म्हणजे सावरकर.....

जाती-उपजातींमध्येही विटाळाचे वेड पसरले असताना, विभिन्न जातीच्या युवकांना एकत्र करून मित्रमेळा आणि अभिनव भारत अश्या क्रांतीकारकांना जन्म देणाऱ्या संघटनेची उभारणी आणि संचालन करणारा युवा संघटक म्हणजे सावरकर.....

 बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही केवळ ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यायची नाही म्हणून आयुष्यामध्ये संपन्नता आणू शकणारी सनद लाथाडून स्वतःला अंदमानच्या अंधारकोठडीमध्ये झोकून देणारा एक प्रखर देशभक्त म्हणजे सावरकर.....

अंदमानमध्ये जिवंतपणी मरण यातना भोगतानाही आपल्या सोबत असणाऱ्या खुनी, दरवडेखोर कैद्यांना अक्षर शिक्षण देऊन, समाजामध्ये सभ्यतेने अर्थार्जन करण्याची शिकवण देणारा एक समाज उद्धारक म्हणजे सावरकर.......

रत्नागिरी मध्ये स्थानबद्ध असताना, रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, व्यवसायबंदी, सिंधुबंदी, वेदोक्तबंदी आणि शुद्धीबंदी या सप्तबेड्याना आपल्या परखड लेखणीतून आणि कणखर कार्यकुशलतेतून तोडून फोडून टाकत हिंदूंना स्वतःशी प्रामाणिक राहण्याची शिकावण देणारे एक कृतिशील नेतृत्व म्हणजे सावरकर....

त्या काळी पूर्वास्पृश्याना मंदिर प्रवेशाची बंदी होती, सावरकरांनी प्रखर संघर्ष करून रत्नागिरी आणि परिसरातल्या ५०० हुन अधिक मंदिरात प्रवेश, मिळवून दिला आणि युगा युगाचे देवाला लागलेले भक्तांचे सुतक फेडले. स्पृश्य मुलांच्या शाळांतून पुर्वास्पृश्याना प्रवेश मिळवून दिला.अनैतिक रूढी, अनावश्यक आणि राष्ट्रहिताला बाधक असणाऱ्या परंपरांवर आपल्या प्रखर बुद्धिवादाच्या आसुडाचे प्रहार करणारा एक धर्मचिकित्सक आणि सुधारक म्हणजे सावरकर.....

हजारो पानांचे गद्य आणि पद्य लेखन करणारा एक कुशल साहित्यीक, भाषाशुद्धीसाठी अगणित पर्यायी मराठी शब्द  आणि शब्दकोश देणारा, एक सरस्वतीचा पुत्र, साहित्यपरिषदेच्या अध्यक्षीय भाषणामध्ये साहित्यिकांना " लेखण्या मोडून बंदुका हाती घ्या " असे सांगणारे निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर....

राजकारणामध्ये, अभ्युथानाय हिंदूंना अहं पक्ष प्रवर्तते.. असे म्हणत, मतपेढयांसाठी कोणाशीही कसलीही तडजोड न करणारा एक अजोड राजकारणी. म्हणजे सावरकर.....

अंततः राष्ट्राच्या नागरिकांनी पोथीनिष्ठ न राहता विज्ञाननिष्ठ राहावे असे सांगणारा एक विज्ञाननिष्ठ म्हणजे सावरकर.....

यंत्रयुगाचे नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत करून आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या उच्च पथावर नेण्यासाठी अखंड झटणारा एक प्रगतशील,  कृतीशील आधुनिकतेचा उद्घाता .... म्हणजेच सावरकर सावरकर आणि फक्त सावरकरच....

धर्म, धर्मग्रंथ यांचे प्रामाण्य हे केवळ पारलौकिक सौख्याखासाठी असते, त्यामुळे ऐहिक जीवनामधील प्रामाण्य धर्मग्रंथावर नव्हे तर, आचरणीय अश्या नियमांवर आधारीत असावे असे ठणकावून सांगणारा एक पुरोगामी (secular) विचारवंत म्हणजे सावरकर....

आपले ८३ वर्षाचे आयुष्यमान जगताना वयाच्या ९व्या १०व्या वर्षांपासून ते अखेरच्या श्वासापर्यंत या प्रियतम मातृभूमीवर, ज्यांनी प्रेम आणि फक्त प्रेमच केले अश्या वीरोत्तमाला स्वातंत्र्यप्राप्तीच्या सत्तरीनंतरही "भारतरत्न" द्यावे की नको? यावर चर्चा होणे या सारखा दैवदुर्विलास दुसरा कोणताही असूच शकत नाही.

ज्या राजकरण्यांनी आजवर सावरकरांची हयातीत अवहेलना केली आणि मृत्युपश्चात्त बदनामी करतच राहिले, आजही जे लोक सावरकरांचा अवमानच करतात अश्या राजकरण्यांना आणि त्यांच्या पक्षांना आता कायमचेच घरी बसवण्याची वेळ आली आहे हे लक्षात ठेवा.

लोकशाहीमध्ये देशाची धुरा ही अंततः राजकारण्यांच्या हाती असते, त्यामुळे राजकारणाचे हिंदूकरण करा हे सावरकरांचे विचार लक्षात ठेवूनच, हिंदूंनी आता इथून पुढे आपला लोकप्रतिनिधी निवडावा, असे माझे मत आहे. आपल्या वाणीला विराम देण्यापूर्वी एवढेच सांगतो की;

"राष्ट्राच्या भविष्यासाठी स्वतःच्या वर्तमानाची राख-रांगोळी करणाऱ्या सावरकरांची वारंवार होणारी नालस्ती, बदनामी थांबवायची असेल, तर सावरकरांना भारतरत्न दिलेच पाहिजे..... दिलेच पाहिजे....."

सावरकराना भारतरत्न देण्याच्या मागणीचे शिवधनुष्य उचलू पाहणाऱ्या श्री.सुनील मारणे यांच्यामागे सर्वच सावरकरप्रेमींनी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढवावे अशी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.

|| भारत माता की जय ||

|| वंदे मातरम् ||

Comments